शेतात मक्का पिकाची पाहणी करण्यासाठी जात असलेल्या शेतकऱ्यावर वाघाने हल्ला करून गंभीर जखमी केल्याची घटना रविवारी रात्री ९ वाजताच्या सुमारास सावली तालुक्यातील व्याहाड खुर्द उपवन परिक्षेत्रातील सामदा बूज वनबिटात घडली. राजू भिकाजी गव्हारे (३५) असे गंभीर जखमी झालेल्या शेतकऱ्याचे नाव आहे.

हेही वाचा >>>‘पैसे दे नाहीतर बायकोला विक’; देसाईगंजमधील सावकाराच्या ऑडियो क्लिपने खळबळ

राजू गव्हारे हे वैनगंगा नदीकाठावरील शेताकडे मका पिकाची पाहणी करण्यासाठी गेले असता, शेतपिकामध्ये दबा धरून बसलेल्या वाघाने त्यांच्यावर हल्ला चढवत गंभीर जखमी केले. आरडाओरड केल्याने गावकऱ्यांनी शेताकडे धाव घेऊन गंभीर जखमी झालेल्या शेतकऱ्यास उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.घटनेची माहिती वनविभागाला देण्यात आली आहे. या घटनेमुळे शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.