‘न्यू यॉर्कर’ हे साप्ताहिक वाचकांना दर आठवडय़ाला अधिकाधिक नवा अनुभव देणारी कथा छापण्याचा अट्टहास धरते. त्यामुळे तिथे पहिल्यांदाच झळकणारा कथाकार पुढले काही आठवडे वलयांकित म्हणून चर्चेत राहतो. सध्या हा मान ‘ली- चँग- डाँग’ या दक्षिण कोरियाई चित्रपट दिग्दर्शकाला मिळाला आहे. ‘ली- चँग- डाँग’ हा जगभरातील सिनेवर्तुळात बाँग- जून- हो किंवा किम- कि- डय़ुक यांच्याइतकाच प्रसिद्ध. त्याचे ‘बर्निग’, ‘पेपरिमट कॅण्डी’, ‘ओअ‍ॅसिस’ हे चित्रपट पूर्वेइतकेच पश्चिमेतील देशांतही लोकप्रिय. पण या दिग्दर्शकाची चित्रकर्ता होण्याआधीची ओळख ही लघुकथाकार म्हणून अधिक. तर ‘न्यू यॉर्कर’ने ‘ली- चँग- डाँग’ यांची १९८७ साली प्रकाशित झालेली ‘स्नोई डे’ ही कथा अनुवाद करून दोन आठवडय़ांपूर्वी प्रकाशित केली.

गेल्या तीन दशकांत जगात जे बदल झाले, त्या चक्रातून दक्षिण कोरियाईही गेले. पण एका विशिष्ट काळातील समाजजीवनाचे पडसाद या कथेत उमटले आहेत. कोरियाई चित्रपटांची दोन हजारोत्तर काळात वाढ होण्यास साहित्यातील कथासंस्कृती कशी कारणीभूत ठरली, याचा अंदाज या कथावाचनातून येऊ शकतो. तरुणपणाची काही वर्षे सक्तीची लष्करी सेवा द्यावी लागणाऱ्या देशांत (इस्रायलप्रमाणेच) कोरियाचाही समावेश होतो. ‘स्नोई डे’ कथेत लष्करी तळावर तैनात असलेल्या नवख्या आणि मुरलेल्या दोन सैनिकांचा एक अख्खा दिवस येतो. त्यांच्यात संवाद आणि विसंवाद दोन्ही घडतात. पण त्यातून मुलींना शिक्षण देण्याऐवजी कारखान्यात रोजंदारीला जुंपण्याच्या, मुलांना शाळा-कॉलेजात पाठवून वैचारिकदृष्टय़ा समृद्ध करण्याच्या कोरियाई पालकनीतीवर चर्चा होते. विद्यापीठात शिक्षण घेण्याबरोबरच लोकशाही आणण्यासाठी विद्यार्थ्यांच्या आंदोलनप्रवृत्तीकडे लक्ष वेधले जाते आणि लष्करी तळावर घडणाऱ्या घटनांनी ‘ओ-हेन्रीअ‍ॅटिक’ शेवट साधण्याचे लेखकाचे कौशल्यही दिसून येते.

‘तरुणपणी एकटेपणावर मात करण्यासाठी ज्या ईर्षेने मी सिनेमा दिग्दर्शित केला, त्याच तीव्रतेने मी कथाही लिहिल्या. जगाला गोष्ट सांगण्याची गरज मला लिहिते करत गेली. सिनेमा आणि लघुकथा ही दोन्ही वेगळी माध्यमे असली, तरी प्रत्येक सिनेमात मला नवी गोष्ट (लघुकथेसारखी) सांगायची ओढ असते,’ हे त्याने ‘न्यू यॉर्कर’ला दिलेल्या मुलाखतीत सांगितले. ‘ली- चँग- डाँग’ आता काही लघुकथा लिहीत नाही. पण त्याचा सिनेमा मात्र लघुकथा शिताफीने सांगायचे टाळत नाही.

ही कथा येथे वाचता येईल-

https://www.newyorker.com/magazine/2023/03/06/snowy-day-fiction-lee-chang-dong