भजन हे तर भागवत धर्माचे वर्मच जणू. नवविध भक्तीचे विवरण श्रीमद्भागवतामध्येच आलेले असले, तरी पारडे काकणभर अधिकच झुकलेले दिसते नामचिंतनभक्तीकडे. नामस्मरण हे भागवताचे निव्वळ वर्मच नव्हे, तर वर्माचेही वर्म होय असे प्रतिपादन- ‘‘मुख्य वर्माचें हें वर्म। येणें साधे सकळ धर्म। एकाजनार्दनीं नाम। वासुदेव आवडी।’’ अशा शब्दांत नाथांचा ‘वासुदेव’ मोठ्या गौरवाने करताना दिसतो, त्याचे रहस्य हेच. कत्र्यापासून ते थेट कर्मापर्यंत ज्याची निरपवाद सत्ता नांदत असते तो परमात्माच भजनामध्ये विद्यमान असल्याने कर्मविपाकाचे शुक्लकाष्ठ भागवतधर्मीयाच्या मागे लागण्याचा प्रश्नच मुळापासून निकालात निघतो, ही बाब नाथराय या टप्प्यावर आवर्जून अधोरेखित करतात. ‘‘ऐसे आचरितां भागवतधर्म। बाधूं न शके कर्माकर्म। कर्मासी ज्याची आज्ञा नेम। तो पुरुषोत्तम भजनामाजी।’’ ही नाथांची निरपवाद ग्वाही या संदर्भात कळीची ठरते. भजनाच्या माध्यमातून ‘स्व’च्या जाणिवेचा संपूर्णत: विलय घडून आलेला असल्याने भागवतधर्मी कर्मसंन्यासी निष्काम बनतो. ‘आपल्याला काही तरी हवे’ किंवा ‘आपल्याला काही तरी मिळावे’ अशा कोणत्याही आत्मकेंद्रित भावनेचा पूर्ण अभावच असतो निष्कामतेमध्ये. अशा प्रगाढ निष्कामतेमध्ये स्थित झालेल्या कर्मसंन्याशाला कर्माचा संन्यास घेण्याचा मात्र अधिकार भागवत धर्म प्रदान करत नाही, ही या विचारव्यूहाची सर्वाधिक वैशिष्ट्यपूर्ण आणि तितकीच असाधारण बाब होय. कर्मसंन्यासी निष्काम असतो निष्क्रिय नव्हे! स्वत:ला काहीही मिळवायचे नसले तरी निष्काम अवस्थेला प्राप्त झालेल्या कर्मयोग्याने जगराहाटी सुरळीत चालू राहावी यासाठी कार्यरत राहिलेच पाहिजे, याबाबत भागवत धर्माचा आग्रहच आहे. किंबहुना, लोककल्याणासाठी कर्मप्रवण व्हावयाचे किंवा नाही, हा निष्काम भक्ताच्या मर्जीचा प्रश्न उरत नाही तर ते त्याचे अनिवार्य असे कर्तव्यच बनते ही जाणीव- ‘‘देखें प्राप्तार्थ जाहले। जे निष्कामता पावले। तयाही कर्तव्य असे उरलें। लोकांलागीं।’’ अशा पराकोटीच्या स्पष्ट शब्दांत करून देतात ज्ञानदेव त्यांच्या गीताटीकेच्या तिसऱ्या अध्यायात. भागवतधर्मीयाची भजनोपासना त्याला लोकव्यवहारापासून कदापिही विन्मुख बनवत नसते, हा नामभक्तीचा अत्यंत मूलभूत आणि आगळा पैलू ज्ञानदेव अधोरेखित करतात इथे. स्वत:च्या संकुचित संसारापासून मनाने विलग झालेला भागवत लोककल्याणाच्या असीम प्रेरणेने विश्वाच्या व्यापक प्रपंचाशी स्वत:ला जोडून घेत असतो या टप्प्यावर. ‘भक्ता’चे अवस्थांतर ‘संता’मध्ये घडून येण्याचा टप्पा नेमका कोणता असेल तर तो हाच. ‘संत’ या कोटीमध्ये अंतर्भूत झालेल्या विभूतीला कर्माचा त्याग करण्याची अनुमती भागवत धर्म मुळीसुद्धा देत नाही, त्यामागील इंगित हेच होय. उलट- ‘‘हें ऐसें असे स्वभावें। म्हणोनि कर्म न संडावें। विशेषें आचरावें। लागे संती।’’ असा ज्ञानदेवांचा रोकडा संदेशच आहे संतांच्या मांदियाळीला. ‘नामस्मरण’ आणि ‘लोकसंग्रह’ ही भागवत धर्माने प्रवर्तन केलेल्या भक्तीची दोन अंगे अशी संलग्न व पूरक होत परस्परांना. नामवेदाचे उद्गाते आणि आपले उभे उत्तरायुष्य समाजधारणेसाठी उत्तर भारतामध्ये व्यतीत करणाऱ्या नामदेवरायांच्या- ‘‘आम्हां सांपडलें वर्म। करूं भागवत धर्म।’’ या प्रतिज्ञेमागील संकेत येतो का आता ध्यानात? – अभय टिळक

agtilak@gmail.com