26 February 2021

News Flash

‘खिसेकापूं’पासून सावधान..

देवाच्या चरणी स्वहस्ते व राजीखुशीने अर्पण केलेले दान भलत्याच खिशात जाते

देवाच्या चरणी स्वहस्ते व राजीखुशीने अर्पण केलेले दान भलत्याच खिशात जाते हे स्पष्ट झाल्यास त्याला काय म्हणावे, हा प्रश्नच आहे.

देवस्थाने ही भाविकांच्या श्रद्धेची केंद्रे असल्याने, तेथील श्रीमंतीला धनदांडगेपण म्हणणे योग्य ठरणार नाही. तथापि, देवस्थानांवरील नियंत्रणासाठी सुरू होणारी राजकीय स्पर्धा, चढाओढ आणि त्या स्पध्रेत स्वत:ची वर्णी लावण्यासाठी होणारी केविलवाणी धडपड पाहता, देवस्थानांची श्रीमंती हेच त्याचे मूळ असावे अशी शंका मात्र राजरोसपणे घेतली जाऊ लागली आहे.

चोरी करणे हा गुन्हा आहे आणि तो करणाऱ्याला कायद्यानुसार योग्य ती शिक्षाही ठोठावली जात असते. पण एखाद्याच्या खिशातून, घरातून वा मालकीच्या स्थानापासून गायब झालेल्या मुद्देमालासह एखादी व्यक्ती सापडली आणि त्यानंतरही त्या व्यक्तीनेच ती चोरी केली आहे हे सिद्ध करता आले तरच तो गुन्हा म्हणून शाबीत होतो आणि चोर म्हणून सिद्ध झालेल्या त्या व्यक्तीला कायद्याच्या चौकटीतील योग्य ती शिक्षाही होते. दुसरे म्हणजे, आपल्या खिशातील रक्कम वा तिजोरीतील मौल्यवान वस्तू स्वहस्ते, जाणीवपूर्वक व पूर्ण भानावर असताना, साऱ्या कायदेशीर जबाबदाऱ्यांसह एखाद्याच्या खिशात घातली किंवा हाती सोपविली, तर ती वस्तू वा रक्कम घेणारा चोर ठरत नाही. असा एकंदरीत क्लिष्ट प्रकार असल्यामुळे, गेल्या काही वर्षांपासून महाराष्ट्रातील जागृत मानल्या जाणाऱ्या व ऐतिहासिक देवस्थान असलेल्या तुळजापूरच्या आई भवानीच्या पायाशी भक्तिभावाने अर्पण केलेल्या वस्तू, दागिने वा रोख रकमेचे पुढे काय होते, याच्याशी भोळ्या भक्तांच्या भक्तिभावनांचा काहीच संबंध नसला, तरी देवाच्या चरणी स्वहस्ते व राजीखुशीने अर्पण केलेले ते दान भलत्याच खिशात जाते हे स्पष्ट झाल्यास त्याला काय म्हणावे हा प्रश्नच आहे. तरीही, मंदिराच्या तिजोरीत गोळा होणाऱ्या दागिन्यांचा किंवा मौल्यवान वस्तूंचा अथवा रोख रकमेचा अपहार हा चोरीचाच प्रकार असल्याचे सिद्ध झालेच तर संगनमताने केलेल्या या कृतीस जबाबदार असलेल्यांना योग्य ती शिक्षा होईलच. देवस्थानांच्या संपत्तीचा अपहार झाल्याचे उघड झाले तरीही देवस्थानांच्या जागी असलेल्या दानपेटय़ा वा हुंडय़ांचा भरणा थांबविण्याचे भक्तांना कारण नसते. कारण तो तर सद्य:स्थितीतील भाविकतेचा एक महान मापदंड असतो. आपल्याकडे जमा होणाऱ्या काळ्या वा पांढऱ्या पशाचे प्रमाण अतिरिक्त व अवास्तवरीत्या फुगत चालले, तर तो पसा भक्तिभावाने देवाच्या चरणी अर्पण करून पुण्य मिळविण्याची प्रथा सुरू झाल्यापासून त्याचे जे काही फायदे मिळू लागले आहेत, त्याचे दोन दृश्य परिणाम सहजपणे सांगता येतात. पहिला म्हणजे, वाममार्गाने मिळविलेले धन वा पसा ही ‘काळी’ असली तरी ‘संपत्ती’च असल्याने, त्याचा सदुपयोग व्हावा या सद्हेतूने तो पसा वा संपत्ती देवाच्या चरणी अर्पण केल्यास पुण्यप्राप्तीचे समाधान मिळून धनसंपत्तीप्राप्तीसाठी पत्करलेल्या वाममार्गाचे पाप धुऊन निघते आणि ज्या देवाच्या चरणाशी असा पसा वा संपत्ती ओतली जाते, त्या देवाच्या रूपाने गरजूंना त्यातून कमी-अधिक प्रमाणात साह्य़ केले जात असल्याने अप्रत्यक्ष पुण्यप्राप्तीही साधता येते. पुण्याचा हा ‘काळ्याकडून पांढऱ्याकडे’ होणारा प्रवास थेट परमेश्वरामार्फत व ईश्वरहस्ते होत असल्याने त्यापासून दात्याला लाभणारे आत्मिक समाधान अमौलिक असेच असते. हा परस्परभाव लक्षात घेतला, तर देवस्थानांच्या हुंडय़ांमध्ये जमा होणारी संपत्ती हे बऱ्याच अंशी काळे असलेले धन ईश्वरी स्पर्शाने पावन होत असल्याने देवस्थाने हा अवैध संपत्ती पावन करण्याचा मार्ग झाल्यापासून देवस्थानांना चढणारी श्रीमंतीची झळाळी हा काही आश्चर्याचा मुद्दा राहिलेला नाही.

महाराष्ट्राचे कुलदैवत मानल्या जाणाऱ्या तुळजापूरच्या भवानी मंदिरात भाविकांनी श्रद्धेपोटी केलेल्या दानाचा उघडकीस आलेला अपहाराचा प्रकार पाहता, देवस्थाने हा ‘हपापाचा माल गपापा’ करण्याचे केंद्रस्थान बनू पाहात असल्याची साधार शंका मूळ धरू लागली आहे. तुळजाभवानी मंदिराच्या तिजोरीतून आतापर्यंत ३९ किलो सोने आणि सहा क्विंटलहून अधिक वजनाच्या चांदीचा अपहार झाल्याचे स्पष्ट झाले आहे. याप्रकरणी मंदिराच्या विश्वस्तपदाची जबाबदारी सांभाळणाऱ्यांसह ४२ जणांवर संशयाची सुई रोखली गेली आहे. तुळजाभवानीप्रमाणेच, महाराष्ट्रातील अन्य काही मोजक्या देवस्थानांच्या तिजोरीत अमाप संपत्तीचा खजिना साठत असतो. या संपत्तीची मोजदाद केली, तर महाराष्ट्राच्या कपाळावरील कर्जबाजारीपणाचा शिक्का पुसण्याची ताकद देवाच्या ठायी आहे, याबद्दल शंका राहणार नाही. देवस्थाने ही भाविकांच्या श्रद्धेची केंद्रे असल्याने, या श्रीमंतीला धनदांडगेपण म्हणणे योग्य ठरणार नाही. तथापि, देवस्थानांवरील नियंत्रणासाठी सुरू होणारी राजकीय स्पर्धा, चढाओढ आणि त्या स्पध्रेत स्वत:ची वर्णी लावण्यासाठी होणारी केविलवाणी धडपड पाहता, देवस्थानांची श्रीमंती हेच त्याचे मूळ असावे अशी शंका मात्र राजरोसपणे घेतली जाऊ लागली आहे. शिर्डी संस्थान हे देशातील अतिश्रीमंत संस्थांनाच्या रांगेतील दुसऱ्या क्रमांकाचे देवस्थान मानले जाते. साईबाबा नावाच्या एका फकिरावरील अपार श्रद्धेपायी भक्तगणांनी या विरक्त संताला त्याच्या पश्चात अफाट श्रीमंत करून सोडले आणि उभे आयुष्य फाटकेपणाने घालविलेल्या या संताच्या मूर्तीच्या शिरावर कोटय़वधींचा सुवर्णमुकुट झळाळू लागला. गळ्यात सोन्याच्या अवजड माळा विराजमान झाल्या आणि समाधी मंदिराच्या कळसालाही सोन्याची झळाळी प्राप्त झाली. एका विरक्त फकिराच्या पश्चात त्याला प्राप्त झालेल्या या ऐश्वर्याचे सारे श्रेय भक्तांच्या भाविकतेलाच द्यावे लागेल. महिनाभरापूर्वी या संस्थानाच्या देखभालीसाठी नव्या मंडळाची नियुक्ती झाली, तेव्हा त्यामध्ये स्थान न मिळाल्याने व्यक्त झालेली खदखद हे ईश्वरसेवेची संधी हुकल्याची खंत होती, भाविकतेचे प्रतिबिंब होते की संस्थानच्या श्रीमंतीच्या विश्वस्तपदाचा मान मिळविण्याची ईष्र्या होती याची चर्चा सुरू झालीच. संस्थानच्या व्यवस्थापन मंडळात वर्णी लागली नाही म्हणून स्थानिक राजकीय नेत्याच्या समर्थकांनी बंद पाळला, निषेधाची सारी प्रतीके वापरून नापसंतीही व्यक्त केली. आता शिर्डी संस्थानातील कारभारावर नव्या मंडळाचा अंकुश आला आणि नव्या मंडळाची कार्यपद्धती सवयीची होईपर्यंत शिस्तीत वागणे भाग आहे, याची जाणीव देवस्थानाच्या कर्मचाऱ्यांना झाली. दर्शनासाठी रांगा लावून ताटकळणारा भाविक, पसे मोजून अतिमहत्त्वाच्या व्यक्तीचा दर्जा मिळविणारा भाविक आणि त्याहूनही अधिक पसे मोजून थेट दैवताच्या चरणी बसून पूजेचा मान मिळविणारा भाविक अशा भाविकतेची सांपत्तिक स्थितीनुसार होणारी त्रिस्तरीय मांडणी सर्वत्रच दिसते. रांगा लावून दर्शनासाठी पास खरेदी करून ते दसपट किमतीला विकणाऱ्या दलालांचा विळखा ही देवस्थानांच्या चिंतेची बाब का नसावी, हा भाविकांना पडणारा भोळा प्रश्न इथेही अनेकांच्या चेहऱ्यावर दिसत असला, तरी त्याला उत्तर नाही, हे आता भाविकांनाही सवयीने माहीत झाले आहे. त्याशिवाय देवाच्या दारी आल्यावर रित्या हाताने दर्शन घेणे पाप वाटावे, अशी धंदेवाईक दलालांनी सर्वत्र रुजविलेली समजूत देवस्थानांच्या परिसरात अनुभवता येते. कोणत्याही देवस्थानात, भक्ताचा सांपत्तिक स्तर हेच भाविकतेचे मोजमाप ठरू पाहात असेल तर ती काळजी करण्यासारखी बाब आहे, हे भक्तांनी जाणले पाहिजे.

आता गणेशोत्सव तोंडावर आला आहे. दहा-बारा दिवसांसाठी अवतरणाऱ्या सार्वजनिक गणेशोत्सवातही संपत्तीचे असेच ओंगळवाणे प्रदर्शन घडू लागेल. अशा परिस्थितीचा ठपका केवळ देवस्थानांवर ठेवणे मात्र योग्य ठरणार नाही. भाविकतेची किंमत पशात मोजण्याची प्रथा निमूटपणे स्वीकारणाऱ्या भक्तगणांनी या नव्या परंपरेतील आपली जबाबदारी ओळखण्याची गरज आहे. देवस्थानांच्या परिसरात सर्वत्र, ‘खिसेकापू आणि चोरांपासून सावध राहा’ अशा इशाऱ्याचे फलक जागोजागी दिसत असतात. भाविकांनी जागे राहून व डोळे उघडून त्याकडे पाहिले, तर चोर आणि खिसेकापू ओळखणे अवघड होणार नाही!

 

 

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 27, 2016 2:34 am

Web Title: donating so much money to temples is it right or wrong
Next Stories
1 गर्भार गोंधळ
2 लोकशाहीतील त्रिदोष
3 ‘ऊर्जिता’वस्था ‘पटेल’?
Just Now!
X