05 March 2021

News Flash

शब्द यावा उजळून..

संमेलनाध्यक्षपदी अरुणा ढेरे यांच्या निवडीमुळे साहित्य संमेलनाकडे पुन्हा एकदा निखळ वाङ्मयप्रेमींची पावले वळतील..

अरुणा ढेरे

संमेलनाध्यक्षपदी अरुणा ढेरे यांच्या निवडीमुळे साहित्य संमेलनाकडे पुन्हा एकदा निखळ वाङ्मयप्रेमींची पावले वळतील..

साहित्यापेक्षा साहित्यबाह्य़ उपद्व्यापांसाठीच आपला लौकिक राखून असणाऱ्या अ. भा. साहित्य महामंडळाचे अभिनंदन करण्याची संधी मिळेल असे खऱ्या साहित्यप्रेमींना कधी वाटलेही नसेल. पण तो क्षण आला आहे. आगामी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी कवयित्री, लेखिका आणि मुख्य म्हणजे शब्द, भाषा आणि संस्कृती यांवर व्रतस्थ प्रेम करणाऱ्या अरुणा ढेरे यांची निवड ही या महामंडळाची नि:संशय अभिनंदनीय कृती. सरस्वतीच्या अंगणात शहाणपणा पुन्हा एकदा रुजू शकतो अशी आशा वाङ्मयप्रेमींच्या मनात फुलवणारी. त्यासाठी या महामंडळाचे अभिनंदन. विंदा, श्रीना, इंदिरा संत, रा. चिं. ढेरे अशा मराठी सारस्वताच्या अंगणातील वटवृक्षांना संमेलनाच्या अध्यक्षपदी मानाने बसवण्याचा मोठेपणा या महामंडळास कधी दाखवता आला नाही. या मोठय़ा साहित्यिकांना निवडणुका लढवण्याचा कसला कमीपणा, असा प्रश्न या महामंडळातील झारीचे शुक्राचार्य त्या वेळी विचारीत. कोणत्याही व्यवस्थेत कोणतीही निवड प्रक्रिया कधीही परिपूर्ण नसतेच. निवडणुकीच्या पद्धतीत एखाद्याची फक्त मते मिळवण्याची  क्षमता तेवढी सिद्ध होऊ शकते. आणि एकदा का फक्त मते मिळवणे इतकेच ईप्सित झाले की कोणताही सोम्यागोम्या कोणत्याही पदावर विराजमान होऊ शकतो. इंदिरा संतांच्या निवडणूक पराभवाने हे सत्य समोर आले आणि गेल्या काही वर्षांतील अध्यक्षांनी तेच सिद्ध केले. या पाश्र्वभूमीवर अरुणा ढेरे यांच्यासारख्यांची निवड अध्यक्षपदी करून महामंडळाने सरस्वतीच्या दरबारातील सारेच दीप कसे मंदावले आता.. असे म्हणावे अशी परिस्थिती नाही, हे दाखवून दिले. हे शहाणपण आता अधिक जोमाने वाढावे.

या शहाण्या वेलीचे पहिलेच फळ अरुणा ढेरे यांच्या ओंजळीत अलगद पडले. अरुणा ढेरे या अशा काळच्या कवयित्री आहेत की त्या काळाचा काव्याशी संबंध उत्तरोत्तर विरू लागला आहे. मराठीत कवी थोडे, कवडे फार अशी अवस्था असल्याची टीका आचार्य अत्रे यांनी एके काळी केली होती. आता तितक्या संख्येने कवडेही राहिलेले नाहीत. मराठी अभिजन अजूनही त्यामुळे एके काळच्या बहरावर आपली काव्य तहान भागवत असतात. यामागे कारणे अनेक. संस्कृतीवर चहूबाजूंनी होणारे बाजारपेठेचे आक्रमण, त्यात भाषेला लागलेली चलनाची चटक आणि एकंदरच संस्कृतीची गरजच काय असा प्रश्न विचारणारे वातावरण. संस्कृतीपेक्षा श्रीमंतीचे महत्त्व अतोनात वाढलेले दिसते तो हा काळ. या काळात आपले अख्खे आयुष्य विठ्ठल एक महासमन्वय हे सिद्ध करण्यात आणि लोकदैवतांचा शोध घेण्यात व्यतीत करणाऱ्या राचिंची अरुणा ही कन्या. हे असे गाडून घेत एखाद्या विषयाचा ध्यास लावून घेण्याची एके काळची मराठी वृत्ती मागे पडूनही बराच काळ झाला. ज्ञानकोशकार केतकर, दत्तो वामन आदी अनेक ऋषितुल्य व्यक्तिमत्त्वे व्यावहारिक जगास मागे सोडून आपापल्या ज्ञानशाखेचा विस्तार करण्यात आयुष्य उधळून देत. त्या उदात्त परंपरेतील शेवटचा धागा दीड वर्षांपूर्वी राचिंच्या निधनाने तुटला. आपले सांस्कृतिक दारिद्रय़ इतके महान की त्यांच्या निधनानंतर त्यांच्या अवाढव्य ग्रंथसाठय़ाचे करायचे तरी काय, असा प्रश्न या महाराष्ट्रास पडला. जर्मन विद्यापीठाने हा ग्रंथसाठा स्वखर्चाने दत्तक घेण्याची तयारी दाखवल्यावरही या महान वगरे राज्यास खजील व्हावे असेही वाटले नाही. पुढच्या वर्षी होऊ घातलेल्या साहित्य संमेलनाची ही अध्यक्षा त्या वेळी या पुस्तकांना चांगले घर मिळावे यासाठी एके काळी पूर्वेचे ऑक्सफर्ड म्हणवून घेणाऱ्या पुण्यात प्रयत्नांची पराकाष्ठा करीत होती. अर्थात ज्या पुण्यात भांडारकर संस्थेवरील हल्ल्याचे काहीच वाटत नसेल तेथे कोणा लेखक संशोधकाच्या ग्रंथसंग्रहाची काय इतकी मातबरी. अशा वेळी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद अरुणा ढेरे यांना मानाने मिळणे हे संस्कृतीने सरस्वतीची दिलेली नुकसानभरपाई ठरते.

अरुणा ढेरे यांनी अनेक वाङ्मय प्रकार हाताळले. पण त्या सर्वात पुरून उरतात त्या कवयित्री म्हणून. इंदिरा संत, शांता शेळके यांच्या कवितेशी त्यांची नाळ जुळते. त्यातून त्यांची एक वेगळीच स्वतंत्र ओळख तयार झालेली दिसते. परंतु इंदिराबाईंच्या कवितेतील हळवा निसर्ग अरुणा ढेरे यांच्या कवितेत सातत्याने डोकावत नाही आणि त्यातील स्त्री वेदनेची असहायताही ही कविता मांडत नाही किंवा शांताबाईंच्या कवितेत एक संस्कृतप्रचुरता आढळे. त्यांच्या अनेक कवितांचे गाणेही झाले. त्या तुलनेत अरुणा ढेरे यांची कविता या सगळ्यापासून काहीशी अंतर राखून आहे. ती सहज येताजाता भेटली असे होत नाही. मुद्दाम आवर्जून वेळ काढून एखाद्या मत्रिणीस भेटायला जावे तसे अरुणा ढेरे यांच्या कवितेचे आहे. भेटली की न भेटलेपणाचा राग अलगद दूर व्हावा तसा आनंद ही कविता देते.

नख एकटेपणाचे

जेव्हा लागते गळ्याला

तेव्हा सोसलेली दु:खे

पुन्हा येतात फळाला..

असे ही कविता सहज सांगते. परत कौतुकाची बाब म्हणजे या दु:खाचा सोहळा ही कविता मांडत नाही. ती फक्त त्या वेदनेची जाणीव करून देते आणि आपली वेदना ही इतरांपेक्षा फार मोठी, अधिक वेगळी म्हणून मिरवतही नाही. त्यामुळे इतरांच्या वेदनेचा सांधा अरुणा ढेरे यांच्या कवितेतील वेदनेशी सहज जुळून जातो आणि काव्यरसिक आणि कविता हे एकजीव होतात.

मिटवुन सुख माझे मी उभी स्तब्ध आता

अपरिमित कृपेचा रे टिळा लाव आता..

अशी करुणाष्टकी भावना ही कविता सहज व्यक्त करते. तिच्यात ना कोणता अभिनिवेश ना आवेश. ती फक्त मानवी नात्यांशी, त्यातील सहभावनेशी नाते सांगते. हे नातेही कसे?

मला माहीत आहे, समाजाला नाही पचत

नुसत्या नात्याचे असणे

अन् समूहमनाला नाहीच कळत

अंतरात खोलवर जागलेल्या जाणिवेचे

फुलणे.. सलणे.. जीवघेणे.

हे वास्तव ही कविता मान्य करते. पण तरीदेखील,

आपल्या अंतरप्रतीतीधर्मावर माझा विश्वास आहे.

मग, तुझ्या माझ्या नात्याचा निदर्शक शब्द

कोणताही असला, तरी काय हरकत आहे?

असा प्रश्न ती जेव्हा विचारते तेव्हा वाचकालाही हा प्रश्न हेच उत्तर आहे हे पटलेले असते. अरुणा ढेरे यांचा स्वभाव आक्रस्ताळा नाही आणि प्रत्येक प्रश्नाचे उत्तर आपल्याकडे आहे किंवा ते आपल्याला शोधायलाच हवे असा त्यांचा आग्रहदेखील नाही. हे समंजस संयतपण त्यांच्या कवितेतही आढळते. अध्र्या वयातल्या कुणा पोरीचा देह वणव्यात होरपळावा तसा होरपळून संपतो हे ती कविता पाहते. पण..

गळून जाण्याच्या भीतीनं व्याकुळ पाकळ्यांनी

स्वत:मधल्या पोकळीलाच थरथरून पांघरून घ्यावं,

तसे शब्द पांघरून लपू बघतो.

आपण म्हणे कवी असतो..

याचं तिला दु:खही आहे.

पण त्या व्यक्त होण्यातही एक लोभस तटस्थता आहे. सामाजिक बांधिलकी म्हणजे कोणत्या तरी रंगाचा झेंडा खांद्यावर असणे हेच मानण्याच्या आजच्या काळात अशी तटस्थता दुर्मीळ. डावे, उजवे, अतिडावे, अतिउजवे, लाल, हिरवे, भगवे अशा कप्प्यांत कलावंतांना दामटून बसवण्याच्या आजच्या दुराग्रही वातावरणात साहित्य संमेलनेदेखील असे विशिष्ट झेंडे खांद्यावरून वागवणाऱ्यांचीच मीलनस्थळे झाली होती. अरुणा ढेरे यांच्यामुळे साहित्य संमेलनाकडे पुन्हा एकदा निखळ वाङ्मयप्रेमींची पावले वळतील. कोणत्याही इझम वा वादात न अडकता जे जे लिहिते आहेत त्या सर्वाना संमेलनाकडे आकृष्ट करण्याचा आपला प्रयत्न राहील, असे आश्वासक विधान अरुणा ढेरे ‘लोकसत्ता’च्या मुलाखतीत करतात तेव्हा ती त्यांची भूमिका असते. कोणताही इझम हा परिपूर्ण नाही. खऱ्या कलावंत, लेखकास ही अपूर्णताच खुणावत असते. त्यामुळे कोणत्याही राजकीय विचाराचा बुक्का कपाळाला न लावता लिहिणाऱ्या अनेकांना अरुणा संमेलनाकडे आकृष्ट करून घेऊ शकल्या तर मराठी साहित्यासाठी ती स्वागतार्ह बाब असेल. अरुणा ढेरे यांचीच कविता म्हणते त्याप्रमाणे..

आतबाहेर ना कुणी, दु:ख सजग हे मन

अशा उदासीत आता शब्द यावा उजळून.

त्यांच्या अध्यक्षीय काळात, संमेलनात आणि नंतरही शब्द उजळून येवोत ही सदिच्छा.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 30, 2018 2:15 am

Web Title: aruna dhere akhil bharatiya marathi sahitya sammelan 2018 3
Next Stories
1 ही दिशा कोणती?
2 हात दाखवून..
3 पुतळा प्रजासत्ताक
Just Now!
X