तपासयंत्रणा स्वतंत्र असेल तर ती खुद्द राष्ट्राध्यक्षांच्या राजकीय स्वैराचाराला झटका देऊ शकते, हे अमेरिकेत दिसून येते आहे..

आपण किती चांगले आहोत यापेक्षा प्रतिस्पर्धी किती वाईट आहे यावरच निवडणुकीच्या राजकारणात प्रचार केला गेला की जे होते.. आणि व्हायला हवे.. तेच अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे सध्या होताना दिसते. ट्रम्प यांचे एक नव्हे दोन नव्हे तर तब्बल तीन सहकारी विविध गंभीर प्रकरणांत दोषी आढळले असून हे अमेरिकेच्या व्यवस्थेने अध्यक्षाच्या दिशेने टाकलेले पहिले पाऊल मानले जात आहे. या तिघांवरही वेगवेगळ्या आरोपांखाली आरोप दाखल करण्याची प्रक्रियादेखील सुरू झाली. जगभरातील समस्त लोकशाहीप्रेमी नागरिकांसाठी हे सुचिन्हच मानावयास हवे. सर्वात मोठी लोकशाही म्हणवून घेणाऱ्या देशातील विचारी जनांनी सर्वात कार्यक्षम लोकशाही कशी काम करते हे समजून घेणे आवश्यक असल्याने अमेरिकेतील घटनांचा अन्वयार्थ लावणे आवश्यक ठरते.

अध्यक्षीय निवडणूक प्रचारात ट्रम्प यांना रशियाने मदत केली ही वदंता अमेरिकेत गतसालच्या निवडणुकांपासून होतीच. त्याही वेळी डेमॉक्रॅटिक पक्षाच्या हिलरी क्लिंटन यांच्या कार्यालयातील संगणक प्रणालीत मोठ्या प्रमाणावर घुसखोरी झाल्याचे आढळले होते आणि त्यात रशियाचा हात होता असा वहीम व्यक्त केला गेला होता. तो खरा असल्याचे पुढे निष्पन्न झाले. त्यामुळेच हिलरी क्लिंटन यांचे प्रतिस्पर्धी डोनाल्ड ट्रम्प यांना रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी निवडणुकीत थेट मदत केली किंवा काय, हा मुद्दा चर्चेस आला. तो येण्यामागे कारणेही तशीच होती. ट्रम्प यांचे रशियात असलेले आर्थिक हितसंबंध आणि त्यांचे एकूणच विधिनिषेधशून्य राजकारण पाहता त्यांनी रशियाकडून मदत स्वीकारलीच नसेल असे ठाम मानावयास कोणीच तयार नव्हते. त्यात पुतिन यांच्या सहायकांनी प्रचाराच्या काळात रशियाचे अमेरिकेतील राजदूत सग्रेई किस्ल्याक यांच्या भेटीगाठी घेतल्याचे निष्पन्न झाल्याने हा संशय अधिकच बळावला. त्यातून ट्रम्प यांच्या अध्यक्षीय राजवटीत सुरुवातीलाच काहींना व्हाइट हाऊसमधून नारळ द्यावा लागला. त्यातील महत्त्वाचे म्हणजे मायकेल फ्लिन हे ट्रम्प याचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार होते. त्यांनी किस्ल्याक यांच्याशी ओबामा प्रशासनाने रशियावर घातलेल्या निर्बंधांची चर्चा केल्याचे निष्पन्न झाले. हा मोठाच फटका होता. त्यानंतर मे महिन्यात ट्रम्प यांनी फेडरल ब्यूरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन्स-  म्हणजे एफबीआय- या यंत्रणेचे प्रमुख जेम्स कॉमी यांना पदावरून काढले. हे कॉमी किती उत्तम अधिकारी आहेत असे त्यांचे वर्णन करणाऱ्या ट्रम्प यांच्यावर त्यांना काढावयाची वेळ आली कारण एफबीआय अध्यक्षीय प्रचार आणि रशियाचे साटेलोटे याची चौकशी करू लागली म्हणून. त्यानंतर एफबीआयच्या वतीने केल्या जात असलेल्या प्रचाराची सूत्रे रॉबर्ट म्युलर यांच्या हाती देण्याचा निर्णय अमेरिकेच्या न्याय मंत्रालयाने घेतला. आपल्याकडच्या केंद्रीय गुप्तचर आदी यंत्रणांप्रमाणे अमेरिकेत एफबीआय ही अध्यक्षाच्या अंगठय़ाखाली नसते. त्यामुळे ते स्वतंत्रपणे काम करू शकतात. म्युलर यांची नेमणूक हा या व्यवस्थेच्या स्वातंत्र्याने स्वैराचारी ट्रम्प यांना दिलेला पहिला झटका.

दुसरा खुद्द म्युलर यांनीच दिला. हे म्युलर हे तगडे वकील आहेत आणि एके काळी एफबीआयचे प्रमुखपद त्यांनी भूषविलेले आहे. त्यामुळेच म्युलर यांची नेमणूक हा ट्रम्प यांच्यासाठी धोक्याचा इशारा मानला गेला. आपल्या पहिल्याच कृतीतून म्युलर यांनी त्या संभाव्य धोक्याच्या आकाराची कल्पना दिली. ट्रम्प यांचे एके काळचे प्रचारप्रमुख पॉल मानफोर्ट, त्याचे सहकारी रिचर्ड गेट्स आणि ट्रम्प यांचे परराष्ट्र व्यवहार सल्लागार जॉर्ज पापादोपोलस या तिघांवर एफबीआयने सोमवारी आरोप निश्चित केले. हे मानफोर्ट यांचे युक्रेनशी मोठे आर्थिक व्यवहार होते. त्या देशाच्या रशियावादी पक्षाचे प्रमुख, माजी अध्यक्ष व्हिक्टर यानुकोविच यांचे आणि मानफोर्ट यांचे आर्थिक संबंध होते. हे यानुकोविच हे पुतिन यांच्या हातचे बाहुले मानली जात. त्यांच्यावर मोठे भ्रष्टाचाराचे आरोप झाले आणि त्यातील देवाणघेवाणीत मानफोर्ट यांचा हात दिसून आला. परंतु यातील काहीही त्यांनी अमेरिकी सरकारला कळवले नाही. रशियातील एक अब्जाधीश उद्योगपती ओलेग डेरिप्स्का यांच्याशीही मोनफोर्ट यांचे आर्थिक हितसंबंध होते. हे डेरिप्स्का रशियाचे अध्यक्ष पुतिन यांच्या आतल्या गोटातील मानले जातात. गेट्स हे मानफोर्ट यांचे कर्मचारी. या नात्याने या सर्व रशियन व्यवहारांत त्यांचाही हात असल्याचे एफबीआयला आढळून आले. या संबंधांस मोनफोर्ट हे ट्रम्प यांचे प्रचारप्रमुख म्हणून नेमले गेल्यानंतर अधिक बहर आला. यातून मिळालेले उत्पन्न या दोघांनी अमेरिकी सरकारपासून लपवले आणि कोणताही कर न भरता हा पैसा पचवण्याचा प्रयत्न केला. एफबीआय चौकशीत या सगळ्याची साद्यंत माहिती देण्यात आली असून या दोघांवर आता खटला भरला जाईल. या गुन्ह्यासाठी तब्बल २० वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा असून आरोप दाखल झाल्या झाल्या या दोघांनाही सुरक्षा यंत्रणांनी ताब्यात घेतलेदेखील. यातील तिसरे पापादोपोलस यांचे वर्णन खुद्द ट्रम्प यांनी परराष्ट्र संबंधांतील अत्यंत जाणकार असे केले होते. ते ट्रम्प यांचे या क्षेत्रातील सल्लागार. निवडणुकीच्या काळात हा ‘जाणकार’ एका रशियन प्राध्यापकाच्या संपर्कात होता. हा रशियन प्राध्यापक मॉस्कोत एका महिलेचा निकटवर्तीय आणि ती महिला थेट पुतिन यांना जवळची. हे पापादोपोलस या सगळ्या साखळीत अडकायचे कारण म्हणजे रशियन प्राध्यापकाने त्यांना हिलरी क्लिंटन यांच्या संदर्भात दाखवलेली लालूच. हिलरी यांच्या विरोधात आमच्याकडे बराच मालमसाला आहे आणि तो तुम्हाला द्यायला आम्ही तयार आहोत, असे सांगत या प्राध्यापकाने ट्रम्प यांचे समर्थक पापादोपोलस यांना घोळात घेतले आणि क्षुद्र राजकारणाच्या मोहापायी ते यात गुरफटले. त्याआधी ट्रम्प यांच्याशी निवडणूकपूर्व झालेल्या बैठकांती पापादोपोलस यांनी आपले रशियात कसे ‘वर’पर्यंत संबंध आहेत याची शेखी मिरवली होती आणि प्रसंगी थेट पुतिन यांच्याकडून आवश्यक ती मदत मिळवून देण्याची भाषा केली होती. एफबीआयच्या तावडीत हा सगळा ऐवज गवसला. त्याआधारे म्युलर यांनी पापादोपोलस यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याची तयारी केल्या केल्या त्यांनी शरणागतीच पत्करली आणि एफबीआय म्हणते ते खरे असल्याचे कबूल करून टाकले.

ट्रम्प यांना हा मोठा झटका आहे. त्यानंतरही आपले कसे बरोबरच होते आणि या आरोपांत कसे काही तथ्य नाही, अशी खास आपल्या परिचयाची अशी शेखी मिरवण्याचा प्रयत्न त्यांनी केला खरा. परंतु त्यांच्या या आवेशास काहीही आधार नाही, असेच अमेरिकेत मानले जाते. अनेकांच्या मते ही केवळ सुरुवात आहे. म्युलर यांच्यासारखी व्यक्ती ही कोणाचाही दबाव घेणारी नाही. त्याचमुळे हे कारवाईसत्र यापुढेही असेच सुरू राहील, याबद्दल अमेरिकेत सार्वत्रिक खात्री आणि समाधानही व्यक्त होते. त्यात, दोन्ही सदनांतील स्वपक्षीय रिपब्लिकनांचे ऐक्य घडवून आणण्याच्या प्रयत्नात अध्यक्ष ट्रम्प असताना म्युलर यांची ही कारवाई झाल्याने अध्यक्षांना हा मोठा फटका असल्याचे मानले जाते. अर्थात ट्रम्प यांना याचे गांभीर्य आहे काय, हाच खरा प्रश्न आहे. कारण म्युलर यांच्या कारवाईनंतरही त्यांची प्रतिक्रिया होती, ‘त्या बनेल क्लिंटनबाईंचे काय,’ अशी. त्यांचा सर्व प्रयत्न आहे तो आपल्यापेक्षा आपल्या प्रतिस्पर्धी किती वाईट आहेत, हेच सिद्ध करण्यावर. स्वत:च्या क्षमतेपेक्षा स्पर्धकांची अकार्यक्षमता हाच राजकारणाचा आधार झाला की असेच होणार. बुडत्या अमेरिकी अध्यक्षाचा खोलात जाणारा पाय हा अन्यत्र असे राजकारण करणाऱ्यांसाठी धडा आहे.