सोलापूर : मंगळवेढा तालुक्यातील नंदेश्वर गावात एकाच कुटुंबातील तीन महिलांचा निर्घृणपणे खून करण्यात आल्याची घटना उजेडात आली आहे. दरम्यान, या घटनेप्रकरणी पोलिसांनी एका संशयिताला ताब्यात घेतले आहे.

दीपाली बाळू माळी (वय २५), पारूबाई बाबाजी माळी (वय ४५) आणि संगीता महादेव माळी (वय ५०) अशी खून झालेल्या महिलांची नावे आहेत. या घटनेचे निश्चित कारण लगेचच स्पष्ट होऊ शकले नाही. या तिन्ही महिला आपल्या घरासमोरील अंगणात गंभीर जखमी अवस्थेत आढळून आल्या असता त्यांना तात्काळ नजीकच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु, उपचारापूर्वीच तिघींचा मृत्यू झाल्याचे घोषित करण्यात आले.

हेही वाचा – काँग्रेसचे प्रदेश सचिव सचिन साठे यांचा राजीनामा, पिंपरी पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीच्या उमेदवाराला फटका?

हेही वाचा – “भाजपासह गद्दारांना धडा शिकविण्यासाठी महाविकास आघाडीचा उमेदवार निवडून द्या”, आदित्य ठाकरेंचे आवाहन

मंगळवेढ्यापासून जवळच असलेल्या नंदेश्वर गावाच्या शिवारात माळी कुटुंबाची वस्ती आहे. दुपारी या वस्तीवर हे हत्याकांड घडले. तिन्ही महिलांच्या डोक्यात दगड घालून खून केल्याची प्राथमिक माहिती आहे. सोलापूर ग्रामीणचे अपर पोलीस अधीक्षक हिंमत जाधव, मंगळवेढा येथील उपविभागीय पोलीस अधिकारी राजश्री पाटील व मंगळवेढा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रणजित माने यांनी घटनास्थळी भेट देऊन गुन्ह्याची उकल होण्याच्या दृष्टीने निरीक्षण केले. घटनास्थळी श्वानपथकालाही पाचारण करण्यात आले होते.