राहाता: निमगाव कोऱ्हाळे येथील श्रद्धा सबुरी ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्थेत सन २००८ ते २०२४ या कालावधीत सभासदांची ४१ कोटी ९७ लाख रुपयांची फसवणूक केल्याच्या आरोपावरून संस्थेचे २० संचालक तसेच ८ अधिकारी व कर्मचारी अशा २८ जणांविरुद्ध शिर्डी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील दोन संचालकांना अटक करण्यात आली आहे.
तिघांपैकी एकाला कोपरगावच्या सत्र न्यायालयाने ५ दिवसांची पोलीस कोठडी तर दुसऱ्या संचालकास पोलिस कोठडीचा हक्क राखुन ठेवत न्यायालयीन कोठडी सुनावल्याची माहिती शिर्डीचे पोलिस निरीक्षक तथा तपासी अंमलदार रणजित गलांडे यांनी दिली. याबाबत सनदी लेखापाल दत्तात्रय बाळाजी खेमनर (रा. कोपरगाव) यांनी पोलिसांकडे फिर्याद दिली आहे.
श्रद्धा सबुरी ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्थेच्या २००८ ते २०२४ या कालावधीत संस्थेचे पदाधिकारी व कर्मचाऱ्यांनी संगनमत करुन वेळोवेळी रोजकिर्दप्रमाणे संस्थेकडे शिल्लक असलेली रोख रक्कम स्वतःसाठी वापरणे, मुदतठेव तारण कर्जठेव रकमेपेक्षा जास्त टाकणे, मुदतठेवेची मुदत संपलेली असतांना ती मुदतठेव कर्ज खात्याला वर्ग न करणे तसेच सभासद व ठेवीदारांना मुदतठेव पावत्या वेळेत न देणे, मुदतठेव नसतांना मुदतठेव तारण कर्ज नावे टाकणे, बँकेतून काढलेल्या रकमा संस्थेत जमा न करणे, मुदतठेव तारण कर्ज व्याज सुट देणे, इतर कर्ज व्याज सुट देणे, एकरकमी कर्ज भरतांना दिलेली व्याज सुट देणे, भरणा नसतांना बँकेला रक्कम नावे टाकणे, संगणक प्रणाली वेळोवेळी अद्ययावत न करणे, दिलेली कर्जे व थकबाकीची अद्ययावत नोंद न करता चुकीची थकबाकी व चुकीचा नफा दाखविणे, चुकीचे एनपीए दाखविणे यासारखे व्यवहार करुन एकुण ४१ कोटी ९७ लाख रुपयांची फसवणुक, अपहार व गैरव्यवहार केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
खेमनर यांच्या फिर्यादीनुसार शिर्डी पोलिसांनी कोपरगाव पंचायत समितीचे माजी सभापती स्व. सीताराम जयराम गाडेकर, त्यांचे चिरंजीव राजेंद्र गाडेकर, बाळासाहेब गाडेकर, यांच्यासह २० संचालक व संस्थेचे व्यवस्थापक, सहायक व्यवस्थापकासह ८ कर्मचारी अशा २८ जणांविरुद्ध महाराष्ट्र ठेवीदाराचे (वित्तीय संस्थामधील) हितसंबधाचे संरक्षण अधिनियमान्वये गुन्हा दाखल केला आहे. पतसंस्थेचे अध्यक्ष राजेंद्र गाडेकर व बाळासाहेब गाडेकर या दोघांना ताब्यात घेऊन त्यांना कोपरगावच्या सत्र न्यायालयासमोर हजर करण्यात आले. न्यायालयाने राजेंद्र गाडेकर यांना ५ दिवसांची पोलीस कोठडी तर बाळासाहेब गाडेकर हे आजारी असल्याने पोलिसांचा कोठडीचा हक्क राखुन ठेवत त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावली असल्याची माहिती पोलिस निरीक्षक गलांडे यांनी दिली.