रोज काही ना काही तरी लिहिलेच पाहिजे असे समजून लेखन करणाऱ्यांतले ते नव्हते. चेहरा अतिशय शांत, तरी लेखक म्हणून समाजातील स्पंदने अखंडपणे ते टिपत होते. त्यातूनच त्यांच्या साहित्याला एक भारदस्तपणा होता. त्यांचे नाव अशोकमित्रन. ते तामिळ भाषेतील प्रभावी साहित्यिक.

अवतीभवतीचे सामान्य लोकच त्यांच्या लेखनाची प्रेरणा होते. त्यांचे साहित्य हे सामान्यांना जवळचे वाटले, कारण त्या त्यांच्याच गोष्टी होत्या. १९३१ मध्ये सिकंदराबाद येथे त्यांचा जन्म झाला. त्यांचे मूळ नाव त्यागराजन होते, पण नंतर त्यांनी १९५२ मध्ये चेन्नईत आल्यानंतर ‘अशोकमित्रन’ हे टोपणनाव धारण केले. उपहासगर्भ अशी त्यांची लेखनशैली असल्याने ‘अनबिन पारिसू’ या त्यांच्या पहिल्याच पुस्तकाची बरीच चर्चा झाली. साधी पण टोकदार शैली हे त्यांचे वैशिष्टय़, त्यातूनच त्यांनी प्रस्थापित व्यवस्थेला अस्वस्थ केले. चेन्नईला आल्यानंतर त्यांनी दहा वर्षे जेमिनी स्टुडिओत काम केले. ‘फोर्टिन इयर्स विथ बॉस’ या आठवणीत जेमिनी स्टुडिओतील अनुभव कथन केले आहेत, ‘पारिसू’, ‘थानीर मानसा अपाविन स्नेगीधर’, ‘१८ अवधू अटचाकोडू’ (दी एटिंथ पॅरलल), ‘द घोस्ट्स ऑफ मीनांबकम’ व ‘स्टील ब्लीडिंग फ्रॉम द वुंड’ ही त्यांची संस्मरणीय पुस्तके. १९९८ मध्ये त्यांनी एका ऑनलाइन नियतकालिकासाठी चेन्नईवर माहितीपूर्ण लेखन केले आहे. त्यांचे चेन्नईवरचे लेखन हे केवळ विविध ठिकाणांच्या माहितीची जंत्री नव्हती, तर त्या प्रत्येक ठिकाणाशी त्यांच्या जुळलेल्या नात्याचा जरतारी पट होता. त्यावर नंतर ‘चेन्नई सिटी- अ कॅलिडोस्कोप’ हे पुस्तक प्रसिद्ध झाले. त्यांनी आठ कादंबऱ्या व २०० लघुकथा लिहिल्या. युरोपीय भाषांत प्रचलित असलेल्या नॉव्हेला प्रकारातही त्यांनी १५ पुस्तके लिहिली. लघुकथेपेक्षा मोठा व कादंबरीपेक्षा लहान असा हा साहित्य प्रकार आहे. ‘अप्पाविन स्नेगीधर’ या संग्रहासाठी त्यांना साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला.

सहा दशकांच्या कालावधीत त्यांनी अनेक विषय हाताळले; त्यात लघुकथा, विविध विषयांवर समीक्षात्मक लेखन, व्यक्तिचित्रे यांचा समावेश होता. सर्जनशील लेखनासाठी आयोवा विद्यापीठाची विद्यावृत्ती त्यांना मिळाली. लेखन हा त्यांचा पूर्णवेळ व्यवसाय होता.  आधुनिक तामिळ साहित्यात अशोकमित्रन, पुडुमपिथन हे प्रतिभावान लेखक मानले जातात. अशोकमित्रन वलयांकित लेखक होते, पण त्यांनी तसे कधी मानले नाही. त्यांच्या साहित्यातील स्त्री व्यक्तिरेखा या संघर्षांत टिकून राहणाऱ्या व सक्षम होत्या. जमिनीवर पाय असलेले, विनयशील असे ते लेखक होते. ‘कनाईयाझी’ या तामिळ साहित्य नियतकालिकाचे त्यांनी २५ वर्षे संपादन केले. मुख्य प्रवाहातील माध्यमांशी ते सदैव जोडलेले होते. चित्रपटांवर ते अधिकारवाणीने लिहीत असत. त्यांच्या ‘करायनधा निझालगल’ या कादंबरीत तामिळ चित्रपटसृष्टीचे अंतरंग प्रकट झाले आहेत. चित्रपटनिर्मितीत वाहनचालकापासून नृत्य दिग्दर्शक, सहायक अशा अनेक लहान-मोठय़ा लोकांची चित्रणे त्यांनी केली. अशोकमित्रन हे शास्त्रीय संगीताचे जाणकार होते. त्यावरही त्यांनी साक्षेपी लेखन केले. त्यांचे बालपण तंजावरमधील पोलगाम या लहानशा गावात व्यतीत झाले. त्यांचे कुटुंबीय मूळ मयिलादुथुराई येथील रहिवासी. पहिली वीस वर्षे अशोकमित्रन त्या गावात राहिले. त्यांची ‘पथिनेतावथू अटचाकोडू’ ही कादंबरी या शहरावर आधारित आहे. अमेरिकन साहित्य व चित्रपट यांची गोडी त्यांना नंतर लागली,  इतर लेखकांशी त्यांचे ऋणानुबंध जुळले. त्यात, टी. जानकीरामन, का. ना सुब्रह्मण्यम, इंदिरा पार्थसारथी, सुंदरा रामसामी व नकुलन ही त्यांची मित्रमंडळी.  त्यांच्या रूपाने चतुरस्र व प्रतिभावान लेखक काळाच्या पडद्याआड गेला आहे.