स्वीकृत नगरसेवक पदाच्या एका जागेसाठी काँग्रेस आणि शिवसेना यांचे संख्याबळ समान असल्यामुळे टाकण्यात आलेल्या चिठ्ठीमध्ये नगरसेवक पदाची लॉटरी काँग्रेसला लागली. काँग्रेसकडून अजित दरेकर यांचे नाव बुधवारी निश्चित झाले. दरम्यान, येत्या सोमवारी (२४ एप्रिल) होणाऱ्या सर्वसाधारण सभेमध्ये पाचही स्वीकृत नगरसेवकांच्या नावाची अधिकृत घोषणा होणार आहे.

महापालिकेतील स्वीकृत नगरसेवकांच्या पाच जागांसाठी मंगळवारी (१८एप्रिल) अर्ज दाखल करून घेण्यात आले होते. महापालिकेत सध्या १६२ नगरसेवक असून सर्वाधिक ९८ जागा जिंकत भारतीय जनता पक्षाने स्पष्ट बहुमत मिळविले आहे. त्यामुळे संख्याबळानुसार स्वीकृत नगरसेवकांची निवड करण्यात येते. त्यानुसार भारतीय जनता पक्षाला तीन, राष्ट्रवादी काँग्रेसला एक जागा मिळणार आहे. काँग्रेस आणि शिवसेनेचे संख्याबळ समान असल्यामुळे या दोघांपैकी कोणाला संधी मिळणार हे बुधवारी चिठ्ठी टाकून ठरविण्यात आले. त्यामध्ये काँग्रेसची चिठ्ठी निघाली. त्यामुळे काँग्रेसचे अजित दरेकर यांना संधी मिळाली.

महापालिकेच्या आयुक्त कार्यालयात सकाळी अकरा वाजता चिठ्ठी टाकण्याची प्रक्रिया पार पडली. दोघांच्या नावांच्या चिठ्ठय़ा बंद डब्यात टाकून शालेय विद्यार्थिनीच्या हस्ते चिठ्ठी काढण्यात आली. त्यामध्ये दरेकर यांना कौल मिळाला. या वेळी प्रभारी आयुक्त राजेंद्र जगताप, नगरसचिव सुनील पारखी, सहआयुक्त विलास कानडे, विधी सल्लागार अ‍ॅड. रवींद्र थोरात, उपायुक्त सुहास मापारी, काँग्रेसचे गटनेता अरविंद शिंदे, शिवसेनेचे गटनेता संजय भोसले आणि माजी नगरसेवक प्रशांत बधे उपस्थित होते.

स्वीकृत नगरसेवक पदासाठी भाजपकडून या जागेसाठी माजी गटनेता गणेश बीडकर, रघुनाथ गौडा आणि गोपाळ चिंतल यांची नावे निश्चित करण्यात आली आहेत. काँग्रेसकडून अजित दरेकर तर शिवसेनेकडून अ‍ॅड. योगेश मोकाटे यांचे नाव देण्यात आले होते. तर राष्ट्रवादी काँग्रेसकडून सुभाष जगताप, महिला अध्यक्ष रुपाली चाकणकर यांचे अर्ज दाखल करण्यात आले होते. मात्र चाकणकर यांचा अर्ज छाननी प्रक्रियेत बाद झाला होता. त्यामध्ये या पाचही जणांच्या नावाची औपचारिक घोषणा होणे बाकी असून येत्या सोमवारी ही प्रक्रिया पूर्ण होणार आहे.

दरम्यान, काँग्रेसचे उमेदवार अजित दरेकर यांनी अर्जासोबत ते एका सामाजिक संस्थेचे सदस्य असल्याची माहिती दिली होती. मात्र ही संस्था अस्तित्वात नसल्यामुळे त्यांच्या अर्जाची छाननी करावी, अशी तक्रार शिवसेनेचे उमेदवार अ‍ॅड. योगेश मोकाटे यांनी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या दिवशीच केली होती. मात्र त्यावर सुनावणी न घेता चिठ्ठी टाकून उमेदवार निवडीची प्रक्रिया राबविण्यात आली. त्यामुळे या विरोधात न्यायालयात दाद मागणार असल्याचे योगेश मोकाटे यांनी सांगितले.