अभय टिळक agtilak@gmail.com
पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश या पंचमहाभुतांपैकी एका महाभुताचा कोप झाला तरी जो हलकल्लोळ माजतो त्यावरून त्याच्या ठायी वसणाऱ्या सामर्थ्यांची चुणूक आपल्याला येते. मग या पंचमहाभुतांवर ज्याची सत्ता चालते अशा अमित सामर्थ्यवान, सर्वसत्ताधीश भुताचा महिमा काय वर्णावा? हेदेखील एक त्रराशिकच! पंचमहाभुतांचा जनक असणारे एक जबरदस्त भूत पंढरी क्षेत्रामध्ये ठाण मांडून राहिलेले आहे आणि आपल्या अतुलनीय प्रभावाने अवघी पंढरीपेठ त्याने पार झडपून टाकलेली आहे, असा सावधगिरीचा इशारा देतात तुकोबाराय त्यांच्या एका अवीट अभंगात सर्वाना. त्यामुळे आपापल्या जबाबदारीवर ज्याने त्याने पंढरीच्या सीमेत पाऊल घालावे. कारण त्या जबरदस्त भुताच्या प्रभावक्षेत्रात प्रवेशलेला एकदी जीवमात्र परतून आल्याचे आजवर कोणी पाहिलेले नाही, अशी पुस्तीही जोडतात तुकोबाराय अभंगात पुढे. ‘पंढरीचें बा भूत मोटें।  आल्या गेल्या झडपी वाटे।   तेथें जाऊं नका कोणी। गेले नाहीं आले परतोनि’ अशा शब्दांत धोक्याचा बावटाच फडकवतात तुकोबाराय जणू! ‘पंढरपूर’ नामक प्रेमनगराची वारी आयुष्यात एकदा तरी मनोभावे करणाऱ्या साधकाला कधीही भंग न पावणाऱ्या अव्यत्य प्रेमसमाधीचा अनुभव का येतो याचे गुपितच उघडे करत आहेत तुकोबाराय इथे. एकदा का त्या अक्षय, अभंग प्रेमसमाधीमध्ये निका वारकरी निमग्न झाला की तो पुनश्च एकवार देहभावावर आलेला कोणीही पाहिलेला नाही, हेच सुचवायचे आहे तुकोबारायांना. कोणी एखादा निर्मळ उपासक त्याच्या कक्षेत प्रवेशला की तो प्रेमपाशाने करकचून आवळला गेलाच म्हणून समजावे! किंबहुना, त्यासाठीच केवळ हातामध्ये प्रेमपाश घेऊन पंचमहाभुतांचा हा जनिता वैकुंठाहून  पंढरीक्षेत्री येता झालेला आहे, असा दावाच आहे ठाम तुकोबांचा यासंदर्भात. ‘मैंद आला पंढरीस। हातीं घेऊनि प्रेमपाश’ हे महाराजांचे उद्गार विलक्षण सूचक होत यासंदर्भात. ‘मैंद’ म्हणजे ‘धूर्त’ अथवा ‘लबाड.’ पंढरीक्षेत्रात अवतरलेले हे भूत केवळ एकदेशीच आहे असेही नाही. ते आहे कालातीत, सर्वसंचारी आणि सर्वव्यापक. ‘एका जनार्दनी भूत। सर्व ठायीं सदोदित’ हे पैठणनिवासी नाथरायांचे अनुभूतीसंपन्न उद्गार साक्ष पुरवितात त्याच वास्तवाची. वरकड भुताने पछाडले एखाद्याला तर त्याची बुद्धी पार चळते. त्याचे सुरू होतात वेडेचार. आवरत नसते मग कोणासही भुताने पकडलेले ते झाड. मात्र, पंढरीच्या या भुताची बातच न्यारी! ते ज्याला पछाडते त्याची चिरंतन सुटका होते उपाधीच्या बाधेमधून. विशुद्ध अशा निरुपाधिक प्रेमसमाधीचा सुखानंद लाभतो त्या उपासकाला. उतरतच नाही मग ती समाधी कधीच. थोरामोठय़ांनी त्या समाधिसुखाची लज्जत चाखल्याचे अनंत दाखले गवसतात पुराणांतरी. ‘अंबरीष रूक्मांगदा।  मयूरध्वजाची थोर आपदा। हनुमंता झाली थोर बाधा। तोचि नाचे समाधी सदा’ अशी काही उदाहरणे देतात वानगीदाखल नाथराय आपल्याला यासंदर्भात. अशा या अ-साधारण भुतावर ज्याची मात्रा चालते असा एकमात्र देवऋषी म्हणजे पुंडलिकराय! ‘नाहीं राहत एके स्थानीं। सद्या होतें गोवर्धनीं। ते बा पुंडलिकें मंत्रोनी। उभें केलें येथें आणोनी’ असे गौरवोद्गार पुंडलिकराय आणि पुंडरीक क्षेत्र गणले जाणारे पंढरपूर यांच्या संदर्भात नाथराय का काढतात त्याचा आणखी खुलासा करण्याची आता गरज आहे का?