– अभय टिळक

विड्याची पाने का सडली?… भाकरी का करपली?… घोडा का अडला?- तीन प्रश्न. मात्र तीनही प्रश्नांचे उत्तर एकच : फिरवले नाही म्हणून…! बादशहा आणि बिरबलाची ही प्रख्यात गोष्ट. आपल्यापैकी बहुतेकांनी लहानपणी ऐकलेली. एक उत्तम बोधकथा. एकच उत्तर असणारे असे एकापेक्षा अधिक प्रश्न केवळ प्रपंचातच उद्भवतात असे काही नाही. अध्यात्माचा अथवा परमार्थाचा प्रांतही त्याला अजिबात अपवाद म्हणता येत नाही. मन निश्चल का राहात नाही?… बुद्धी अंतर्मुख का बनत नाही?… वृत्ती एकाकार का होत नाही?- पुन्हा प्रश्न तीन. तिघांचेही उत्तर मात्र एकच : शुद्ध नाही म्हणून…! प्रश्नोत्तरांचा हा सारा खटाटोप कशासाठी करायचा, असाही प्रश्न एखाद्याच्या मनात स्वाभाविकपणे उमटावा. त्याला कारण आहे. मन अथवा बुद्धी शुद्ध बनल्याखेरीज स्थिर राहात नाही, म्हणून हा निवाडा प्रथम अत्यावश्यक ठरतो. अर्थात, इथेही अडचण आहेच. मन स्थिर होत नाही म्हणून त्याच्यावर शुद्धीकरणाचे संस्कार घडवून आणणे दुरापास्त बनते, की मुदलातच मन अशुद्ध असल्यामुळे ते स्थिर होत नाही- असाही, स्वत:भोवती गरगर फिरणारा आणि विचार करणाऱ्याला गरगरवून सोडणारा प्रश्न यातूनच निर्माण होतो. या बाबतीत मात्र भागवत धर्मविचाराची पताका खांद्यावर मिरविणाऱ्या संतमंडळाचा निर्वाळा एकमुखी होय. मन काय किंवा बुद्धी काय, शुद्धी अथवा शुचिता ही स्थैर्याची अनिवार्य अशी पूर्वअट ठरते, हा तो निर्णय. वैराग्याची महत्ता प्रस्थापित होते ती नेमकी याच संदर्भात. त्रिगुणांपैकी तम आणि रज या दोन गुणांची एकावर एक चढत आलेली पुटे वैराग्याच्या धगीने आहाळली की बुद्धी निर्मळ बनते, असा ज्ञानदेवांचा या संदर्भातील सांगावा. हीण जळून जावे म्हणून सोनार ज्याप्रमाणे सोने चांगल्या रसरसून पेटलेल्या भट्टीतून एकदा झाळून घेतो, तशीच ही प्रक्रिया. म्हणजे धारण केलेले वैराग्य किती टिकाऊ आहे अथवा कितपत कडकडीत आहे यापेक्षाही त्या वैराग्याचा बुद्धीच्या पोतावर अपेक्षित असणारा परिणाम किती बावनकशी आहे, हे महत्त्वाचे. ध्येयप्राप्ती होईपर्यंत त्या दिशेने मार्गरत राहण्याइतपत बुद्धीची स्थिरता अस्सल आणि अव्वल नसेल तर सगळेच मुसळ केरात. ‘‘जियें वैराग्य एणें बोलें। मागां संसिद्धी रूप केलें। किंबहुना तें आपुलें। मेलवीं खागें।’’ अशा शब्दांत ज्ञानदेव नेमके तेच तर सांगत आहेत. वैराग्यामुळे शुद्ध सत्त्वाला प्राप्त झालेली बुद्धी साधकाला त्याच्या सर्वोच्च ध्येयाशी एकरूप करेपर्यंत निर्धारित मार्गावरून ढळत नसते, हा ज्ञानदेवांचा निरपवाद निर्वाळा होय. शुद्धीमुळे स्थिरता लाभलेल्या अशा त्या बुद्धीला दृढपणे पकडून राहिल्याने उपासकाला जे हस्तगत होते, त्याचे विवरण- ‘‘जींतलेयां हें भोए। पुरुषु सर्वत्र जैसा आहे। कां जाला हीं जें लाहे। तें आतां सांघों।’’ अशा शब्दांत ज्ञानदेव करतात. चराचरामध्ये एकच तत्त्व अंतर्बाह््य ओतप्रोत भरून उरलेले आहे, ही ओळख शुद्ध आणि स्थिर झालेल्या बुद्धीला पटू लागते, हे ज्ञानदेवांचे या संदर्भातील प्रतिपादन. एकदेशी विटेवर उभे ठाकलेले तत्त्वच विश्वात्मकपणे प्रगटलेले आहे, याची पटलेली साक्ष मुखर करणारे- ‘‘तुका म्हणे नेत्रीं केलें ओळखण। साजिरें तें ध्यान विटेवरी’’ हे तुकोबांचे कथन म्हणजे याच अनुभवाचा रोकडा उच्चार नव्हे का!

JNU Vice Chancellor Santishree Pandit
“नेहरू, इंदिरा गांधी मूर्ख नव्हते, देशाला एका साच्यात बसवणं अशक्य”, जेएनयूच्या कुलगुरूंची स्पष्टोक्ती
flowers, plant flowers,
निसर्गलिपी : हिरवा कोपरा
Loksatta vyaktivedh economics Nobel Prize Standards Daniel Kahneman
व्यक्तिवेध: डॅनिएल कानेमान
Why Women Become Nicotine Dependent Faster
पुरुषांपेक्षा स्त्रिया करतात जास्त धूम्रपान; सिगारेटची सवय सुटणं होतं कठीण, अहवालातून धक्कादायक माहिती समोर

agtilak@gmail.com