अर्थव्यवस्था, आरोग्यसेवा, शिक्षण, सक्षमीकरण आणि धर्मनिरपेक्षता या आघाडय़ांवरले बांगलादेशचे यश खेळात झिरपताना दिसले, त्याचे स्वागतच..

एकोणीस वर्षांखालील क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत अंतिम सामन्यात बांगलादेशकडून झालेला अनपेक्षित पराभव पचवणे आपल्याकडील बहुसंख्य क्रिकेट चाहत्यांना अजूनही जड जात आहे. ते स्वाभाविक आहे. भारतीय संघ या स्पर्धेचा गतविजेता होता. शिवाय अंतिम फेरीत सध्याचा संघ पोहोचल्यानंतरही याच संघाकडून अजिंक्यपदाच्या सर्वाधिक अपेक्षा बाळगल्या जात होत्या. मुंबईकर यशस्वी जयस्वाल, रवी बिश्नोई, कार्तिक त्यागीसारखे काही युवक चमकत होते आणि अंतिम फेरीत बांगलादेश म्हटल्यावर जगज्जेतेपद आपलेच, असा समज झालेला असल्याची शक्यता नाकारता येत नाही. असा समज होण्याचे एक महत्त्वाचे कारण म्हणजे, जगात सर्वाधिक क्रिकेटप्रेमी देश आपलाच, हे आम्ही गृहीत धरलेले असते. पण भारतीय क्रिकेट आसक्तीला तोडीस तोड ठरेल इतके क्रिकेटप्रेम बांगलादेशनेही वर्षांनुवर्षे जोपासलेले आहे. ढाका, चितगांव, सिल्हेट, कॉक्सबझारसारख्या शहरांतील मैदानांमध्ये हल्ली फुटबॉलऐवजी क्रिकेटच खेळले जाते असे तेथील पत्रकार सांगतात. मुळात मराठी भाषकांप्रमाणेच बंगाली भाषकांमध्येही क्रिकेटविषयी टोकाची आत्मीयता. मग ते पश्चिम बंगालमधील बंगाली असोत किंवा बांगलादेशातील बंगाली असोत. हे प्रेम त्या देशाच्या सीमा ओलांडून परदेशातही पोहोचले आहे. दक्षिण आफ्रिकेतील पोचेस्फ्रोम शहरात परवा अंतिम सामना झाला, त्या वेळी भारतीयांपेक्षा बांगलादेशी क्रिकेट चाहते स्टेडियममध्ये अधिक होते! खरे म्हणजे हाच स्वतंत्र बातमीचा विषय होऊ शकतो. कारण आज जगाच्या कोणत्याही कोपऱ्यात भारतीय क्रिकेट संघाचा सामना सुरू असेल, तरी स्टेडियममध्ये दोन तृतीयांश भारतीय आणि उरलेले स्थानिक प्रेक्षक असतात! असे असतानाही पोचेस्फ्रोममध्ये बांगलादेशी क्रिकेटप्रेमी अधिक असण्याचे कारण काय असू शकते? कदाचित अधिकाधिक बांगलादेशींना मैदानात जाऊन आपल्या क्रिकेटपटूंना पाठिंबा देण्याची गरज वाटली असावी. याउलट सामना जवळपास खिशातच आलेला आहे या भ्रमात भारतीय चाहत्यांनी तिकडे काही प्रमाणात पाठ फिरवली असू शकते. ही चैन बांगलादेशींना परवडणारी नव्हती. त्यांच्या क्रिकेटपटूंना आणि क्रिकेट चाहत्यांनाही. अखेपर्यंत सामन्यावर लक्ष केंद्रित करणे इतकेच त्यांच्या हातात होते. ते त्यांनी केले आणि त्या देशाच्या क्रिकेटच नव्हे, तर एकूणच इतिहासातील सर्वाधिक संस्मरणीय विजयाची नोंद झाली.

भारताला क्रिकेटची मोठी परंपरा. इंग्रजांनी शोधून काढलेला भारतीय खेळ, असे याचे समर्पक वर्णन आजही केले जाते. पण या देशातील क्रिकेटला निर्णायक कलाटणी १९८३ मधील विश्वचषक विजयानंतर मिळाली होती. त्या स्पर्धेतही भारताविषयी फार गांभीर्याने लिहिणारे/बोलणारे फार नव्हते. झिम्बाब्वेविरुद्धच्या एका सामन्यासाठी तर अधिकृत प्रसारकांना म्हणजे बीबीसीला सामनास्थळी जावेसेदेखील वाटले नव्हते. अशी उपेक्षारूपी थट्टा कपिलदेव यांच्या भारतीय संघाने मनाला लावून घेतली नाही. कारण त्यांचा स्वत:च्या आणि भारतीय संघाच्या कर्तृत्वावर विश्वास होता. त्यातूनच वेस्ट इंडिजसारख्या तत्कालीन बलाढय़ क्रिकेट संघाला अंतिम सामन्यात हा संघ हरवू शकला. बांगलादेशच्या युवकांच्या विजयाकडेही याच दृष्टिकोनातून पाहिले जात आहे. वास्तविक त्यांच्या वरिष्ठ संघाला अजूनही म्हणावी तशी छाप पाडता आलेली नाही. बांगलादेशचे युवक दक्षिण आफ्रिकेत चमकदार कामगिरी करत असताना, तिकडे पाकिस्तानात त्यांचा वरिष्ठ संघ कसोटी सामन्यात चाचपडत होता. अजूनही कसोटी क्रिकेटवर बांगलादेशला म्हणावी तशी पकड मिळवता आलेली नाही. मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये या संघाने विशेषत: विश्वचषक स्पर्धामध्ये काही चमकदार विजय मिळवले आहेत. उदा. १९९९ मध्ये पाकिस्तानविरुद्ध किंवा २००७ मध्ये भारताविरुद्ध किंवा २०१५ मध्ये इंग्लंडविरुद्ध. परंतु महत्त्वाच्या सामन्यांमध्ये हा संघ हल्ली विशेषत: भारताविरुद्ध अवसानघातकी हाराकिरी करतो, हे दिसून आले आहे. एखाद्या बलाढय़ संघाविरुद्ध निव्वळ आपण जिंकू शकतो हा विश्वास पुरेसा नसतो. तसा विजय प्रत्यक्ष मिळवल्याशिवाय दीर्घकालीन आत्मविश्वास मिळत नाही. युवा विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात भारताविरुद्ध खेळताना निव्वळ कौशल्यापलीकडे मानसिक कणखरपणाचीही गरज भासणार होती. तसा कणखरपणा कदाचित गाफील राहिल्यामुळे युवा भारतीय संघाला दाखवता आला नाही. ३ बाद १५६ वरून भारतीय डाव १७७ धावांमध्ये आटोपला. मग ६ बाद १०२ अशा अवस्थेतून बांगलादेशला कर्णधार-यष्टिरक्षक अकबर अलीने विजय मिळवून दिला. या अकबर अलीच्या बहिणीचे नुकतेच निधन झाले. पण त्या दु:खद घटनेनंतरही अकबर अली अविचल राहिला. असा अविचलपणा बांगलादेशच्या वरिष्ठ क्रिकेटपटूंनाही दाखवता येत नाही. बांगलादेशचे युवा क्रिकेटपटू तो दाखवतात हे दखलपात्र होते. विजय मिळाल्यानंतर त्यांच्यातील काही खेळाडू उन्मादात वाहावत गेले, हे गैर खरेच पण अनपेक्षित नव्हे. भविष्यात आपल्या भावनांवर ताबा मिळवायलाही ही मंडळी शिकतीलच.

‘बांगलादेशी’ हा शब्द हिणकसपणे किंवा उथळपणे उच्चारताना आपण एका अभिमानी राष्ट्रभावनेचा अपमान करतो याची जाणीव बहुतांश भारतीयांना व्हावी या दृष्टीनेही बांगलादेशी विजय महत्त्वाचा ठरतो. नागरिकत्व सुधारणा कायदा संमत करताना पाकिस्तान, अफगाणिस्तान आणि बांगलादेशातील अल्पसंख्याकांच्या कथित संहाराचा मुद्दा वारंवार आणि चवीचवीने चर्चिला गेला होता. यांतील पाकिस्तान वगळता इतर दोन देश भारतमित्र आहेत. बांगलादेश हा तर सध्या भारताचा दक्षिण आशियातील सर्वात घनिष्ठ मित्र ठरला आहे. ‘बांगलादेशी’ म्हणून हिणवणाऱ्यांना या देशाने अर्थव्यवस्था, आरोग्यसेवा, शिक्षण, सक्षमीकरण आणि धर्मनिरपेक्षता या आघाडय़ांवर केलेल्या प्रगतीची पुरेशी कल्पना नसते किंवा असली, तरी ती मान्य करण्याची दिलदारी नसते. बांगलादेशी अर्थव्यवस्था भारतापेक्षा किती तरी लहान असली, तरी त्यांचा विकासदर भारतापेक्षा अधिक आहे नि बालमृत्युदर भारतापेक्षा कमी आहे. कुपोषणाच्या समस्येवर बांगदलादेशाने मोठी प्रगती केलेली दिसते. अल्पसंख्याकांचा संहार ही संकल्पना बांगलादेशात फिरताना तरी कुठेही आढळून येत नाही. इस्लामी मूलतत्त्ववादाशी यशस्वी लढा देतानाच या देशाने आपली बंगाली ओळख आणि हिंदू अल्पसंख्याक यांना केवळ सन्मानच दिलेला आढळून येतो. या देशात इतर खेळांबाबत नाही, तरी क्रिकेटच्या विकासासाठी बांगलादेश क्रीडा शिक्षा प्रतिष्ठानसारख्या संस्था अत्याधुनिक निकषांवर चालवल्या जातात. आजच्या बांगलादेशी युवा संघातील बहुतेक क्रिकेटपटू या संस्थेतून बाहेर पडलेले आहेत. आपल्या पूर्णपणे पाकिस्तानकेंद्री राजकारणात आणि क्रिकेटकारणात एका सुसंस्कृत आणि सुस्थिर शेजारी देशाचा आपल्याला विसर पडलेला दिसतो. इतका, की त्या देशालाही आपण ‘पूर्व पाकिस्तान’पेक्षा वेगळी आणि चांगली वागणूक द्यायला अजूनही सरावलेलो नाही. त्यामुळेच बांगलादेशाचे युवक आपल्या युवकांना क्रिकेट विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात हरवू शकतात हे आपण स्वीकारत नाही. दक्षिण आशियातील पहिला बुद्धिबळ ग्रँडमास्टर हा विश्वनाथन आनंद नव्हे, तर बांगलादेशचा नियाझ मुर्शेद होता, हे आपल्या गावीही नसते!

आपल्या राष्ट्रगीताप्रमाणेच बांगलादेशी राष्ट्रगीताचे कर्तेही गुरुदेव रवींद्रनाथ टागोर. त्या गीतातील ‘आमार शोनार बांग्ला’ राष्ट्र आता क्रिकेटमध्ये झळकू लागले आहे. त्यातून क्रिकेटचेही भलेच होईल.