पीटीआय, नवी दिल्ली

‘पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मणिपूर दौऱ्यामुळे शांतता आणि समरसतेला चालना मिळणार नसून, उलट हा दौरा हास्यास्पद ठरण्याची शक्यता आहे,’ अशी टीका काँग्रेसने शुक्रवारी केली. मोदी आज, शनिवारी मणिपूरच्या दौऱ्यावर आहेत.

मणिपूरमध्ये वांशिक संघर्ष उफाळून आल्यानंतरचा मोदींचा हा पहिला मणिपूर दौरा आहे. या दौऱ्यात चुराचंदपूर आणि इम्फाळ येथील विस्थापितांची मोदी भेट घेतील, अशी माहिती मुख्य सचिव पुनीत कुमार गोएल यांनी दिली. मोदींच्या या दौऱ्यावर टीका करताना काँग्रेसचे सरचिटणीस जयराम रमेश म्हणाले, ‘आता हे अधिकृत समजले आहे, की मोदी हे मणिपूरमध्ये तीस तास व्यतीत करणार आहेत. त्यांच्या या दौऱ्यामुळे शांततेला चालना मिळणार नसून, उलट तो हास्यास्पद ठरणार आहे.’

पंतप्रधानांच्या या दौऱ्यात ते साडेआठ हजार कोटी रुपयांच्या विकासकामांचे उद्घाटन करतील. काँग्रेसने मोदींच्या या घाईघाईच्या दौऱ्यावर यापूर्वीही टीका केली होती. मोदींचा हा दौरा म्हणजे मणिपुरी जनतेचा अपमान असल्याचे काँग्रेसने म्हटले होते. मणिपूरचे लोक २९ महिने पंतप्रधानांच्या भेटीच्या प्रतीक्षेत असल्याची टीका काँग्रेसने केली होती.