News Flash

हृदयस्थ

गुरुत्वाचा निर्देशदेखील तुम्हीआम्ही ‘गुरुदेव’ अशा आदरयुक्त शब्दावलीने करत असतो.

‘गुरू’ ही मानवी देहधारी व्यक्ती गणायची की ते असते एक अरूप ‘तत्त्व’? साधकाने उपासना करायची ती ‘गुरूं’ची की ‘गुरुत्वा’ची? उपासकाने त्याच्या जीवनात महत्त्व कशाला द्यायचे- ‘गुरू परंपरे’ला की गुरुत्वाच्या ‘अधिष्ठाना’ला? शिष्याने जीवनभर गुरूंचे केवळ पूजन करावयाचे की गुरुत्वाच्या आदर्शाचे आचरण करण्याचा प्रयत्न करावयाचा?… प्रश्नांची ही मालिका तर कधीच न संपणारी. गुरुत्वाचा निर्देशदेखील तुम्हीआम्ही ‘गुरुदेव’ अशा आदरयुक्त शब्दावलीने करत असतो. ‘‘गुरुविण देव दुजा। पाहतां नाहीं त्रैलोकीं।’’ अशी निखळ साक्षच आहे ज्ञानदेवांची या संदर्भात. गुरू म्हणजे प्रत्यक्ष देवच, या भावाचे सूचन घडवते ‘गुरुदेव’ ही संज्ञा आपल्याला. देव व भक्त आणि गुरू व शिष्य या दोन जोड्यांच्या संदर्भात एक सूत्र समान दिसते. ते सूत्र होय द्वैताचे. गुरू आणि शिष्य ही दोन अस्तित्वे एकमेकांपासून वेगळी गणल्याखेरीज त्यांच्यादरम्यान नातेसंबंध नाही होत प्रस्थापित. तीच बाब देव आणि भक्त यांची. या दोघांमध्ये भेद नसेल तर भक्तीचा व्यवहारच नाही संभवत तिथे. आणि संभवावा तरी कसा? ‘देव’ आणि ‘भक्त’, ‘गुरू’ आणि ‘शिष्य’ ही पृथक अस्तित्वे नसतीलच मुदलात, तर तिथे पूजा अथवा सेवा कोणी, कोणाची आणि करावी तरी कशी? आता, एक मोठा रंजक आणि तितकाच विलक्षण प्रश्न उभा राहतो इथे. ज्ञानदेवांची जीवनविषयक दृष्टी ज्या तत्त्वदर्शनाच्या पायावर उभी आहे, ते दर्शन होय शैवागमाचे. अखिल विश्व हे एकाच तत्त्वाचे विलसन असेल, तर तिथे नाममात्र का होईना, परंतु द्वैत कसे संभवावे, हा प्रश्न बुचकळ्यात पाडणारा असाच नाही का? गंमत अशी आहे की, ‘गुरू’ हे तर ज्ञानदेवांच्या उभ्या अस्तित्वाचे गाभाकेंद्रच असल्याचा प्रत्यय त्यांच्या विचारविश्वात अक्षरश: पदोपदी येत राहतो आपल्याला. किंबहुना, माझ्या श्रीगुरूंच्या असीम कृपेमुळेच मी तरलो असा खुलासा- ‘‘ज्ञानदेव म्हणें तरलों तरलों। आतां उद्धरिलों गुरूकृपे।’’ अशा शब्दांत करत गुरुदेवांचे ऋण ज्ञानदेव शब्दांकित करतात त्यांच्या एका अभंगामध्ये. ‘जे तारून नेते ते तीर्थ’ अशीच ‘तीर्थ’ या संकल्पनेची व्याख्या आपल्या परंपरेत असल्यामुळे- ‘‘सकळही तीर्थे निवृत्तिचें पायीं। तेथें बुडी देई माझ्या मना।’’ असा उपदेशही करतात ज्ञानदेव आपल्या मनाला. श्रीगुरूंच्या चरणकमलाशी सकळ तीर्थांचा मेळ असल्यामुळे तिथे मनाने बुडी मारल्यामुळे सारा संभ्रम, अवघी भ्रांती दूर झाली असा स्वानुभवही ज्ञानदेवांनी नोंदविलेला आहे त्याच अभंगात. भ्रांती अथवा संभ्रम ही तर लक्षणे विवेकाच्या अभावाची. श्रीगुरूंचे चरणकमल म्हणजे विवेकतीर्थच होय, हे आहे ज्ञानदेवांचे स्वच्छ सूचन. आता, प्रत्येकाला जीवनात विवेकाचे अधिष्ठान गवसावे कोठे, असा प्रश्न उद्भवेल. ‘‘मज हृदयीं सद्गुरू। जेणें तारिलों हा संसारपुरू। म्हणोनि विशेषें अति आदरू। विवेकावरी।’’ इतके साधे आणि सरळ उत्तर आहे ज्ञानदेवांचे त्या प्रश्नाला. हृदयस्थ असणारी सारासार विवेकबुद्धी हेच होय दर्शन व अधिष्ठान गुरुत्वाचे, हा स्पष्ट सांगावा आहे ज्ञानदेवांचा. अद्वयाच्या तत्त्वदर्शनाशी सुसंगत असेच नाही का हे स्पष्टीकरण! – अभय टिळक

agtilak@gmail.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 22, 2021 12:14 am

Web Title: article guru the human body to count the person akp 94
Next Stories
1 कळस
2 एकादशी
3 आनंदभुवन
Just Now!
X