पुढील महिन्याच्या २३ तारखेपासून टोकियो ऑलिम्पिक स्पर्धांना सुरुवात होत आहे. या स्पर्धेत पदक मिळवणाऱ्या भारतीय खेळाडूंसाठी मणिपूर सरकारने रोख रकमेच्या बक्षीसांची घोषणा केली आहे. सुवर्णपक जिंकणाऱ्या खेळाडूला १.२ कोटी, रौप्यपदक जिंकणाऱ्या खेळाडूला १ कोटी तर कांस्यपदक आणणाऱ्या खेळाडूला ७५ लाख दिले जाणार आहेत. इतकेच नव्हे, तर राज्यातर्फे प्रत्येकी ऑलिम्पिकमध्ये देशाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या पाच खेळाडूंना २५ लाख रुपये दिले जातील. मणिपूरचे मुख्यमंत्री एन. बिरेन सिंह यांनी ही घोषणा केली.

मणिपूरव्यतिरिक्त तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन यांनीही आगामी ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकणाऱ्या खेळाडूंना तीन कोटी रुपयांचे रोख बक्षीस जाहीर केले आहे. जवाहरलाल नेहरू स्टेडियम येथे शनिवारी खेळाडू व खेळाडूंसाठी आयोजित खास कोविड लसीकरण शिबिराला संबोधित करताना मुख्यमंत्र्यांनी ही घोषणा केली.

 

हेही वाचा – सेटे कॉली जलतरण स्पर्धा : साजनचे ऐतिहासिक यश

स्टॅलिन म्हणाले, ”ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक विजेत्याला तीन कोटी, रौप्यपदक विजेत्यांना दोन कोटी आणि कांस्यपदक विजेत्यांना एक कोटी रुपये रोख देण्यात येणार आहेत.” नेत्रकुमानन, वरुण ठक्कर आणि तामिळनाडूतील के.सी. गणपती (नौकायन), जी. साथियान आणि शरथ कमल (टेबल टेनिस), सीए भवानी देवी (फेन्सिंग) आणि पॅरालिम्पियन टी. मारियप्पन यांनी ऑलिम्पिकसाठी पात्रता दर्शवली आहे.

सिंधू भारताची ध्वजवाहक?

भारताची आघाडीची बॅडमिंटनपटू आणि रिओ ऑलिम्पिक रौप्यपदक विजेती पी. व्ही. सिंधूकडे टोक्यो ऑलिम्पिकसाठी भारतीय पथकाच्या ध्वजवाहकाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. पुरुष ध्वजवाहकाची जबाबदारी भालाफेकपटू नीरज चोप्रा, टेबल टेनिसपटू शरथ कमाल, कुस्तीपटू बजरंग पुनिया आणि बॉक्सिंगपटू अमित पंघाल यांच्यापैकी एकाकडे सोपवली जाण्याची दाट शक्यता आहे.

यंदाच्या ऑलिम्पिकसाठी भारतीय पथकासह एक पुरुष आणि एक महिला अशा दोन ध्वजवाहकांची नियुक्ती करण्यात येणार आहे. याबाबतची अधिकृत घोषणा महिनाअखेरीस होणार आहे. मागी ऑलिम्पिक स्पध्रेत भारताच्या दोन जणांनी पदके जिंकली होती. यापैकी साक्षीला यंदा ऑलिम्पिक पात्रता गाठण्यात अपयशी आले आहे. त्यामुळे महिला ध्वजवाहकाच्या शर्यतीत सिंधूला आव्हान नसेल.