गर्भाचे आवडी मातेसी डोहाळा। तेथींचा जिव्हाळा तेथें बिंबे.. हा चरण स्वत:शीच गुणगुणल्यागत योगेंद्रनं म्हटला आणि तो काहीसा विचारमग्न होत म्हणाला..
योगेंद्र – गर्भाच्या आवडीप्रमाणे मातेला डोहाळे लागतात.. हृदू, पण मातेची उपमा तर सद्गुरूला आणि अर्भकाची उपमा त्यांच्या अनन्य शिष्याला दिली जाते.. मग इथे तो अर्थ का नसावा?
हृदयेंद्र – नीट विचार केलास आणि या चरणानंतर ‘‘काय सांगों झालें कांहीचिंया बाहीं। पुढें चाली नाहीं आवडीनें।।’’ हा चरण मी घेतला आहे हे लक्षात घेतलंस तर मग तुला वाटतो तो अर्थ इथे तरी लागू होत नाही, हे स्पष्ट होईल.. ओघानं सांगीनच.. पण तू म्हणतोस त्याप्रमाणे सद्गुरूला माउलीची आणि सद्शिष्याला अर्भकाची उपमा वापरतात हेही खरं आहे.. अनेक अभंगातही हे रूपक वापरलं आहे..
योगेंद्र – श्रीकुलदानंद ब्रह्मचारी म्हणून बंगालात एक थोर साक्षात्कारी पुरुष होऊन गेले. विजयकृष्ण गोस्वामीजी ऊर्फ जटियाबाबा हे त्यांचे सद्गुरू. या कुलदानंदांनी साधकावस्थेतले त्यांचे अनुभव रोज त्यांच्या डायरीत नोंदवले होते. ‘श्री श्री सद्गुरू संग’ या नावाने ते ग्रंथबद्ध आहेत.. त्यातला एक प्रसंग आठवतो.. आजारपणामुळे कुलदांचं शिक्षण सुटलं होतं.. पण एकदा काही दीर्घ काळासाठी त्यांना गोसाईजींपासून दूर जावं लागणार होतं.. सद्गुरूंपासून दूर गेलं तर भौतिकात पुन्हा खेचलो जाऊ, अशी भीती त्यांना होती. ते गोसाईजींना म्हणाले की, ‘‘माझी आंतरिक स्थिती अत्यंत वाईट आहे. जोवर तुमच्याजवळ होतो तोवर ठीक होतं. आता कोणत्या आंतरिक स्थितीत कुठे जाऊन पडावं लागेल आणि हातून काय घडेल, काही भरवंसा नाही..’’ गोसाईजी त्यांचं बोलणं तोडत म्हणाले की, ‘‘ तू तर गर्भस्थ संतान आहेस!’’ मी हे का सांगत आहे? तर सद्गुरू सद्शिष्याला गर्भस्थ बाळासारखं कसं पाहातात, हे लक्षात यावं.. पुढे गोसाईजी जे म्हणाले ते प्रत्येक साधकानं लक्षात ठेवण्यासारखं आहे.. कारण कुलदानंद शरीरानं दूर जात होते, पण सद्गुरू देहात होतेच.. तरी या दुराव्याची त्यांना भीती वाटत होती.. त्यांना गोसाईजींनी केलेला हा बोध सर्वच साधकांसाठी फार महत्त्वाचा आहे.. गोसाईजी म्हणाले, ‘‘ तू तर गर्भस्थ संतान आहेस.. तुला कसली चिंता? आईला ज्याप्रमाणे पोटातल्या बाळाची स्थिती लगेच जाणवते त्याचप्रमाणे सद्गुरूलाही शिष्याची प्रत्येक स्थिती, प्रत्येक हालचाल, प्रत्येक प्रयत्न तात्काळ जाणवतोच. मूल जोवर जन्मत नाही तोवर त्याच्यात कोणतीच क्षमता नसते.. आई जे काही खाते-पिते त्यानंच गर्भाची वाढ होत असते.. त्याचप्रमाणे गुरूला जे काही प्राप्त होतं त्यातला अंश गरजेनुसार शिष्याला मिळत राहातो.. मुलाचा जन्म झाल्यावर आईच मुलाला खाऊ घालते, त्याचं पालनपोषण करते.. जोवर मूल स्वत:हून चालू शकत नाही, खाऊ-पिऊ शकत नाही, तोवर आई त्याला दृष्टीआड होऊ देत नाही.. सदोदित आपल्या नजरेसमोरच त्याला ठेवते..’’ आता सद्गुरू माउलीचं वेगळेपण जटियाबाबा सांगतात.. ‘‘सद्गुरू मात्र शिष्य सिद्धावस्थेला पोहोचला तरीही त्याला दृष्टीआड होऊ देत नाहीत!! आईनं मुलाला जसं मांडीवर घ्यावं तसंच सिद्धावस्थेला पोहोचलेल्या शिष्यालाही सद्गुरू आपल्या मांडीवर घेतात.. त्या स्थितीत पोहोचलेल्या शिष्याचीही ते प्रत्येक क्षणी काळजी वाहात असतात!!’’ सद्गुरू माउलीचा जिव्हाळा खरा काय असतो, याची झलक गोसाईजींच्या या बोधातून दिसते..
हृदयेंद्र – नामदेव महाराजांचा एक अभंग आठवतो.. बहुदा आपल्या चर्चेत तो आलाय मागे..
योगेंद्र – कोणता? नुसता सांगू नकोस, गाऊनच दाखव..
हृदयेंद्र – (हसत) प्रयत्न करतो.. (घसा किंचित खाकरून डोळे मिटून अभंग डोळ्यासमोर आणण्याचा प्रयत्न करतो.. काही क्षण शांततेच सरतात.. मग हृदयेंद्र गंभीर स्वरात गाऊ लागतो..) तू माझी माउली मी वो तुझा तान्हा। पाजी प्रेमपान्हा पांडुरंगे।। तूं माझी माउली मी तुझें वासरूं। नको पान्हा चोरूं पांडुरंगे।। तूं माझी हरिणी मी तुझें पाडस। तोडी भवपाश पांडुरंगे।। तूं माझी पक्षिणी मी तुझे अंडज। चारा घाली मज पांडुरंगे।। कासवीची दृष्टी सदा बाळावरी। तैसी दया करी पांडुरंगे।। नामा म्हणे विठो भक्तीच्या वल्लभा। मागें पुढें उभा सांभाळिसी।।
> चैतन्य प्रेम