पालघर:  राज्यात कुष्ठरोग रुग्णांच्या संख्येत पालघर जिल्हा दुसऱ्या क्रमांकावर असून जिल्ह्यात एक हजार ३११ रुग्ण आहेत. कुष्ठरोग निर्मूलनासाठी आरोग्य विभागामार्फत विशेष मोहीम राबवल्या जातात. तरीही या रुग्णांच्या संख्येत वाढ कायम आहे.

मागील दोन वर्षांत दोन वेळा पालघर जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाकडून शोध मोहीम व तपासणी हाती घेण्यात आली होती. त्यामुळे हा आकडा समोर आला आहे.  पालघर जिल्ह्यातील एकूण एक हजार ३११ कुष्ठरोग रुग्णांपैकी२०७ बालकांना कुष्ठरोग जंतू संसर्ग झाल्याचे आढळले आहे. मुली, महिलांना कुष्ठरोग झाल्याचे प्रमाण ५१ टक्के तर लहान मुले, पुरुषांचे प्रमाण ४९ टक्के आहे. सध्या ७४५ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तर ५६६ रुग्णांवरील उपचार पूर्ण झाले आहेत. पालघर नगरपालिका हद्दीत ९ रुग्ण, डहाणू नगरपालिकेत ३, जव्हार नगरपालिकेत १, वसई-विरार महानगर पालिकेत ४५ तर जिल्ह्याच्या ग्रामीण, दुर्गम भागात तब्बल ६८७ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. 

कुष्ठरोग सहायक संचालक डॉ. संदीप गाडेकर यांना याबाबतच्या प्रतिक्रियेसाठी संपर्क केला असता त्यांनी प्रतिसाद दिला नाही.  कुष्ठरोग निर्मूलनासाठी अनेक उपाययोजना राबविण्यात येतात. आरोग्य कर्मचारी संशोधन, कुष्ठरोग रुग्ण शोधणे,  प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकाऱ्याकडे रुग्णांना निदान निश्चिती करिता पाठविणे, निदान निश्चिती सात दिवसांच्या आत करण्याबाबतच्या सक्त सूचना कुष्ठरोगाबाबतच्या आहेत.   

कुष्ठरोग काय आहे ?

अंगावर चट्टे येणे, चट्टे आलेल्या ठिकाणी चेतनक्षमता नसणे, हाता-पायांची बोटे टणक होणे आदी लक्षणे कुष्ठरोगाची आहेत. प्रामुख्याने परिधीय मज्जासंस्था, त्वचा, डोळे आणि शरीरातील इतर ऊती जसे की जाळीदार-एंडोथेलियल प्रणाली, हाडे आणि सांधे, श्लेष्मल पडदा, डोळे, स्नाायू, वृषण आणि अधिवृक्कांवर परिणाम करते. हा आजार संसर्गामुळे होत असला तरी कुष्ठरोगाच्या सततच्या संपर्कामुळे तो होण्याची शक्यता जास्त आहे. सहा महिन्यांच्या उपचारानंतर हा आजार बरा होऊ शकतो. आजारामुळे मृत्यू झाल्याच्या घटना नगण्य आहेत.