हरिणामधील पद्मश्री पुरस्कार प्राप्त मूकबधिर कुस्तीपटू विरेंद्र सिंहने दिल्लीतील हरियाणा भवनाबाहेर धरणे आंदोलन सुरू केले आहे. राज्यातील मूकबधिर खेळाडूंना पॅरा अॅथलीट्स म्हणून मान्यता देण्याची मागणी या कुस्तीपटूने हरियणाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांच्याकडे केली आहे.

विशेष म्हणजे कुस्तीपटू विरेंद्र सिंहचा मंगळवारी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी पद्मश्री पुरस्कार देऊन गौरव केला. त्यानंतर आज (बुधवार) विरेंद्र सिंह आपल्या सारख्या ‘डेफ’ खेळाडूंना पॅरा अॅथलीटचा दर्जा देण्याच्या मागणीसाठी दिल्लीतील हरियाणा भवनासमोर बसला आहे.

या कुस्तीपटूसोबत धरणे आंदोलनास बसलेला त्याचा भाऊ रामबीर याने सांगितले की, विरेंद्र सिंह पॅरा-अॅथलिट्स प्रमाणे मूकबधिर खेळाडूंना प्रोत्साहन आणि सरकारी नोकऱ्या देण्यासाठी अनेक वर्षांपासून हरियणाच्या मंत्र्याकडे जात आहेत. त्यांनी सांगितले की, २०१७ मध्ये राज्य सरकारने त्यांच्यासाठी सहा कोटींच्या प्रोत्साहन निधीची घोषणा केली होती, जो आतापर्यंत प्राप्त झालेला नाही. ग्रेड ए च्या नोकरीची घोषणा केली होती ती देखील मिळाली नाही. त्याच्याकडे ग्रेड सी ची नोकरी आहे.

कुस्तीपटू विरेंद्र सिंहचे वडील अजित सिंह, सीआयएएसएफमधून निवृत्त आहे आणि दिल्लीत एक आखाडा चालवत आहेत. खरंतर त्यांचे कुटुंब सासरौली गावात राहत आहे. विरेंद्र सिंहने डेफ ऑलिम्पिकमध्ये अनेकदा सुवर्ण पदक मिळवलेले आहे.