– अभय टिळक

समाजमन हे नाठाळ पोरासारखे असते. कोणतीही गोष्ट त्याला एकदा सांगून पटत नसते. अगदी त्याच्या हिताची बाब जरी पोटतिडिकीने सांगायला गेले तरी ते ऐकेलच याची खात्री देता येत नाही. ‘‘समाजास वळण लावून देणें हें कांहीं लहानसहान काम नव्हे,’’ असे उद्गार प्रयत्नवादाचा जणू वस्तुपाठच असणाऱ्या लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांनी काढावेत, यातच सर्व काही आले. न्यायमूर्ती रानडे यांच्याप्रमाणेच भागवत धर्माच्या मूल्यसंचिताशी लोकमान्यांचा उत्तम परिचय होता. उमेद न हरपू देता अखंड प्रयत्नशील राहणे, हादेखील भागवत धर्माचाच संस्कार होय. लोकांनी ऐको अगर न ऐको, समाजपुरुषाच्या अंतिम हिताची जी बाब आहे तिचे पाठ समाजमनस्क लोकशिक्षकाने नाउमेद न होता शिकवत राहिलीच पाहिजे, हा भागवत धर्माचा जणू दंडकच होय. ‘‘वाजतसे बोंब कोण्ही नायकती कानी’’ हे ज्ञानदेवांचे उद्गार त्याच प्रयत्नवादाचे द्योतन घडवितात. ही नाही तर निदान पुढची पिढी तरी शहाणी निपजेल, असा दुर्दम्य आशावाद पोटाशी बाळगून का होईना, पण शिकवत राहण्याचे आपले व्रत काही शिक्षकाने सोडता कामा नये, हा या परंपरेचा आग्रह पूर्वापार राहिलेला दिसतो. ज्ञानदेवच वर्णन करतात त्याप्रमाणे, अगदी- ‘‘आजा मेला पणजा मेला बाप मसणा गेला। देखत देखत नातु पणतु तोही वेडा जाला।’’ असाच अनुभव येत राहिला तरी समाजशिक्षकाने रतिभरही निराश व्हायचे नसते, हा रोकडा बोध संतांची मांदियाळी तिच्या आचरणाद्वारे प्रगट करते. समाजव्यवहाराचा पोत उन्नत बनावा या हेतूने लोकमानसाला वळण लावण्यासाठी झिजणाऱ्या शिक्षकाच्या ठिकाणी सर्वाधिक गरज कशाची असेल तर ती मातृहृदयाची. लेकराने कितीही अव्हेरले तरी उपदेशाचे चार शब्द त्याला ऐकवण्याचे आई काही सोडत नसते. पोराच्या हटवादीपणाचा, प्रसंगी तिला खेद होतो, राग येतो, आश्चर्य वाटते; परंतु त्याला समजावण्याचा आपला वसा ती माऊली काही केल्या उतत-मातत नाही. तुकोबांच्या ठिकाणी वसणारे नेमके तेच मातृहृदय- ‘‘वाटे या जनाचें थोर बा आश्चर्य। न करिती विचार कां हिताचा।’’ अशा शब्दांत व्यक्त होते. तर, सकाळी उठल्या-उठल्या मुखाने रामनामाचा एकवार उच्चार करा, इतकी साधी अपेक्षा जनलोकांकडून व्यक्त करणारा, तुकोबांचे धाकटे बंधू कान्होबारायांचा ‘वासुदेव’- ‘‘विनवितों सकळां जनां। कर जोडुनि थोरां लाहनां। दान इतुलें द्या मज दीना। ह्मणे तुकयाबंधु राम ह्मणा गा।’’ अशी विनवणी करत थेट पाया पडण्याइतपत विनयशील बनतो. ‘निराशा’ हा शब्दच जणू भागवत धर्माच्या बोधसंचितात नसावा. आणि असावा तरी कसा? उमटणारा प्रत्येक शब्द स्वत:मध्ये रिचवून टाकणाऱ्या आभाळाइतके ज्यांनी आपले अंतरंग विशाल बनवलेले आहे अशा लोकशिक्षक संतत्वाला निराशेचा स्पर्श व्हावा तरी कसा? ‘‘हा तों नव्हे कांहीं निराशेचा ठाव’’ हे भलाबुरा सर्व लोकव्यवहार समर्थपणे पचविणाऱ्या तुकोबांचे ऊर्जस्वल उद्गार त्याच असीम आशावादाचे मूर्तिमंत दर्शन नव्हे काय? तुका आकाशाएवढा का व कसा ते यावरून आता सहजच ध्यानात यावे.

agtilak@gmail.com