अखिल भारतीय क्रांती परिषदेतील सूर

देशातील महिलांना सर्व जे अधिकार मिळाले आहेत, ते डॉ. बाबासाहेब आंबेडकरांमुळे मिळाले आहेत. त्यासाठी कोणतीही आंदोलने करावी लागली नाहीत. मात्र, त्या काळात बाबासाहेबांनी महिलांना अधिकार देऊन जी क्रांती केली, त्यालाच कुठेतरी छेद देण्याचे काम विद्यमान व्यवस्थेत सुरू असल्याचा सूर दीक्षाभूमीवर आयोजित तीन दिवसीय अखिल भारतीय क्रांती परिषदेत उमटला.

अखिल भारतीय महिला क्रांती परिषदेच्या अध्यक्ष म्हणून हैद्राबादच्या सामाजिक कार्यकर्त्यां मनीषा बांगर, प्रमुख पाहुणे म्हणून शुभांगिनी गायकवाड, लॉर्ड बुद्धा टेलिव्हिजन नेटवर्कचे संचालक भैयाजी खैरकर, सामाजिक कार्यकर्त्यां मंजुला प्रदीप, संथागार फाऊंडेशनचे एम.एस. जांभुळे, पुष्पा बौद्ध, डॉ. सरोज आगलावे आणि डॉ. वीणा राऊत व्यासपीठावर उपस्थित होत्या.

बांगर म्हणाल्या, आज हिंसा, अत्याचार, बेरोजगारीचे प्रमाण, महिलांमध्ये भूकबळीचे प्रमाण वाढत आहे. जातीवाद आणि अस्पृश्यतेचे प्रमाणही वाढताना दिसत आहे. महिलांना वेश्याव्यवसायाला लावले जात आहे आणि त्यात एससी, एसटी, ओबीसी महिलांचे प्रमाण जास्त आहे. आत्महत्या होतात. त्याला जबाबदार राजकीय पक्ष आहेत. प्रशासनात ९७ टक्के उच्चवर्णीय आहेत. त्यांचीच हुकूमशाही आहे. त्यामुळेच समाजात संवेदनशीलता नष्ट झाल्याचे दिसते. ब्राम्हणीझम आणि भांडवलशाहीने देश पोखरला जात आहे.

महिलांना स्वातंत्र्य तर मिळाले. मात्र, विचारांना व्यक्त करण्याचे स्वातंत्र्य हिरावण्यात आले आहे. आम्हाला विचार करण्याचे स्वातंत्र्य आवश्यक आहे,  असे भैयाजी खैरकर म्हणाले.

अहमदाबादच्या मंजुला प्रदीप म्हणाल्या, देशातील महिला आज जे अधिकार उपभोगत आहेत, ते केवळ बाबासाहेबांमुळे. ७५ वर्षांपूर्वी महिलांनी अन्याय सहन केला. त्याचवेळी आम्ही सर्वानी दुसऱ्यांच्या दु:खात सहभाग घेतला. या ७५ वर्षांत का आम्ही एक होऊ शकलो? बाबासाहेबांचा विचार जिवंत ठेवायचा असेल तर आज सर्वानी एकत्र राहण्याची फारच गरज आहे. अन्यथा तेव्हासारखे अन्याय अत्याचार होण्यास वेळ लागणार नाही. एम.एस. जांभुळे यांचेही यावेळी भाषण झाले.

२२ ऑक्टोबरला१९४२ डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे एक ऐतिहासिक संमेलन आयोजित करण्यात आले होते. त्यावेळी मोठय़ा संख्येने महिला त्यात सहभागी झाल्या होत्या.

यात महिलांचे हक्क आणि अधिकारांवर चर्चा झाली. माधुरी गायधनी यांनी १९४२च्या परिषदेच्या प्रमुख मुद्यांवर प्रकाश टाकून त्या परिषदेच्या भव्यतेची माहिती दिली. त्यावेळी घटस्फोट, महिलांचे अधिकार, बहुपत्नीत्व, मजूर महिलांच्या अधिकारांच्या संदर्भात कायदा बनवण्याची जोरकस मागणी करण्यात आली होती. ७५व्या महिला क्रांतिकारी परिषद संमेलनाच्या अध्यक्षस्थानी बामसेफच्या राष्ट्रीय उपाध्यक्ष डॉ. मनीषा बांगर होत्या. प्रास्ताविक पुष्पा बौद्ध यांनी केले.

अखिल भारतीय महिला क्रांती परिषदेत प्रसिद्ध अभिनेत्री शबाना आजमी येणार असल्याचे जाहीर करण्यात आले होते. त्यामुळे दीक्षाभूमीवर अनेक नागरिक शबाना आजमी आल्या का? अशी विचारणा करीत होते. निमंत्रण पत्रिकेत शबाना आजमी उद्घाटन करणार असल्याचे म्हटले. मात्र, एंका इंग्रजी वर्तमानपत्राला दिलेल्या मुलाखतीत अशा कुठल्याही कार्यक्रमाचे मला निमंत्रण नाही आणि आयोजकांनी माझी संमती असल्याचे दाखवून द्यावे, अशी प्रतिक्रिया शबाना आजमी यांनी दिली आहे.