News Flash

दादरा

घरोघरी वाळवणांची ताटे अंगणात अथवा गच्चीवर पसरलेली. त्यांत खास ‘लोणच्याच्या कैऱ्या’ आल्या की विचारूच नका!

(संग्रहित छायाचित्र)

– अभय टिळक

‘तुमच्या घरात उन्हाळ्याच्या कामांची आत्ता अगदी धांदल उडालेली असेल, नाही का?,’ असा प्रश्न शाळकरी वयातील आजच्या एखाद्या मुलाला विचारला, तर त्याच्या चेहऱ्यावरील सुरकुतीदेखील हलणार नाही. यात त्याचा दोष नाही. आजचा जमानाच आहे ‘इन्स्टंट फूड्स’चा!  परंतु उन्हाळा आला, की मागील पिढ्यांमधील गृहिणींची कामाची कोण हातघाई उडायची! पापड, पापड्या, कुरडया, सांडगे, मसाले… एक ना दोन नाना पदार्थ! घरोघरी वाळवणांची ताटे अंगणात अथवा गच्चीवर पसरलेली. त्यांत खास ‘लोणच्याच्या कैऱ्या’ आल्या की विचारूच नका! संपूर्ण वर्षासाठी ताज्या कैऱ्यांचे लोणचे घालायचे. त्यासाठी मोठ्या घाटाच्या चिनीमातीच्या बरण्या. त्या चांगल्या कोरड्या करायच्या. लोणचे त्यात भरायचे. वर तेलाचा थर द्यायचा आणि ते चांगले मुरेपर्यंत त्याला सूक्ष्म जिवाणूंचा संसर्ग होऊ नये यासाठी त्या बरण्यांची तोंडे तलम सुती कापडाच्या तुकड्यांनी गच्च बांधून टाकायची! अशी दादरा बांधलेली लोणच्यांची बरणी एकदा का फडताळात विराजमान झाली की मग दक्ष गृहिणी नि:श्वास सोडत असे, लोणचे चांगले वर्षभर टिकण्याची बेगमी एकदाची झाली म्हणून! सूक्ष्म जंतूंचा संसर्ग होऊ नये यासाठी लोणच्याच्या बरणीलाच काय तेवढी दादऱ्याची गरज असते, असे अजिबात नाही. परमतत्त्वाच्या प्रसादरूपाने ओंजळीत पडलेले वैराग्य आणि गुरुतत्त्वाच्या जीवनातील आपोआप घडून आलेल्या प्रवेशाद्वारे अंकुरलेला विवेक यांच्या साहचर्याद्वारे परिष्कृत झालेल्या बुद्धीलादेखील अवांछनीय वृत्ती-प्रवृत्तींचे लेप पुन्हा चढू नये यासाठी दादरा बांधण्याची गरज असते. शुद्ध झालेली बुद्धी निद्र्वंद्व अवस्थेमध्ये पक्की स्थिरावेपर्यंत तिला लोकव्यवहारापासून अस्पर्शित राखण्यासाठी दक्ष आणि डोळस उपासक अभ्यासाच्या या टप्प्यावर एकांतवास स्वीकारतो. जनसंपर्कापासून काही काळ तरी दूर राहणे, हाच बुद्धीला बांधण्याचा त्याच्यालेखी दादरा असतो. लोणचे एकदा का चांगले मुरले, की दादऱ्याची मातबरी फारशी वाटत नाही. अगदी त्याच न्यायाने विवेकरूपी नदीच्या प्रवाहात चांगली धुऊन स्वच्छ, शुद्ध केलेली बुद्धी वैराग्यात मुरेपर्यंत तिला एकांतवासाचा दादरा आवश्यक भासतो. त्याचसाठी अभ्यासकाने अंगीकारलेल्या विजनवासाचे- ‘‘गजबजा सांडिलिया। वसवी वनस्थळिया। अंगाचियाचि मांदिया। एकलेया।’’ अशा शब्दांत सम्यक वर्णन करतात ज्ञानदेव १८ व्या अध्यायात. भालचंद्र, घोरावडेश्वर आणि भंडारा या तीन डोंगरांवर साधनाकाळात तुकोबा वारंवार जात असत, त्यामागील गमक हेच. दहावी अथवा बारावीची परीक्षा जवळ आल्यानंतर एखादा मनस्वी विद्यार्थी स्वत:ला अभ्यासाच्या खोलीमध्ये बंद करून घेतो, अगदी तसेच हे. अन्य एकाही विक्षेपक विचाराला मनाकडे फिरकूही द्यायचे नाही, असा वज्रनिर्धार केलेल्या अशा साधकाची मनोवस्था- ‘‘आणि मनाचा उंबरा। वृत्तीसी देखों नेदी वीरा। तेथ कें वाग्व्यापारा। अवकाशु असे?।’’ इतक्या मार्मिक आणि प्रगल्भ शैलीत ज्ञानदेव वर्णन करतात. विवेक आणि वैराग्याने शुचिर्भूत होऊन स्थिर बनलेल्या त्या विमलमनबुद्धीचा उंबराही क्षुल्लक विचारवृत्तींच्या नजरेस पडत नसतो. तिथे त्या विचारवृत्तींना मनबुद्धीच्या अंतरंगात प्रवेश मिळण्याची बातच सोडा, हेच ज्ञानदेवांना सुचवायचे आहे इथे. ‘‘याजसाठीं वनांतरा। जातों सांडूनियां घरा। माझें दिठावेल प्रेम। बुद्धी होईल निष्काम।’’ असे उद्गार काढणारे तुकोबा नेमक्या त्याच मनोवस्थेकडे निर्देश करत नाहीत का!

agtilak@gmail.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 6, 2021 12:06 am

Web Title: loksatta dadra advayabodh article abn 97
Next Stories
1 अंकुर
2 मग श्रीगुरू आपैसा भेटेचि गा…
3 ओळखण
Just Now!
X