काय सांगों झालें कांहीचिंया बाहीं। पुढें चाली नाहीं आवडीनें!! हा चरण हृदयेंद्रनं उच्चारला आणि मग आपल्या मित्रांकडे हसत पहात त्यानं विचारलं..
हृदयेंद्र – अध्यात्माच्या मार्गावर कुणी गेलाच, तर त्याचे भवतालचे सगेसोयरे काय म्हणतात? ‘‘चांगला होता हो! पण काय सांगू? त्याला कुणी गुरुबिरु भेटला आणि काहीच्या बाहीच झालं हो त्याचं!’’
कर्मेद्र – (हसत) हो आम्हाला.. निदान मला तरी तसं वाटायचं तुझ्याबद्दल!
हृदयेंद्र – कारण तुला माझ्यापेक्षा कोमलची चिंता..
कर्मेद्र – एऽऽ विसर.. मी पण विसरलोय तिला..
ख्याति – कोण कोमल?
कर्मेद्र – आता तू कठोर नको होऊस!
योगेंद्र – (हसत) अगं हा कर्मू आम्हाला तीन र्वष ज्युनियर.. तरी बेटय़ानं हृदूची ओळख काढली, वाढविली.. मग आमच्याशीही मैत्री केली.. हृदूच्या घरी यायला-जायला लागला.. त्यामागचं खरं कारण आम्हाला फार नंतर कळलं.. हृदूच्या मजल्यावर ते कारण होतं.. पण मग हृदू वळला अध्यात्माकडे.. वाटलं संन्यासी होईल.. मजल्यावरच्याही सगळ्यांना वाटलं बरं का! तर या कर्मूला भीती की आपणही याच मार्गावर आहोत, असा गैरसमज व्हायचा लोकांचा! म्हणून हा हृदूला काळजीनं समजावू लागला..
कर्मेद्र – पण काही वाईट झालं का त्यामुळे तुमचं? एक चांगला धडाडीचा आणि मुख्य म्हणजे कोणत्याही गंभीर विचाराची बाधा न झाल्याने सदा आनंदित असलेला एक मित्र भेटला ना तुम्हाला? कोणतीही योग्यता, पात्रता नसताना.. म्हणजे तुमची!
हृदयेंद्र – बरं बरं मिळाला.. तर आता मुद्दय़ाकडे वळू..
कर्मेद्र – मुद्दा हाच होता की माणसानं देवाची पूजा करावी पण त्यासाठीच आयुष्य मिळालंय या कल्पनेची पूजा करीत राहू नये..
हृदयेंद्र – कर्मेद्र महाराज तुमचे विचार मी नंतर ऐकीन..
कर्मेद्र – हा नंतर कधी उगवणारच नाहीये.. ऐकवा..
हृदयेंद्र – (हसत आणि मग गंभीर होत) खरंच भ्रम, मोह आणि स्वार्थानं बरबटलेल्या माणसाच्या जीवनात खरा सद्गुरू येणं, त्याच्यावर विश्वास बसणं आणि त्यानं सांगितल्यानुसार जगण्याचा प्रयत्न करणं; या अगदी दुर्मीळ गोष्टी आहेत.. कधी एखाद्याला माणूस गुरू मानतो, पण तो खरा असतोच, असं नाही.. तो खरा असला तरी त्याचं महत्त्व कळतंच किंवा त्याच्यावर विश्वास बसतोच, असं नाही.. तो बसला तरी त्याच्या सांगण्यानुसार जगता येतंच असं नाही..
ज्ञानेंद्र – पण दुसऱ्या कुणाच्या सांगण्यानुसारच माणसानं का जगावं? कुणाची बौद्धिक गुलामी का पत्करावी? सद्गुरूंच्या आज्ञेबाबत शंका का घेऊ नये?
हृदयेंद्र – माणूस केवळ या एकाच नात्याबद्दल हे सर्व दावे करतो.. बाकीच्या जगण्यात? लहानांनी मोठय़ांचं ऐकलंच पाहिजे.. लहान मुलाला आपण बौद्धिक स्वातंत्र्य देतो का? आई-वडिलांच्या प्रत्येक सांगण्यावर मुलगा शंका घेऊ लागला, तर त्यांना आनंद होईल की राग येईल? इतकंच नाही, पत्नीनंही आपल्या सांगण्यानुसार वागावं, अशीच इच्छा असते ना? पतीनं आपल्याच इच्छेनुसार वागावं, अशी इच्छा असते ना?
योगेंद्र – पण मुलाच्या हिताचं तेच मोठे सांगतात ना?
हृदयेंद्र – मग सद्गुरूही माझ्या हिताचंच सांगत नसतील का? तिथे का शंका यावी? नुसतं वयानं वाढलो, म्हणून मला शंकेचं स्वातंत्र्य? त्यांचं अनुभवाचं, ज्ञानाचं, विवेकाचं मोठेपण मला का स्वीकारता येऊ नये? मी तर अनुभवानं सांगतो, त्यांच्या सांगण्यानुसार भौतिकातही वागण्यात वेळ आणि श्रमही वाचतात.. अनेकदा मी सोपी कामं अवघड करून ठेवली असतात.. सोपी परिस्थिती किचकट करून टाकली असते.. ते सांगतात तसं वागलं ना, तर गुंताच उरत नाही.. बरं ते असो.. पण ज्याला सद्गुरूचं महत्त्व किंचित कळू लागलं ना, त्याच्याही आयुष्यात बदल होऊ लागतो.. काय सांगों झालें कांहीचिंया बाहीं। पुढें चाली नाहीं आवडीनें।। काय सांगू हो? खरंच जीवनात काहीच्या बाहीच झालं.. आजवर मी ‘मी’पणानं जगत होतो, ‘मी’ आणि ‘माझे’ यापलीकडे नजर जात नव्हती.. या ‘मी’ला सुखावणारं, जोपासणारं जे काही आहे, ते मिळवण्यासाठी आणि टिकवण्यासाठीच मी धडपडत होतो.. आता काय सांगू हो? उरलेलं हे जे जीवन आहे ना, त्यात पूर्वीसारखं भवासक्तीच्या आवडीनं जगताच येत नाही..
>