परिस्थिती पूर्वपदावर येण्यास दोन ते तीन दिवस लागणार

शेतकरी संपामुळे सामान्यांचे तोंडचे पाणी पळाले असताना रविवारी शहरात भाजीपाला आणि दुधाची आवक झाली. अत्यावश्यक भाज्या आणि दूध दिसेनासे झाल्याने सामान्य, विशेषत: गृहिणी हवालदिल झाल्या होत्या. भाज्या आणि दुधाची गेले तीन दिवस मोठय़ा प्रमाणावर टंचाई जाणवत होती. गुलटेकडीतील श्री छत्रपती शिवाजी मार्केटयार्डात शनिवारी (३ जून) राज्य तसेच परराज्यातून भाजीपाल्याची आवक सुरु झाल्याने बाजारात भाजीपाला उपलब्ध झाला. भाज्यांसोबत दूधही उपलब्ध झाल्याने सामान्यांना काहीसा दिलासा मिळाला. मात्र, भाज्यांचे भाव आवाक्यात येण्यासाठी आणखी दोन ते तीन दिवस लागण्याची शक्यता आहे.गुलटेकडीतील मार्केटयार्डात राज्य आणि परराज्यातून भाजीपाल्याचे शंभर ते एकशेदहा ट्रक आवक झाली. गेले तीन दिवस घाऊक बाजारात भाजीपाल्याची आवक थांबल्यामुळे बाजारात भाज्यांची टंचाई निर्माण झाली होती. हिमाचल प्रदेशातून पाचशे ते साडेपाचशे पोती मटार, कर्नाटक, गुजरातमधून सात ट्रक कोबी, कर्नाटक आणि गुजरातमधून सात ट्रक कोबी, आंध्र प्रदेशातून शेवगा तसेच कोबीचे ट्रक, कर्नाटकातून तीन टेम्पो तोतापुरी कैरी अशी आवक परराज्यातून झाली,अशी माहिती गुलटेकडी मार्केटयार्डातील प्रमुख विक्रेते विलास भुजबळ यांनी दिली.

राज्याच्या वेगवेगळ्या भागातून सातशे ते आठशे पोती आले, कोबी पाच ते सहा टेम्पो, फ्लॉवर दहा ते बारा टेम्पो, ढोबळी मिरची सहा ते सात टेम्पो, टोमॅटो तीन ते साडेतीन हजार पेटी, गाजर चाळीस ते पन्नास पोती, गावरान कैरी पाच ते सहा टेम्पो, भुईमुग शेंग दीडशे ते पावणेदोनशे गोणी, तांबडा भोपळा सहा ते सात टेम्पो, चिंच पंचवीस गोणी अशी आवक झाली. कांदा दहा ते बारा टेम्पो, बटाटा साठ ट्रक, मध्यप्रदेशातून लसूण पाच ते साडेपाच हजार गोणी अशी आवक झाल्याचे भुजबळ यांनी सांगितले. दरम्यान, शहरात दूध पुरवठा सुरळित झाला. गेले दोन दिवस दूधपुरवठा झाला नव्हता. अनेक ठिकाणी दूध पिशव्यांची छापील किमतीपेक्षा जादा दराने विक्री करण्यात येत होती.

भाजीपाल्याचे कडाडलेले भाव कायम

भाजीपाल्याची आवक सुरु झाली आहे. किरकोळ विक्रेत्यांकडून जादा दर देऊन भाजीपाला खरेदी करण्यात आला. त्यामुळे भाजीपाल्याचे दर सामान्यांचा आवाक्यात आले नाहीत. मात्र, बाजारात भाजीपाला विक्रीस उपलब्ध झाला, ही बाब सामान्यांना दिलासा देणारी आहे. किरकोळ विक्रेत्यांकडून तीस ते पस्तीस रुपये दराने कोथिंबिरीच्या एका जुडीची खरेदी करण्यात आली. त्यामुळे सामान्यांना चाळीस ते पन्नास रुपये दराने कोंथिबिरीच्या एका जुडीची विक्री करावी लागत आहे. आवक वाढल्यानंतर भाज्यांचे दर सामान्यांच्या आवाक्यात येतील. रविवारी भारत-पाकिस्तान क्रि केट सामना असल्याने दुपारनंतर खरेदीसाठी सामान्य ग्राहक फिरकणार नाही. त्यामुळे जादा दराने खरेदी केलेला भाजीपाला पडून राहील, असे किरकोळ विक्रेते प्रकाश ढमढेरे यांनी सांगितले.

शेतक ऱ्यांनी स्वत:च्या जबाबदारीवर शेतीमाल पाठविला

शेतकरी संघटनेकडून संप सुरु आहे. मात्र, शेतकरी संघटनांमध्ये मतभिन्नता असल्याने शेतक ऱ्यांमध्ये संभ्रम आहे. काही शेतक ऱ्यांनी स्वत:च्या जबाबदारीवर रविवारी गुलटेकडी मार्केटयार्डात माल विक्रीस पाठविला. त्यामुळे बाजारात भाजीपाला विक्रीस उपलब्ध झाला. प्रशासनाकडून मार्केटयार्डाच्या आवारात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. पोलीस बंदोबस्तात भाजीपाल्याची आवक झाली. दर रविवारी दीडशे ते एकशे साठ गाडया भाजीपाल्यांची आवक होती. शेतकरी संपामुळे आवक कमी झाली. मात्र, बाजारात भाजीपाला विक्रीस पाठविण्यात आल्याने सामान्यांना दिलासा मिळाला, असे विलास भुजबळ यांनी सांगितले.

रमजान महिन्यामुळे फळांना मागणी

मुस्लीम धर्मीयांच्यादृष्टीने पवित्र असलेल्या रमजान महिन्यात उपवास (रोजे) धरले जातात. रमजानमुळे फळांना मागणी चांगली आहे. उन्हाळ्यामुळे आवक कमी झाल्याने फळबाजारात रविवारी चिक्कू आणि पेरुच्या भावात दहा ते वीस टक्क्यांनी वाढ झाली. शेतकरी संपामुळे लिंबांची आवक कमी झाली आहे. हैद्राबाद आणि चेन्नई येथून लिंबांची आवक झाली. गेल्या तीन दिवसांचा आढावा घेतल्यास रविवारी फळांची चांगली आवक झाली. लिंबांना रसवंतीगृहचालक आणि सरबत विक्रेत्यांकडून चांगली मागणी आहे. केरळहून अननस आठ ट्रक, मोसंबी तीन टन, संत्रा एक टन, डाळिंब दहा ते वीस टन, पपई दहा ते बारा टेम्पो, चिक्कू एक हजार गोणी, आंबा दीड हजार पेटी अशी आवक झाली.

पालेभाज्यांचे भाव तेजीत

पालेभाज्यांना चांगली मागणी असल्याने भाव तेजीत आहेत. घाऊक बाजारात रविवारी कोथिंबिरीच्या पन्नास हजार जुडी, मेथी आणि पालकच्या प्रत्येकी वीस हजार जुडी, पुदिना पाच हजार तसेच अन्य पालेभाज्यांच्या दोन ते तीन हजार जुडींची आवक झाली. गेल्या आठवडय़ाच्या तुलनेत बाजारात पालेभाज्यांची आवक कमी झाली आहे. त्यामुळे पालेभाज्यांच्या किंमतीत वीस ते पंचवीस टक्कयांनी वाढ झाली आहे. किरकोळ बाजारात मेथी आणि कोथिंबिरीच्या एका जुडीची किंमत चाळीस ते पन्नास रुपये आहे. अन्य पालेभाज्यांच्या जुडीची विक्री पंचवीस ते तीस रुपये दराने केली जात आहे.