वापरलेल्या गाडय़ांच्या खरेदीत सातत्याने वाढ होत असून यात व्ॉगन आर, स्विफ्ट, स्विफ्ट डिझायर, एर्टिगा या गाडय़ांना सर्वाधिक मागणी असल्याचे समोर आले आहे. वापरलेल्या गाडय़ांची खरेदी करताना बहुतांश ग्राहक छोटय़ा गाडय़ांना प्राधान्य देत असल्याचे ट्रूबिल या वापरलेल्या गाडय़ांच्या खरेदी-विक्रीसाठीच्या ऑनलाइन व्यासपीठाने केलेल्या सव्रेक्षणात ही बाब समोर आली आहे.

या व्यासपीठावर होणाऱ्या व्यवहारांमधून हे सव्रेक्षण करण्यात आले आहे. यानुसार मारुती कंपनीच्या गाडय़ांना तब्बल ४१.०६ टक्के इतकी मागणी आहे. ‘हुंदाई कंपनीच्या गाडय़ांना १८.४२ टक्के तर होंडा कंपनीच्या गाडय़ांना ९.३२ टक्के मागणी असल्याचे समोर आले आहे. याशिवाय टाटा कंपनीच्या ६.६४ टक्के, शेव्हरोले गाडय़ांना ६.०३ टक्के, टोयोटा कंपनीच्या गाडय़ांना ४.६२ टक्के, महिंद्रा कंपनीच्या गाडय़ांना ४.५८ टक्के, फोर्डच्या ३.२१ टक्के, तर फियाट, निसान, रेनॉ, स्कॉडा इत्यादी कंपनीच्या गाडय़ांना ६.१० टक्के मागणी आहे. वापरलेल्या गाडय़ा खरेदी करणारे ५४.८४ टक्के ग्राहक छोटय़ा गाडय़ांना पसंती देतात. तर २९.४७ टक्के ग्राहक लांब गाडय़ांना पसंती देतात. ९.७ टक्के ग्राहकांची पसंती बहुपयोगी वाहनांना आहे तर ५.९९ टक्के ग्राहकांची पसंती एसयूव्ही गाडय़ांना असल्याचे या पाहणीत दिसून आले आहे. या संकेतस्थळावर सर्वाधिक शोध हा दोन ते चार लाखादरम्यानच्या गाडय़ांसाठी होत असल्याचे निरीक्षणही अहवालात नोंदविण्यात आले आहे.

लहान गाडय़ा

  • मारुती सुझुकी वॅगन आर
  • मारुती सुझुकी स्विफ्ट
  • ह्युदाई आय २०

लांबसडक गाडय़ा (सेडान)

  • मारुती सुझुकी स्विफ्ट डिझायर
  • होंडा सिटी
  • मारुती सुझुकी एसएक्स४

एसयूव्ही

  • महिंद्रा एक्सयूव्ही ५००
  • महिंद्रा स्कॉर्पिओ
  • रेनॉ डस्टर

बहुपर्यायी

  • मारुती सुझुकी एर्टिगा
  • टोयोटा इनोव्हा
  • मारुती सुझुकी इको