टाटा मोटर्सच्या इंडोनेशियातील प्रकल्पाने अलीकडेच टाटा अल्ट्रा1012 हा हलक्या वजनी गटातील ट्रक आणि टाटा झेनॉन एक्सटी कॅब फोर बाय फोर ही पिकअप व्हॅन ही दोन वाणिज्यिक वापरासाठीची दोन वाहने लाँच केली. टाटा मोटर्सच्या या दोन्ही वाहनांच्या कठोर परीक्षणानंतरच त्यांचे लाँचिंग इंडोनेशियात करण्यात आले आहे. जावा, सुमात्रा, बाली आणि सुलावेसी या ठिकाणांसह इंडोनेशियात ११९ ठिकाणी टाटा मोटर्सची टच पॉइंट्स आहेत. या पॉइंट्सच्या माध्यमातून इंडोनेशियातील सर्व टाटा वाहनांना सेवा पुरवल्या जातात.

होंडा कार्सच्या डीलरशिपमध्ये वृद्धी

प्रवासी वाहनांच्या निर्मितीत अग्रगण्य मानल्या जाणाऱ्या होंडा कार्स या जपानी कंपनीने आता भारतातील तिच्या सेवा अधिक विस्तारण्याचे उद्दिष्ट राखले आहे. होंडा कार्सच्या ३००व्या डीलरशिपचे नुकतेच कोची येथे उद्घाटन झाले, त्या वेळी कंपनीतर्फे ही माहिती देण्यात आली. गेल्या २० महिन्यांत देशभरात होंडाच्या सुमारे १०० डीलरशिप्स सुरू झाल्या आहेत. देशभरातील तब्बल १९० शहरांमध्ये होंडाची शोरूम्स आहेत. या शोरूम्सच्या माध्यमातून होंडा आपल्या ग्राहकांना विविध सेवा पुरवते.

सोनालिकाच्या नव्या ट्रॅक्टरचे लाँचिंग

शेतकऱ्यांचा मित्र असलेल्या ट्रॅक्टरची निर्मिती करण्यात अग्रेसर कंपनी म्हणून ख्याती असलेल्या सोनालिकाने आता नवा कोरा ट्रॅक्टर बाजारात आणला आहे. सोलिस असे या ट्रॅक्टरचे नामकरण करण्यात आले असून संपूर्ण स्वदेशी बनावटीच्या या ट्रॅक्टरची इंजिनक्षमता १२० बीएचपी एवढी आहे.

तब्बल ४५ हजार किलोग्रॅमपर्यंतचे वजन सहजपणे पेलू शकेल एवढी क्षमता राखणाऱ्या या ट्रॅक्टरमध्ये २४ बाय २४ गीअर बॉक्स आहेत. आंतरराष्ट्रीय स्तरावर या ट्रॅक्टरचे ब्रॅिण्डग करण्याचा कंपनीचा मानस आहे.

स्कोडाची नवी ऑफर

सणासुदीच्या निमित्ताने सर्वच वाहननिर्माता कंपन्यांनी विविध ऑफर्स ग्राहकांसाठी आणल्या आहेत. त्यात स्कोडाचाही सहभाग आहे. स्कोडाच्या नव्या रॅपिडसाठी आता ‘खरेदी करा, पसे पुढील वर्षी भरा’ अशी जाहिरातच स्कोडाने दिली आहे. तसेच दोन वर्षांची जास्तीची वॉरंटी, दोन वर्षांचा फ्री रोडसाइड असिस्टन्स आणि एक वर्षांचा मोफत विमा याही ऑफर्सचा समावेश आहे. शिवाय क्रूझ कंट्रोल, प्रोजेक्टर हेडलॅम्प्स, रेन सेिन्सग वायपर्स, पार्कट्रॉनिक आदी सुविधाही आहेत.

टायटनएक्स टाटांकडे

गाडय़ांच्या इंजिनाला लागणाऱ्या कूलण्ट्सची निर्मिती करणारी जगातील आघाडीची टायटनएक्स ही कंपनी आता टाटा समूहाच्या मालकीची होणार आहे. ऑटो कॉम्पोनन्ट्स हा विभाग सांभाळणारी टाटा ऑटोकॉम्प ही कंपनी टायटनएक्स विकत घेणार आहे. वाणिज्यिक वाहनांना तसेच अवजड आणि कठीण रस्त्यांवर चालणाऱ्या दणकट वाहनांसाठी टायटनएक्स इंजिन कूलण्टची निर्मती करते. या कंपनीचे उत्तर व दक्षिण अमेरिकेसह युरोप आणि चीनमध्ये प्रकल्प आहेत.