पेट्रोलडिझेलच्या किमती दर पंधरा दिवसांनी बदलत असतात. कधी त्या कमी होतात, तर कधी वाढतात. त्यामुळे होतं काय की, आपलं खिशाचं गणित बिघडतं. वाहनधारकांना दरमहा पेट्रोलसाठी खर्च वेगळा काढावा लागत असतो. त्यामुळे पेट्रोलडिझेलच्या दरात वाढ झाली की, ऐन वेळी पंचाईत होण्याची शक्यता जास्त असते. मात्र, त्याला काही इलाज नसतो. सौरऊर्जा, बॅटरीवर चालणारी वाहने तयार झाली तर किती बरं, असा विचार सहज मनात येऊन जातो. मात्र, तो तेवढय़ापुरताच असतो. पुढे आपण विसरूनही जातो. मात्र, काही जणांनी या विचारांना मूर्तरूप देण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला आहे..

लॅम्बॉर्गिनी, बीएमडब्ल्यू, ऑडी, मर्सिडीज या महागडय़ा गाडय़ा एका बाजूला. दुसऱ्या कोपऱ्यात विविध सीसी क्षमतेच्या स्पोर्ट्स बाइकही तोऱ्यात उभ्या. पलीकडे अशाच काहीबाही नवनवीन वाहनांच्या रांगा. सगळीकडे वाहनप्रेमींची गर्दी. कोणी आपल्या लाडक्या गाडीबरोबर सेल्फी काढतंय, कोणी गाडीची माहिती जाणून घेतंय, तर कोणी गाडीत बसून ती चालवण्याची अ‍ॅक्शन करतंय. या सर्व कोडकौतुकात एक कोपरा मात्र काहीसा सुनासुना. अगदीच सुनासुना नाही. गर्दी होती त्या कोपऱ्यात. परंतु तीही किरकोळच, मात्र गर्दी कमी म्हणून हा कोपरा तसा चर्चेचा विषय ठरलेला. काय होतं या कोपऱ्यात..

मुंबईच्या वांद्रे-कुर्ला संकुलात नुकतंच एक भव्य ऑटो प्रदर्शन पार पडलं. या ऑटो प्रदर्शनात सर्वच गाडय़ांनी मिरवून घेतलं. म्हणजे वर उल्लेखलेल्या गाडय़ा तर होत्याच, शिवाय ह्य़ोसंग, हर्ली डेव्हिडसन, केटीएम डय़ूक यांसारख्या स्पोर्ट्स बाइकही दिमाखात उभ्या होत्या. यातील सर्वच गाडय़ा, विशेषत: चारचाकी, सर्वसामान्यांच्या खिशाला न परवडणाऱ्या. हां, मारुतीच्या गाडय़ा त्यातल्या त्यात परवडू शकतात; परंतु ऑटो प्रदर्शनाचा एक कोपरा व्यापला होता सौरऊर्जेवर, बॅटरीवर चालू शकणाऱ्या वाहनांनी आणि त्यांच्या मॉडेलची निर्मिती करणारेही तसे विद्यार्थिदशेतीलच. काय काय होतं या कोपऱ्यात. एक तर क्वाड्रीसायकल होती, ई-क्लासिक बाइक होती, सर्व प्रकारच्या पृष्ठभागावर चालू शकणारी गाडी होती, जिचं नामकरण ‘ऑल टेरियन व्हेइकल’ असंच करण्यात आलं होतं. सुरक्षिततेच्या दृष्टीने या वाहनांमध्ये सध्या तरी काही खबरदारी घेण्यात आली नसली तरी भविष्यात या त्रुटी भरून काढल्या जातील, असा आशावाद या गाडय़ांच्या तरुण निर्मात्यांकडून व्यक्त होत होता. आत्ता जरी या गाडय़ा प्रायोगिक स्वरूपात असल्या तरी भविष्यात होऊ घातलेला इंधनाचा तुटवडा आणि भडकणाऱ्या किमती यांचा विचार केल्यास नक्कीच पेट्रोल-डिझेलवर चालणाऱ्या गाडय़ांना या सौरऊर्जेवरील गाडय़ा तगडा पर्याय म्हणून पुढे यायला कोणाचेही दुमत असणार नाही. त्यामुळे यांच्याकडेही लक्ष असू दिलेलं बरं..

ऑल टेरियन व्हेइकल

ऑल टेरियन व्हेइकल म्हणजेच सर्व पृष्ठभागावर चालणारी गाडी.. बजाज पल्सर मोटारसायकलची पुनर्रचना करून हे वाहन तयार करण्यात आले आहे. विशेष म्हणजे एटीव्ही वाहनांच्या रकमेच्या तुलनेत हे वाहन तीनपट स्वस्त आहे. बाजारात एटीव्ही वाहनाची किंमत दोन लाखांपासून सुरू होते, परंतु हे वाहन अवघ्या ५० हजार रुपयांत तयार करण्यात आले आहे. हे वाहन शेतकऱ्यांच्या फार उपयोगी आहे. लहान शहरांमधील वाहतूक कोंडीचा विचार करता हे वाहन शहरांतर्गत वाहतुकीसाठी सोयीचे आहे.

क्वाड्रीसायकल

मेट्रो शहरातील वाहतूक कोंडीची समस्या लक्षात घेऊन या वाहनाची निर्मिती करण्यात आली आहे. दिसायला सायकल सारखीच असली तरी याला चारचाकी वाहनाचे स्वरूप देण्यात आले आहे.. सौरऊर्जेवर चालणारी हेडलाइट हे याचे प्रमुख वैशिष्टय़ असून एकदा बॅटरी चार्ज केल्यावर जवळपास ३० किलोमीटर अंतर सहज कापता येईल, अशी हिची रचना आहे.

निर्माते :

  • सौरभ परब
  • ओमकार सावंत,
  • सौरभ भागवत
  • चंद्रशेखर गावडे
  • प्रकाश केळकर
  • महेश बेळकर
  • राहुल पुजारी

वैशिष्टय़

  • लांबी – ४.५ फूट
  • उंची – २.५ फूट
  • वजन – ३५ किलो
  • जमिनीपासून उंची – १.२५ फूट

निर्माते :

  • देवेंद्र घुगे ल्ल सागर म्हात्रे
  • जोएल पिंटो ल्ल मकरंद दागडे,
  • स्वप्निल तिर्लोटकर ल्ल योगेश छप्रिया
  • राहुल गुरव ल्ल विशाल निचिटे.

क्लासिक

पूर्णपणे पर्यावरणस्नेही अशा या वाहनाची ओळख करून द्यावी लागेल. एक किंवा दोन व्यक्तींसाठी उपयुक्त असे हे वाहन. या वाहनात टेल लाइट, हेड लाइट, रिव्हर्स गिअर आणि मोबाइल चार्जिग असे अनेक पर्याय आहेत आणि तेही सोलार एनर्जीवर चालणारे. सुरक्षेच्या दृष्टीने या वाहनात काम करण्याची गरज असली तरी नॅनोपेक्षा कमी जागेत हे वाहन सहज राहू शकते.

निर्माते :

  • आर. चक्रवर्ती ल्ल रॉबिन कुपर
  • प्रतीक कांबळे ल्ल सकलेन वारीस
  • विकास पुजारी ल्ल मनीष चौधरी
  • विक्रम देवाडिगा ल्ल अकबर सिद्धिकी
  • प्रसाद किमकर ल्ल राहुल रॉय,
  • इमरान खान ल्ल तौफिक मोमीन
  • मोहम्मद शेख.

swadesh.ghanekar@expressindia.com