‘कुछ कुछ होता है’ या चित्रपटाला २० वर्षे नुकतीच झाली. आज अंगवळणी पडलेल्या अनेक बदलांचे धागे या चित्रपटात होते..

राजकारण आणि हिंदी चित्रपट. भारतीयांना ज्यावर चर्चा करणे आवडते, अशी दोन क्षेत्रे. त्यांपैकी अधिक आवडते क्षेत्र कोणते, हा तसा वादाचा विषय. दोन्ही क्षेत्रे तुल्यबळ. राजकारणात काय आणि चित्रपटांत काय, पहिले कोण किंवा शेवटचेही कोण, या प्रश्नांची उत्तरे शोधणेही कठीणच. पण शोधण्यास कठीण असलेल्या या उत्तरांमध्येही एक कमालीचे साम्य दोन्ही क्षेत्रांत आढळते. दोन्ही क्षेत्रांत एका अर्थाने पहिले असलेले, दुसऱ्या अर्थाने शेवटचेही ठरतात. पुन्हा पहिलेपणा कशात शोधायचा, शेवटचे कुणाला कशासाठी ठरवायचे, याचे निकष दोन्ही क्षेत्रांत उदंड. यावर कुणी म्हणेल, मग ही पहिल्या-शेवटच्याची चर्चा हवीच कशाला. पण ती हवीच. निकष कितीही प्रवाही असले, तरीसुद्धा हवी. कारण अशा चर्चेतूनच तर बदलांचा माग काढता येतो. हे बदल केवळ राजकारणातले किंवा केवळ हिंदी चित्रपटांतले नसतात, ते समाजातलेही असतात. म्हणून या बदलांचा मागोवा घ्यायचा आणि म्हणून पहिले- शेवटचे याची चर्चा कितीही निष्फळ वाटली, तरी करत राहायचे. राजकारणातील बदलांचा माग काढणे तसे सोपे. एखादे सरकार कधी आले, कधी गेले, त्या काळात कायकाय झाले, याची नोंद पक्की असते. उदाहरणार्थ, वाजपेयी सरकारच्या काळात झालेली अणुस्फोट-चाचणी ही पहिली नव्हती (आणि कदाचित शेवटचीही नसेल) – पण तिने भारतावर सखोल परिणाम केला. विज्ञान, व्यापार, ऊर्जा या क्षेत्रांवर मे १९९८ मधल्या त्या चाचणीचे परिणाम होत गेले, हे आपल्याला माहीत असते. चित्रपटांच्या क्षेत्राबद्दल अशा नोंदी कमी असल्या, तरी त्या क्षेत्राबद्दल ही चर्चा अधूनमधून व्हायला हवी. ‘कुछ कुछ होता है’ या चित्रपटाला परवाच्या १६ ऑक्टोबर रोजी २० वर्षे पूर्ण झाली. वाजपेयी-काळातल्या अणुचाचणीनंतरच्या दिवाळीत झळकलेल्या या चित्रपटात सामाजिक, आर्थिक बदलांचे अनेक धागे एकत्र आले होते. ते कसे?

याच्या चर्चेआधी चित्रपटाच्या कथानकाबद्दल थोडे. या चित्रपटात आपल्या विधुर वडिलांवर कधीकाळी मनापासून प्रेम करणाऱ्या प्रेयसीला शोधून काढून तिचे लग्न वडिलांशी लावून देणाऱ्या आठ वर्षांच्या मुलीची कथा आहे. अपत्यजन्मानंतर आपण काही तासच जगू शकणार, हे माहीत असल्यामुळे तिच्या आईने तिला आठ पत्रे लिहून ठेवली आहेत. प्रत्येक वाढदिवसासाठी एकेक पत्र. वडिलांच्या महाविद्यालयीन मैत्रिणीचे नाव अंजली शर्मा होते म्हणून मुलीचे नाव अंजली ठेवण्याचे वचन आईने आपल्या वडिलांकडून घेतले, हे या मुलीला- अंजली खन्ना हिला- आठव्या पत्रातून समजते. आजीच्या साथीने अंजली खन्ना आता अंजली शर्माचा शोध घेऊ लागते. प्रेमाचे त्रिकोण अनेक चित्रपटांत असतात, पण इथे हा त्रिकोण सोडवण्यासाठी नायकाची आई आणि मुलगी, अशा दोघींचे प्रयत्न सुफळ संपूर्ण होतात. म्हटले तर, कथानकाचे हे वेगळेपण. यापूर्वी १९८० च्या दशकारंभीच ‘एक ही भूल’ नामक चित्रपटात ‘मम्मी से तुम मेरी सुलह करा दो’ असे विनवत पोरामागे धावणारा जितेंद्र आणि त्याची विनंती मान्य करून नाते सांधणारा मुलगा लोकांना माहीत होता. यानंतर दोनच वर्षांनी, १९८३ मध्ये आलेला ‘मासूम’ हा चित्रपट तर, नवऱ्याच्या व्यभिचारातून झालेला निरागस, हसरा मुलगा नाकारण्यापासून ते स्वीकारण्यापर्यंत झालेला नायिकेचा प्रवास दाखवणारा होता. ‘कुछ कुछ होता है’मध्ये मात्र वडिलांना त्यांची प्रेयसी परत मिळवून देण्याचा हट्ट करणारी, चंग बांधणारी आणि जिद्दीने तो पूर्ण करणारी आठ वर्षांची मुलगी दिसली. पण बराचसा चित्रपट फ्लॅशबॅकमध्ये, नायक शाहरुख खान याच्या तरुणपणी आणि नायिका काजोल ही ‘टॉमबॉय’ असताना घडणारा असल्याने कथानकाचा झोत या मुलीवरून ढळला. नायक आणि दोन्ही नायिका यांच्या प्रेमगीतांचे तोवर कधीही झाले नसेल इतके नेत्रसुखद आणि भव्य- म्हणजेच महागडेसुद्धा- चित्रीकरण या चित्रपटात होते. मात्र सन १९९८ च्या राष्ट्रीय पुरस्कारांत सवरेत्कृष्ट ठरलेला हा चित्रपट फार लोकोत्तर होता, असे नाही. ‘हम आपके है कौन’पासून अनेक हिंदी चित्रपट सुखवस्तू घरांमधल्या बदलत्या नातेसंबंधांची गोष्ट सांगू लागले, तसाच ‘कुछ कुछ होता है’ हा एक झळझळीत कपडय़ांतला आणि नेत्रसुखद वाटणारा चित्रपट होता. त्याने किती धंदा केला, हेही तसे बिनमहत्त्वाचेच. कारण शोले- १५ कोटी रुपये, जय संतोषी माँ- पाच कोटी रु., बॉबी- साडेपाच कोटी रु. अशी १९७० च्या दशकातील चित्रपट धंद्याची मजल १९९० च्या दशकात, १९९५ सालच्या ‘दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे’ने ५३ कोटी रुपयांचा धंदा केला तेव्हाच पराकोटीला गेली होती. त्या विक्रमाच्या जवळपास जाणारा विसाव्या शतकातला एकमेव चित्रपट म्हणजे ‘कुछ कुछ होता है’. त्याने गल्ला जमविला ४६,८६,५०,००० रुपयांचा. विसाव्या शतकातले यानंतरचे कोणतेही हिंदी सिनेमे इतका गल्ला जमवू शकले नाहीत. ‘दिलवाले..’ आणि ‘कुछ कुछ..’ यांना परदेशांत मिळालेल्या लोकप्रियतेचे प्रमाणही साधारण असेच होते. मात्र ‘कुछ कुछ..’ हा भारतात आणि लंडन शहरात एकाच दिवशी पहिला खेळ झालेला चित्रपट, हे त्याचे निराळेपण.

पुरस्कार, कथानक, धंदा या साऱ्या नोंदींच्या पलीकडेही चित्रपट असतो आणि त्या चित्रपटाला तोलून धरणारा समाजही असतो. शाहरुख खानचे अधिराज्यच बॉलीवूडवर सुरू असताना सलमान खानने ज्या चित्रपटात उल्लूमशालगिरी कमी आणि अभिनय तुलनेने अधिक केला, तो चित्रपट म्हणजे ‘कुछ कुछ होता है’. किंवा, बालकलाकार हे निव्वळ निरागस वगैरे न दाखविता या बच्चे कंपनीलाही निर्णयक्षमता असते, हे ठळकपणे दाखवून देणारा पहिला चित्रपटही हाच. दोन दशकांपूर्वीच्या याच काळात जाहिरातगुरूदेखील मुलांच्या निर्णयक्षमतेला कौल लावू लागले होते हे विशेष. चित्रवाणी संच असो की साबण असो की नवे निवासस्थान.. मुलांचा हट्ट पुरवा, अशा जाहिराती सुरू झाल्या, त्या आजतागायत. तेव्हा काळाची ही पावले भले कुणाला तिरकी, वाकडी वाटोत. पण ‘कुछ कुछ..’चे दिग्दर्शक करण जोहर यांनी ती फारच नेमकेपणाने ओळखली होती, हे मान्य करावे लागेल. बाजार-आधारित अर्थव्यवस्थेत शोभणाऱ्या ‘प्रॉडक्ट प्लेसमेंट’ची- बाजारातील विशिष्ट कंपन्यांच्या उत्पादनांचा प्रचार चित्रपटाद्वारे करण्याची- ढळढळीत सुरुवात या चित्रपटापासून झाली. वीस वर्षांपूर्वी ‘एमटीव्ही’वरचा झगमगाटी दंगा की ‘डिस्कव्हरी चॅनेल’वरचे नेत्रसुखद निसर्गभ्रमण अशा दुग्ध्यात पडलेल्या तरुण पिढीला, ‘या दोन्हीइतकी नेत्रसुखद दृश्ये इथेच पाहा’ म्हणून खुणावणारा हा चित्रपट नेत्रसुखद होता. त्यामुळे ही जाहिरातक्लृप्ती खपूनही गेली.

एकविसाव्या शतकातल्या आणि हातातील मोबाइल कॅमेऱ्यानेही उत्तम दृश्ये टिपू शकण्याच्या, जाहिराती जणू अटळच असतात असे मानण्याच्या आजच्या काळात या साऱ्याचे अप्रूप वाटणार नाही. मुलांना ‘हवं म्हणजे हवंच’ हे सांगणाऱ्या पालकांचा सूर हल्ली तक्रारीऐवजी कौतुकाचा असतो. या बदलांची सुरुवात विसाव्या शतकातच कशी झाली होती, याचे उत्तम उदाहरण म्हणजे ‘कुछ कुछ होता है’. पंतप्रधान वाजपेयींनी पाकिस्तान, काश्मीर या समस्यांवर तोडगे काढण्याचे निश्चित प्रयत्न चालविले असल्याच्या ‘काही नवे घडू शकेल, चांगलेच घडेल’ अशी आशा समाजाला होती. ‘काहीतरी घडते आहे’ हे अणुचाचणीने दाखवून दिले होते. त्या काळाला शोभणारी सकारात्मकता असणारा हा चित्रपट, स्त्रीला मात्र अखेर अबोल, अबला दाखविण्यातच धन्यता मानणारा होता, हेही त्या काळाचेच लक्षण.

हा चित्रपट एकविसाव्या शतकाची चाहूल घेणाऱ्यांपैकी पहिलाच मानावा, की त्याला विसाव्या शतकातले बदल टिपणारा शेवटचा चित्रपट म्हणावे, यावर वाद झडत राहोत. त्यातून आपणच आपल्याला पुन्हा पुन्हा पाहण्याची संधी मिळत राहो!