आपण कोणत्याही संघाला कमी लेखता कामा नये. ज्या फॉर्ममध्ये आता भारतीय खेळाडू खेळतायेत, ते पाहता यूएई ही आपल्यासाठी काही मोठी समस्या नाही आणि खरंतर ऑस्ट्रेलियाच्या तिरंगी स्पध्रेतील कामगिरी पाहता असं वाटलं होतं की आपल्या गोलंदाजीची समस्या आहे. पण दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या wc07सामन्यामध्ये आपल्या लोकांनी गोलंदाजीही चांगली केली. दोन मोठय़ा संघांना हरवल्यामुळे आपला आत्मविश्वास दुणावला आहे. यूएईचा संघ आर्यलडविरुद्ध पराभूत झाला,त्यामुळे त्यांनाही अजून फॉर्म सापडलेला नाही.
एकदिवसीय क्रिकेटमध्ये काहीही होऊ शकतं. त्यामुळे कुठल्याही संघाला कमी लेखू नये. त्यानंतर मला असं वाटतं की, आपला संघ स्थिरस्थावर होतोय. जोपर्यंत त्यातला एखादा वाईट खेळत नाही तोपर्यंत संघ बदलू नये. कारण हा संघ समतोल आहे. आपण पाच गोलंदाज घेऊन खेळतोय. बऱ्याचदा आपण म्हणतो की हा फलंदाजांचा खेळ आहे, पण सामना जिंकण्यासाठी दहा बळी तर मिळवले पाहिजेत.
आपल्या गोलंदाजांनी खासकरून पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात आखूड टप्प्याची गोलंदाजी केली. उमेश यादवने अशा चेंडूंचा विशेष वापर केला. तेवढय़ा आखूड टप्प्याच्या गोलंदाजीची गरज नाही. जेवढे चेंडू तुम्ही अचूक टप्प्यावर टाकाल, तेवढे फलंदाजांना खेळायला कठीण जाते. शनिवारच्या सामन्याप्रमाणेच पुढच्या सामन्यासाठीही हे लक्षात ठेवायला पाहिजे. आखूड टप्प्याचे चेंडू हे तुमचं मुख्य अस्त्र असायला पाहिजे, ते कधीतरीच तुम्ही वापरायला हवं. सध्याच्या युगातले फलंदाजही अशा चेंडूंसाठी तयारच असतात. त्यामुळे माझ्या दृष्टीने ही गोष्ट महत्त्वाची वाटते. यूएईबरोबरचा सामना आपण ऑस्ट्रेलियाशी खेळतोय, असे समजूनच खेळलो पाहिजे, असं मला वाटतं. यूएईकडे फलंदाजी चांगली आहे. पण कधीकधी असं वाटतं ना की नवीन संघ आहे, आपण गाफिल राहून खेळता कामा नये.
पहिल्या दोन्ही सामन्यामध्ये रोहित शर्माला जास्त धावा करता आलेल्या नाहीत. एकदा तर तो धावबाद झाला आणि एकदा ‘पुल’चा फटका मारताना बाद झाला. पण त्याने डोकं शांत ठेवून यूएईच्या सामन्यात एक मोठी खेळी खेळायला हवी. ती तो खेळला तर उपांत्यपूर्व आणि उपांत्य सामन्यात आपल्याला त्याचा फायदा होईल, असं मला वाटतं. त्यामुळे रोहितच्या बाबतीत हे व्हायला हवं. माझ्या मते, धोनी चांगल्या फॉर्ममध्ये नाही. अचानक जर का ३-४ फलंदाज बाद झाले तर तुमच्याकडे चांगले तळाच्या फळीतील फलंदाज पाहिजेत. मला थोडंसं धोनी आणि जडेजामध्ये ती समस्या दिसते आहे, पण त्यांना संधी मिळाल्यावर त्यांनी चांगली फलंदाजी करायला हवी. दुसरं काय की, पहिल्या दोन सामन्यांमध्ये तुमचं चित्त कसं आहे हे पाहिलं जातं. एकतर जवळपास युद्धच होतं आणि एकदा कागदावरच्या सर्वात चांगल्या गोलंदाजीसमोर तुम्ही खेळत होतात. त्यामुळे त्या वेळी चांगलं खेळणं भाग होतं, ते आपण केलं. माझा नेहमीच नाणेफेक जिंकल्यावर फलंदाजी घ्यावी, यावर नेहमीच विश्वास असतो. त्यामुळे आपण नाणेफेक जिंकल्यावर फलंदाजी घेतली पाहिजे. पण यूएईची पहिली फलंदाजी आली तर आपण आव्हान पार करू शकतो, कारण त्याचा आपल्याला चांगला अनुभव आहे. कारण २००३ साली आपण अंतिम सामन्यातील नाणेफेक जिंकलो आणि ऑस्ट्रेलियाला फलंदाजी दिली होती आणि काय घडलं ते आपण पाहिलं.
मला असं आतून वाटतंय की भारत अंतिम फेरीत पोहोचेल. कारण ऑस्ट्रेलियातल्या खेळपट्टीवर चेंडू स्विंग होणार नाही. पण आपले बाद फेरीचे सामने न्यूझीलंडमध्ये व्हायला नकोत, अशी आपण आशा धरूया. कारण तिथे चेंडू चांगला स्विंग होतो आणि चेंडू स्विंग व्हायला लागला की भारतीय फलंदाजांना जास्त धावा करता येत नाहीत. त्याचबरोबर वातावरणामुळे डकवर्थ-लुइस नावाचा भीषण प्रकार आपल्या वाटय़ाला येऊ नये!
शब्दांकन : प्रसाद लाड