गिअर शिफ्टची कटकट ट्रॅफिकमध्ये नको वाटते. त्यामुळे ईझी ड्रायिव्हगसाठी ऑटो गिअर शिफ्ट (एजीएस) वा ऑटोमॅटिक मॅन्युअल ट्रान्समिशन (एएमटी) कारना मागणी वाढत आहे. अल्टो के १० व क्विड १.० या कारची एएमटी मॉडेल बाजारात आहेत. स्टाइल, फीचर, परफॉरमन्स, किंमत याबाबत या कारचा घेतलेला आढावा.

शहरात वाहतूक जास्त असल्याने गिअरची कोणतीही गाडी चालविणे आता त्रासदायक ठरू लागले आहे. त्यामुळेच दुचाकींमध्येही आता मोटरसायकलऐवजी ऑटोमॅटिक स्कूटरना पसंती मिळू लागली आहे. आपल्याकडे कारचा उपयोग शहरात फिरण्यासाठी अधिक होतो. त्यामुळेच ऑटोमॅटिक मॅन्युअल ट्रान्समिशन असणाऱ्या कारना मागणी वाढणार आहे. याच सेगमेंटमध्ये देशातील सर्वात स्वस्त एएमटी तंत्रज्ञान असणारी नॅनो ही कार आहे. मात्र, या कारचे उत्पादन सुरू राहणार की नाही, याबाबत साशंकता व्यक्त होत आहे. त्यामुळेच रेनॉ क्विड व सुझुकी अल्टो के १० या कारच एंट्रीलेव्हल एएमटी सेगमेंटमध्ये आता येतात.

देशात एएमटी तंत्रज्ञान असणारी पहिली कार सुझुकीने लाँच केली. त्यानंतर हे तंत्रज्ञान असणाऱ्या कार अन्य कंपन्याही लाँच करू लागल्या आहेत. स्पोर्ट्स युटिलिटी व्हेईकल (एसयूव्ही) इन्स्पायर्ड डिझाइन, चांगले इंजिन, फीचर्स यांच्यामुळे यशस्वी ठरलेल्या क्विड या कारचे एएमटी मॉडेल रेनॉ इंडियाने गेल्या वर्षी लाँच केले. यामध्ये वापरण्यात आलेले एएमटी तंत्रज्ञान रेनॉने स्वत विकसित केले आहे. मात्र याचे हार्डवेअर बॉश आणि सॉफ्टवेअर एफईव्हीचे आहे. रेनॉने स्वतच्या संशोधन आणि विकास विभागाने यावर काम करून त्याची फेररचना करीत हे तंत्रज्ञान क्विडला सर्वोत्तम ठरेल, असे डिझाइन केले आहे. याच्या अनेक चाचण्या झाल्यावर त्याचा वापर सुरू करण्यात आला आहे. एएमटीवरील बहुतेक सर्व कारना (प्रीमियम सेगमेंट सोडून) गिअर शिफ्टरसारखा शिफ्ट देण्यात आले आहे. मात्र रेनॉने कारला प्रीमियम फील देण्यासाठी ऑटो शिफ्टचा शिफ्टर काढून टाकला आहे. त्याऐवजी ऑटो डायलचे फीचर दिले आहे. यानुसार आपण फक्त तो रिव्हर्स, न्यूट्रल, ड्राइव्ह या मोडपर्यंत फिरवायचा असतो. ही डायल डॅशबोर्डवर दिली आहे. अशा प्रकारची ड्राइव्ह मोडची डायल एंट्रीलेव्हलच नव्हे तर प्रीमियम सेगमेंटमधील कार सोडून अन्य प्रकारच्या कारमध्ये पहिल्यांदाच देण्यात आली आहे. यामुळे ड्रायव्हरच्या डाव्या बाजूला गिअर शिफ्टरच्या ठिकाणी बाटली व अन्य वस्तू ठेवण्यासाठी जागा मिळाली आहे.

इंजिन व रायिडग

ऑटोमॅटिक कार या चालविण्यास अत्यंत सुलभ असतात आणि त्यांचे इंजिन, पॉवर, पिकअपही चांगला असतो. पण यामुळे या कारचे मायलेज नक्कीच मार खाते. त्यामुळे ऑटोमॅटिक कार घेतानाही आपण विचार करतो. तसेच अशी कार घेताना डिझेल मॉडेलचा विचार केला जातो. ऑटोमॅटिकपेक्षा ऑटोमेटेड मॅन्युअल ट्रान्समिशन तंत्रज्ञान वेगळे आहे. यामध्ये गिअर हा ऑटोमॅटिक पडत असतो. यासाठी आरपीएम (रेव्होल्यूशन्स पर मिनिट)चा आधार घेतला जातो. रेनॉने एएमटी मॉडेलसाठी एक हजार सीसीचे इंजिन बसविले असून, पॉवर ६७ बीएचपी आहे. ड्राइव्ह मोडला गेल्यावर ऑटोमॅटिक कारसारखा पिकअप नसला तरी क्विड एएमटीचा पिकअप फारच चांगला आहे. एक हजार सीसीचे इंजिन असल्याने टेरेनमध्येही ताकद कमी पडते असे जाणवत नाही. पण एक हजार सीसीपेक्षा अधिक सीसीची कार चालविण्याची सवय असणाऱ्यांना मात्र पिकअप कमी वाटू शकतो. कारला क्रूझ कंट्रोल नसला तरी हायवेवरही विशिष्ट वेगाने आपण पेडलवर पाय ठेवून गती राखू शकतो. एएमटीचा खरा अनुभव बम्पर टू बम्पर ट्रॅफिकमध्ये कळतो. ऑटो गिअर शिफ्ट स्मूथ असून, चालविताना ऑटोमॅटिक कार चालविण्याचा फील येतो. स्टिअिरग शिफ्ट ईझी आहे. देशात सर्वप्रथम मारुतीने एएमटी कार लाँच केली. अल्टो के १० ही एजीएस मॉडेलमध्ये उपलब्ध आहे. यास पारंपरिक पद्धतीचा एएमटी शिफ्टर लिव्हर देण्यात आला आहे. अल्टोचे एएमटी तंत्रज्ञानही चांगले असून, कारला एक हजार सीसीचे इंजिन आहे. क्विडप्रमाणे के १० लाही पॉवर स्टिअिरग आहे. शहरात ट्रॅफिकमध्ये चालविताना स्टिअिरग फिरविण्यासाठी जास्त कष्ट घ्यावे लागत नाहीत. दोन्ही कारची पॉवर सारखी असली तरी अल्टो के १०चा पिकअप चांगला वाटतो.

एक्स्टिरियर व इंटिरियर

अल्टो के १० नवी असली तरी या कारचे डिझाइन पारंपरिक शैलीतील आहे. तरीही कारला स्पोर्टी लुक देण्याचा प्रयत्न मारुतीने केलेला आहे. अल्टो के १० मध्ये पाच व्यक्ती बसू शकतात. मात्र मागील सीटवर तीन व्यक्ती बसण्यात काहीशी अडचण येते. सीडीप्लेअर, यूएसबी, एसी, डिजिटल ओडोमीटर, पॉवर स्टिअिरग, पॉवर िवडोज आदी फीचर दोन्ही कारमध्ये आहेत. मात्र क्विडमध्ये युटिलिटी स्पेस अधिक असण्याबरोबर नॅव्हिगेशन, डिजिटल मीटर ही नवी फीचर दिली आहेत. अल्टो के १० मध्ये डिक्की ११७ लिटरची असून ती लहान वाटते. क्विडची डिक्की ३०० लिटरची असून ही या सेगमेंटमधील सर्वात मोठी आहे. दोन्ही कारना ड्रायव्हर सीटला एअरबॅग देण्यात आली आहे. क्विडचे इंटिरियर ऑल ब्लॅकमध्ये आहे, तर अल्टो के १० ब्लॅक व बेईज रंगात आहे. अल्टो के १० लांबीला ३५४५ एमएम, क्विड ३६७९ एमएम आहे. त्यामुळे अंतर्गत स्पेस थोडी वाढली आहे. अल्टो के १० क्विडपेक्षा रुंदीतही कमी असून त्यांची रुंदी अनुक्रमे १४९० एमएम व १५७९ एमएम आहे. क्विडची उंची १४७८ एमएम असून अल्टो के १० ही १४७५ एमएम आहे. ग्राऊंड क्लिअरन्स क्विडचा मोठा असून १८० एमएम आहे.  अल्टो क्विडच  १६० एमएम आहे. त्यामुळे स्पेस व वैशिष्टय़ांबाबत क्विड ही सरस आहे.

मायलेज किती?

कंपनीच्या दाव्यानुसार प्रति लिटर २४ किमीचे मायलेज मिळते. प्रत्यक्षात शहरात प्रति लिटर १५-१६ मायलेज मिळू शकते. काही वेळा यापेक्षा अधिक मिळते, असा अनुभव आहे. हायवेवर प्रति लिटर २०-२३ किमी मायलेज काहींना मिळालेले आहे. याच सेगमेंटमध्ये अल्टो के १० एजीएस आहे. या कारचे मायलेजही जवळपास सारखे आहे. शहरात प्रति लिटर १३-१६ किमी व हायवेअर प्रति लिटर २०-२३ किमी मायलेज मिळू शकते. मॅन्युअल ट्रान्समिशनच्या कारचे मायलेजही एएमटी कारसारखेच आहे. त्यामुळेच या कारना मागणी वाढत आहे. एएमटीला फाइव्ह स्पीड गिअर दिले आहेत.

किंमत व काय करावे?

अल्टो के १० एजीएस ही नॉन मेटॅलिक व मेटॅलिक पर्यायात आहे. पण मेटॅलिक रंगातील कारच घेणे जास्त चांगले आहे. या कारची किंमत ४.१९ लाख रुपयांपासून (एक्स-शोरूम) आहे. नॉरलम व्हीएक्सआय मॉडेलपेक्षा सुमारे ४६ हजार रुपयांनी महाग आहे. के १० एजीएस ऑप्शन्स मॉडेल ४.२५ लाख रुपयांपासून आहे. क्विड आरएक्सएल एएमटी ३,८७,२०० रुपये (एक्स शोरूम), तर क्लायम्बर एएमटी ४,५५,२०० रुपयांपासून आहे. किमतीबाबत क्विड एएमटी स्वस्त आहे. फीचर, किंमत, स्टाइल, डिझाइन (एसयूव्ही इन्स्पायर्ड) यांचा विचार करताना क्विड एएमटी ही व्हॅल्यू फॉर मनी आहे.

ls.driveit@gmail.com