चीनचा कृत्रिम सूर्यनिर्मितीचा प्रयोग शाश्वत ऊर्जानिर्मितीच्या दिशेने टाकलेले महत्त्वाचे पाऊल आहे.

कृत्रिम निर्मितीच्या क्षेत्रात चीनने मोठी मजल मारलेलीच आहे. पण अजून बराच पल्ला गाठण्याची या देशाची भूक आणि ऊर्जा थक्क करणारी आहे. कृत्रिम निर्मितीत- मग ती जनुकीय फेरफार करून जन्माला घातलेली बाळे असोत वा दक्षिण चीन समुद्रात निर्मिलेले कृत्रिम बेट असो- चीन कोणत्या भल्याबुऱ्या मार्गाचा वापर करतो याची चिकित्सा होतच असते. निर्मितीइतकीच निर्मिती प्रक्रियाही नियमाधिष्ठित, मूल्याधिष्ठित असावी असा पाश्चिमात्य जगताचा आग्रह असतो. या आग्रहात तथ्य असले, तरी तो सापेक्ष आहे. गेल्या वर्षी चीनने कृत्रिम सूर्यनिर्मितीचा प्रयोग हाती घेतला होता. तो या वर्षअखेरीस सुफळ पूर्ण होईल असे या देशातर्फे नुकतेच जाहीर करण्यात आले. कृत्रिम सूर्यनिर्मितीमागे अपरिमित स्वच्छ ऊर्जास्रोत ही प्रमुख प्रेरणा आहे. माणूस उत्क्रांत झाल्यानंतरच्या काळात अन्न व निवारा आणि मग अन्न-वस्त्र-निवारा या त्याच्या प्राथमिक गरजा होत्या. कालांतराने त्यात शिक्षण आणि आरोग्य या दोन घटकांची भर पडली. नवीन युगात या पाच घटकांबरोबरच मानवी वाटचालीसाठी अत्यावश्यक बनलेला आणखी एक घटक म्हणजे ऊर्जा! पृथ्वीवरील मनुष्यजातीची ऊर्जेची भूक असीम आहे. पण तिचे शाश्वत आणि नूतनीकरणीय स्रोत फारसे उपलब्ध नाहीत. पारंपरिक ऊर्जास्रोत आणखी बरेच काळ वापरण्याजोगे असले, तरी त्यांमुळे पृथ्वीचे तापमान वाढते हा जोडधोका आहे. यासाठीच पर्यायी स्रोत शोधणे क्रमप्राप्त आहे. तो पर्याय चीनने कृत्रिम सूर्यामध्ये शोधण्याचा प्रयत्न केला. प्रथम थोडेसे या प्रयोगाविषयी.

कृत्रिम अणुभंजनाच्या माध्यमातून ऊर्जानिर्मितीचे हे प्रारूप चीनच्या हेफी इन्स्टिटय़ूटमध्ये विकसित करण्यात आले. तेथील ‘एक्सपेरिमेंटल अ‍ॅडव्हान्स्ड सुपरकंडक्टिंग टोकामाक’ (ईएएसटी-ईस्ट) नामक अणुभट्टीमध्ये हे भंजन घडवून आणले गेले. ११ मीटर उंच आणि ८ मीटर व्यासाची व ४०० टन वजनाची ‘ईस्ट’ अणुभट्टी म्हणजेच चीनचा कृत्रिम सूर्य! तिला कृत्रिम सूर्य का संबोधायचे, तर १० कोटी सेल्सियस इतके प्रचंड तापमान या भट्टीने निर्माण करून दाखवले. सूर्याच्या गाभ्यातील तापमान साधारण दीड कोटी सेल्सियस इतके असते. तरी तो सूर्य आणि हा कृत्रिम सूर्य यांतील मुख्य फरक म्हणजे सूर्याच्या गाभ्यात प्रचंड दाब असतो. त्यामुळे हायड्रोजनच्या केंद्रकांचे भंजन होऊन प्रचंड ऊर्जानिर्मिती होते. तितका दाब पृथ्वीतलावर कृत्रिमरीत्या निर्माण करणे मानवी क्षमतेबाहेरची बाब आहे. म्हणूनच अणुभंजनसाठी तापमान प्रचंड प्रमाणात वाढवणे हा एकच पर्याय शिल्लक राहतो. दोन हायड्रोजन अणुकेंद्रके एकत्र आल्यास त्यांच्यातून प्रचंड ऊर्जा उत्सर्जित होते. अणुभंजनाची ही प्रक्रिया प्रद्रव्याला (प्लाझ्मा) चुंबकीय प्रक्रियेचा आधार देऊन साधली जाते. ‘ईस्ट’ची स्थापना चीनने २००६ मध्ये स्वबळावर आणि स्वयंप्रेरणेतून केली. त्यानंतर हेफी इन्स्टिटय़ूटमध्ये नवनवीन प्रयोग सुरू होते. २०१७ पासून कृत्रिम सूर्यावरील कामाला प्रत्यक्षात सुरुवात झाली. आता या प्रयोगाच्या यशानंतर आंतरराष्ट्रीय औष्णिक-आण्विक (थर्मोन्यूक्लिअर) भट्टी विकसित करण्याच्या आंतरराष्ट्रीय मोहिमेला मदत होणार आहे. हा प्रकल्प अमेरिका, रशिया, चीन यांच्यासह ३० देश राबवत आहेत. तरीही १० कोटी सेल्सियस तापमान निर्माण करणारा हा जगातला पहिलाच देश. कृत्रिम प्रज्ञेच्या क्षेत्रात या देशाने कोटय़वधींची गुंतवणूक देशात आणि जगभर केलेली आहे. पुढील वर्षी कृत्रिम चंद्र निर्माण करून चेंगडू शहराला रात्रीच्या प्रकाशात उजळून टाकण्याची या देशाची आणखी एक महत्त्वाकांक्षी योजना आहे. तो चंद्रप्रकाशापेक्षा आठपट अधिक प्रकाश देऊ शकेल. त्यामुळे रस्त्यावर दिव्यांची गरजच भासणार नाही आणि ऊर्जेची बचतही होऊ शकेल. यासाठी एक उपग्रह अवकाशात सोडला जाईल, तो सूर्यप्रकाश पृथ्वीवर परावर्तित करू शकेल.

कृत्रिम सूर्याचा हा प्रयोग क्रांतिकारी आहे. कारण तो यशस्वी होण्याची दाट शक्यता असून, तसे झाल्यास स्वच्छ आणि शाश्वत ऊर्जेची समस्या जवळपास संपुष्टात येऊ शकेल अशी आशा वैज्ञानिक समुदायाला वाटते. ती मात्र काहीशी भाबडी आहे. सध्याचा सर्वाधिक प्रचलित ऊर्जास्रोत म्हणजे जीवाश्म इंधने. या जीवाश्म इंधनांचे विपुल साठे ज्या देशांकडे आहेत, असे देश ही संसाधने फार उदात्त हेतूने फुकटात किंवा स्वस्तात विकत नाहीत. तशी अपेक्षाही नाही. तेव्हा त्यांच्यापेक्षाही व्यावसायिकतेत अधिक मुरलेल्या चीनने भविष्यातील कृत्रिम सौरऊर्जेवर मक्तेदारी प्रस्थापित केल्यास आश्चर्य वाटायला नको. कारण तंत्रज्ञान विकसित करण्यात त्यांनी बरीच मजल मारलेली आहे. गेल्या शतकात तंत्रज्ञानातील प्रगतीच्या जोरावरच अमेरिका आणि पाश्चिमात्य देशांनी जगभर वर्चस्व गाजवले होते. त्यांच्याच पावलावर पाऊल टाकत चीनने संशोधनात निधी आणि मनुष्यबळाची प्रचंड गुंतवणूक केली हे उघड आहे. त्यांच्याकडे पहिल्यावर भारतातली परिस्थिती खंतावणारी आहे. सूर्यप्रकाश मुबलक असल्यामुळे आपण सौरऊर्जेची निर्मिती करू शकतो असा एक भाबडा समज आपल्याकडे सार्वत्रिक आहे. सूर्यप्रकाशाचे सौरऊर्जेत रूपांतर करण्यासाठी आवश्यक तंत्रज्ञान महागडे आहेच. पण त्यात अधिक संशोधन करण्याची गरज आहे. त्याबाबत आपल्याकडे उदासीनता आहे. कारण अभियंत्यांच्या फौजा निर्माण करणाऱ्या या देशात संशोधक, शास्त्रज्ञ निर्माण होण्यासाठी आवश्यक धोरण आणि संस्कृती नाही. संशोधनासाठी सबुरी लागते. शास्त्रज्ञ होऊन झटपट पैसा मिळत नाही. गेलाबाजार वेतन आयोगाचे फायदेही अभावानेच मिळतात. त्यामुळे अभियंता बनले नाहीत, तर विज्ञान पदवी घेतलेली मंडळी आयटी किंवा प्राध्यापकीकडे वळतात. एखादा चुकलामाकला संशोधनाकडे वळलाच, तर त्याला कोणत्या समस्यांना तोंड द्यावे लागते, हे टीआयएफआरच्या थकीत वेतन प्रकरणातून दिसून आले आहे. वास्तविक सात टक्क्यांच्या आसपास वेगाने गेली काही वर्षे विस्तारणाऱ्या आपल्या अर्थव्यवस्थेला ऊर्जेची प्रचंड गरज आहे. तिचे स्रोत मर्यादित आणि अशाश्वत आहेत हेही आपल्याला ठाऊक झाले आहे. हे सगळे पाहता पर्यायी ऊर्जास्रोतांच्या क्षेत्रात आपल्याकडे मोठय़ा प्रमाणात संशोधन होण्याची गरज आहे. तसे काहीही होत नाही. आपण आंतरराष्ट्रीय व्यासपीठांवर कार्बन उत्सर्जन कमी करण्याविषयी वाटाघाटी किंवा भाषणबाजींमध्ये व्यग्र आहोत. चीनची ऊर्जेची भूक आणि कार्बन उत्सर्जनही प्रचंड आहे. पण त्या दिशेने त्यांनी काहीतरी संशोधन सुरू केले आहे. कृत्रिम सूर्याची संकल्पना या गरजेतूनच जन्माला आली. जनुकीय फेरफार करून बालके जन्माला घालण्याचे त्यांचे प्रयोग नैतिकतेचे भलेमोठे प्रश्नचिन्ह उभे करून जातात. कृत्रिम चंद्र किंवा कृत्रिम सूर्यनिर्मितीबाबत तशी शक्यता जवळपास नाही. असा काही विचार करण्यासाठी भन्नाट कल्पनाशक्ती लागते. ती संकल्पना तडीस नेण्यासाठी अचाट संसाधनशक्ती लागते. चीनकडे हे दोन्ही विपुल प्रमाणात आहे. या प्रयोगामुळे अणुऊर्जेलाही नवसंजीवनी मिळणार आहे. अणुभट्टय़ांच्या सुरक्षेविषयी योग्य शंकानिरसन न झाल्यामुळे अनेक  देश या पर्यायाकडे वळण्यास नाखूश होते. मात्र अणुभंजनाधारित ऊर्जानिर्मितीदरम्यान घातक किरणोत्सर्ग होत नाही. त्यामुळे ही प्रक्रिया अतिशय पर्यावरणस्नेही आहे. शिवाय या प्रक्रियेसाठी आवश्यक कच्चा माल म्हणजे डय़ुटेरियम आणि ट्रिटियम सहज उपलब्ध असतात.

चीनचा हा प्रयोग शाश्वत ऊर्जानिर्मितीच्या दिशेने टाकलेले पहिले पाऊल आहे. व्यापारी आणि लष्करी आघाडीवर अमेरिका, रशिया व इतर युरोपीय देशांशी स्पर्धा करणाऱ्या चीनने आता वैज्ञानिक क्षेत्रातही प्रगत देशांना साजेशी कामगिरी करून दाखवली आहे असे आता म्हणता येईल.