(शेंगदाण्यांची पुडी रिकामी करत चंपक तोतारामकडे येतो.)
तोताराम : चंपकराव, आज खूश असाल, पाऊस नाही. लख्ख ऊन पडलंय.
चंपक :  अगदीच. विठ्ठलपंतांना आराम आज.
wc13तोताराम : हो. वर्ल्ड कपमध्ये विश्रांती दिवस आहे ना? पण कसं आहे आम्ही सर्वसमावेशक आहोत. तुम्ही फक्त वर्ल्ड कपसाठी येता. लोकांच्या अन्य विवंचना असतात. त्याचंही निराकरण करण्याचा प्रयत्न करतो. मॅच नाही सोमवारी तरी आलात?
चंपक : कामापुरते मामा आम्ही करत नाही कोणाला. सोमवारी मॅच नाही, पण रविवारच्या दोन्ही मॅचचं तुम्ही सांगितल्याप्रमाणे झालं. तुम्हाला अपडेट द्यायला आलो.
तोताराम : श्रीलंका आणि पाकिस्तान जिंकले ना?
चंपक : श्रीलंकेला इंग्लंडविरुद्ध तीनशे कराव्या लागल्या आणि पाकिस्तानने झिम्बाब्वेला रोखलं कसंबसं. सोपं नव्हतं.
तोताराम : सोपं असणारच नाही चंपकशेठ. वर्ल्ड कप आहे हा. तावून सुलाखून निघालेल्या टीम्स येतात इथं. स्वत:च्या बलस्थानांचा आणि प्रतिस्पध्र्याच्या कच्च्या दुव्यांचा अभ्यास करावा लागतो. कठोर मेहनतीला पर्याय नाही.
चंपक : तुम्ही कसा अभ्यास करता?
तोताराम : ‘ट्रेड सिक्रेट्स’ कशी सांगणार? पण आम्ही हवेत तीर मारत नाही. भविष्य हेही शास्त्रच. त्यानुसारच सांगतो.
चंपक : छुपे रुस्तुम आहात, शब्दांत घोळवून ठेवता. असो, चला निघतो!