अभय टिळक agtilak@gmail.com

‘हित’ आणि ‘सुख’ या दोहोंचे नाते मोठे मजेशीर आहे. तशीच आणखी एक वैशिष्टय़पूर्ण जोडी म्हणजे ‘हित’ आणि ‘स्वार्थ’. व्यक्ती असो अथवा समाज, दोघांच्याही हिताची असणारी बाब सुखकारक असेलच याची खात्री नसते. अगदी याच न्यायाने, सकृद्दर्शनी सुखदायक वाटणारी एखादी गोष्ट अंतिमत: हितसंवर्धक ठरेल, याचीही हमी देता येत नाही. एक मात्र नि:संशय की, व्यष्टी आणि समष्टीचे हित व सुख परस्परांश्रयी असते. समोरच्याचे अहित करू न आपण आपल्या हितावर निखारा ठेवत असतो. तर, दुसऱ्याच्या सुखाला चूड लावून आपण आपल्याच सुखसमाधानाला खणती लावत असतो. हे समीकरण अतिशय स्पष्ट असल्यामुळेच ‘तुका ह्मणे सुख पराविया सुखें । अमृत हें मुखे स्त्रवतसे’ अशा शब्दांत तुकोबा ‘स्व- पर’हिताची आणि सुखाची जैविक सांगड अधोरेखित करतात. समाजाचे सुखसंवर्धन होण्यातच आपले सुख सामावलेले आहे, या जाणिवेतून जीवनक्रम व्यतीत करणे ही संतत्वाची आद्य खूण भागवत धर्मविचार शिरोधार्य मानतो त्यांमागील इंगित हेच. ‘हित’ आणि ‘स्वार्थ’ या दोहोंतील अतिशय सूक्ष्म परंतु मूलभूत असा गुणात्मक फरक दडलेला आहे तो नेमका इथेच. स्वत:च्या आणि दुसऱ्याच्याही दृष्टीने जे श्रेयस आहे त्याची जपणूक करणे यात ‘हित’ या संज्ञासंकल्पनेचा गाभा सामावलेला आहे. तर, केवळ स्वत:च्या आणि स्वत:च्याच लाभाचा विचार करत जगणे याला ‘स्वार्थ’ यांखेरीज अन्य नावच देता येत नाही. समाजपुरु षाने हितकर वर्तन करावे हाच हेतू, प्रसंगी अप्रिय वाटणारे बोल सुनावण्यामागे माझ्या मनीमानसी असतो, असे स्पष्ट करणारे ‘हितावरी यावें । कोणी बोलिलों या भावें’ हे तुकोबांचे उद्गार त्याच वास्तवाची साक्ष पुरवितात. अंत:करण शुद्ध करणे हाच ‘स्व- पर’ हिताच्या संवर्धनाचा पाया होय, हा तुकोबांचा निरपवाद सांगावा या संदर्भातील प्रत्येकाच्या जबाबदारीचे भान आणून देणारा असा आहे. ‘सकळांच्या पायां माझें दंडवत । आपुलालें चित्त शुद्ध करा’ हे तुकोबांचे त्याचसाठी कळकळीने केलेले आवाहन खुणावते का आपल्या अंतरंगाला? नामचिंतन या साधनाचा भागवतधर्माने केलेला पुरस्कार केवळ पारलौकिकाच्या पाठलागासाठीच आहे, ही आपली ठाम धारणा मुळापासूनच तपासून बघावयास हवी एकदा. नामस्मरणाची परिणती मनाचा पोत पालटण्यामध्ये घडून यावी, हे आहे अपेक्षित आमच्या संतपरंपरेला. व्यष्टी आणि समष्टीचे समग्र आणि अंतिम हित त्यांतच सामावलेले आहे, या वास्तवाकडे ‘हित तें करावें देवाचे चिंतन। करू नियां मन एकविध’ अशा शब्दांत तुकोबा आपले लक्ष वेधतात. नामचिंतनाद्वारे शुद्ध बनलेले मनच एकविध होऊ शकते. मानदंभासारख्या निकृष्ट बाबींना निवारा लाभत नसतो निर्मळ मनामध्येच. ‘ढोंग’, ‘सोंग’, ‘देखावा’ या साऱ्या अर्थच्छटा चिकटलेल्या आहेत ‘दंभ’ या शब्दाला. ‘स्व- पर’हिताला बाधक आणि परिणामी लौकिक जीवनाची लय विस्कटून टाकणारी मुख्य प्रवृत्ती म्हणजे व्यक्तिगत तसेच सामाजिक जीवनातील ढोंग. सोंगाढोंगापासून दूर राहणे, हीच सर्वतोपरी हितकर बाब होय आणि त्याची पूर्वअट असणारी चित्तशुद्धी साधण्यासाठी अहोरात्र प्रयत्नशील राहणे, ही वास्तवातील देवसेवा ठरते, हेच तुकोबा ‘हित व्हावें तरी दंभ दुरी ठेवा। चित्तशुद्धि सेवा देवाची हे’ अशा शब्दांत सांगत राहतात. घडते का अशी देवसेवा आपल्या हातून?