जॉन ल कार यांच्या कादंबऱ्यांतील नायक हा गुप्तहेर असूनही जेम्स बाँडसारखा नाही. त्यांच्या सर्व कादंबऱ्या या हेरांचे माणूसपण दाखवतात..

लेखक या नात्याने अमेरिका आणि मातृभूमी इंग्लंड या देशांबाबतची आपली घृणा कार यांनी कधीही लपवली नाही.. आणि या दोन्ही देशांनी देऊ केलेले सर्व सरकारी पुरस्कार त्यांनी आयुष्यभर टाळले! 

आंतरराष्ट्रीय हेरगिरीकडे जेम्स बाँडच्या गुलाबी रोमँटिसिझमपेक्षा अधिक समंजसपणे पाहणाऱ्यांना किम फिल्बी, केंब्रिज फाइव्ह वगैरे प्रकरणांची जाण असते. ती असणारे दोन लेखकांचे चाहते असतातच असतात. फ्रेडरिक फोर्सिथ आणि जॉन ल कार हे ते दोन लेखक. आंतरराष्ट्रीय राजकारण, अर्थकारण आणि हेरगिरी यांचे अत्यंत वास्तववादी चित्रीकरण करणाऱ्या या दोन समकालीन अभ्यासू लेखकद्वयीतील जॉन ल कार सोमवारी निवर्तले. हे दोघेही रहस्यकथाकार या सामान्य संज्ञेत मावणार नाहीत, इतके मोठे आहेत. दोघेही हाडाचे ब्रिटिश. दोघेही विक्षिप्त. आपले लेखकपण जपणारे. दोघांनाही सुरक्षा सेवेचा अनुभव. आपल्या देशास महासत्तापदावरून पायउतार होताना या दोघांनीही अनुभवले. त्याचे रास्त, प्रामाणिक चित्रण या दोघांच्याही लिखाणात आढळते. आपल्या देशाच्या गुप्तचर यंत्रणेचे मर्यादादर्शन दोघांच्याही लिखाणात विपुल. पुढे फोर्सिथ यांच्या लिखाणात आंतरराष्ट्रीय राजकारण आणि अर्थकारण यांचे अनेक कंगोरे येत गेले. पण गुप्तचर, हेरगिरी वगैरे विषयांपासून ल कार यांचे लिखाण कधीही दूर गेले नाही. हे विषय त्यांच्या खऱ्या व्यक्तिमत्त्वाचा जनुकीय भाग होते.

कारण त्याचा मुळारंभच ‘जॉन ल कार’ यांच्या लफंग्या वडिलांत होता. अनेकदा त्यांना तुरुंगवास झाला. करू नयेत अशा सर्व गोष्टी करणाऱ्या या इसमामुळे ल कार यांची आई घर सोडून निघून गेली. त्या वेळी ते पाच वर्षांचे होते. नंतर पुढे १६ वर्षांनी दोघांची पुनर्भेट झाली. पण ‘जॉन ल कार’ यांच्या मनावरचा ओरखडा काही आयुष्यभर दूर झाला नाही. तोपर्यंतच्या आपल्या आयुष्याचे वर्णन ते ‘मिठीशून्य आयुष्याची पहिली १६ वर्षे’ असे करतात. लहानपणी असे काही घरात असले की मुले कानकोंडी होतात. आईवडिलांविषयी काही वाईट बोलायला ऐकायला त्यांना आवडत नाही. म्हणून मग त्यांनी लहानपणी, आपले वडील गुप्तचर सेवेत असल्याचा आणि त्यामुळे त्यांना दिवसेंदिवस घराबाहेर राहावे लागत असल्याचा बनाव रचला. अशा तऱ्हेने हे गुप्तचर प्रकरण त्यांना हे असे लहानपणीच चिकटले आणि पुढे तरुणपणी तर त्यांना स्वत:च गुप्तचर व्हावे लागले. जर्मन भाषा शिकलेली असल्याने या खात्यात त्यांची सहज भरती झाली. त्यातून थेट जर्मनीत राजधानी बॉन येथे कामाची संधी मिळण्याआधी त्यांना लंडनमध्येच गुप्तचरविषयक सरकारी कार्यालयात काम करावे लागले. या काळात गुप्तचरांच्या सेवेबाबतचे अनेक तपशील त्यांच्या डोळ्याखालून गेले आणि नकळतपणे या साऱ्याच्या नोंदी काढणे त्यांच्याकडून होत गेले. एका अर्थी आगामी लिखाणाचा हा कच्चा माल होता. पुढे प्रत्यक्षात हेर म्हणून जर्मनीत नियुक्त झाल्यावर तो मुबलकपणे जमा होत गेला. पण या खात्यात नोकरी असल्याने काहीही नावाने लिहिण्याची आणि प्रसिद्ध करण्याची मुभा त्यांना नव्हती. म्हणून मग डेव्हिड जॉन मूर कॉर्नवेल यांनी लिखाणासाठी टोपणनाव घेतले. ते ‘जॉन ल कार’ हे. जर्मनीतील अनुभवावर आधारितच त्यांची कादंबरी गाजली. ‘द स्पाय हू केम इन फ्रॉम द कोल्ड’ ही वाचून आणि याच नावाच्या चित्रपटात घनगंभीर आवाजाच्या रिचर्ड बर्टन यांना पाहून किमान दोन पिढय़ा तरी ल कार यांच्या लिखाणाच्या प्रेमात पडल्या असतील. वास्तविक ही काही त्यांची पहिली कादंबरी नाही. तो मान ‘कॉल फॉर द डेड’ हिचा. ‘द स्पाय.’मध्ये हीच कादंबरी पुढे जाते.

नेमक्या याच कादंबरीनंतर ल कार यांना गुप्तचर सेवेतील आयुष्य मागे सोडून पुढे जावे लागले. कारण जॉन ल कार या टोपणनावामागचा खरा चेहरा उघड झाला. त्यामुळे आता गुप्तचर सेवेत राहणे कठीण. योगायोग असा की याच काळात, म्हणजे साठच्या दशकाच्या सुरुवातीस ब्रिटिश गुप्तहेर किम फिल्बी याचे खरे रूप उघड झाले. जगास खऱ्या अर्थाने धक्का बसला. कारण किम हा मूळचा ब्रिटिश गुप्तहेर, मायदेशासाठी सोव्हिएत रशियावर हेरगिरी करीत असताना प्रत्यक्षात तो सोव्हिएत रशियास गुपिते विकताना आढळला. गाजलेला असा हा पहिला डबल एजंट. आपले गुपित फुटल्याने मायदेश सोडून सोव्हिएत रशियात स्थलांतर करण्याची वेळ त्याच्यावर आली. (साम्यवादाने तेव्हा भारलेला किम सोव्हिएत पतनापूर्वी, म्हणजे ८८ साली, गेला तेव्हा त्याचा साम्यवाद आणि रशिया याविषयी पूर्ण भ्रमनिरास झालेला होता. असो) अमेरिका आणि सोव्हिएत रशिया यांच्यातील शीतयुद्ध तापण्याचा काळ, किम फिल्बी वा केंब्रिज फाइव्हसारखी प्रकरणे उघडकीस येण्याचा काळ आणि ल कार यांनी हा सगळा रसरशीत तपशील आपल्या रोचक कादंबऱ्यांत मांडून वाचकांना खिळवून ठेवण्याचा काळ एकच.

पण महत्त्वाचा मुद्दा असा की त्यांच्या कादंबऱ्यांतील नायक हा जेम्स बाँड नाही. अचाट करामतींनी तो रशियास नामोहरम करीत नाही की अमेरिका वा ब्रिटन यांना विजयी करीत नाही. तर तो सामान्य माणसासारखा- ल कार यांच्या शब्दांत सांगायचे तर हलकट- आहे. हाडामांसाचा आहे आणि नैतिकदृष्टय़ा गोंधळलेला आहे. क्रूर आहे आणि पोटासाठी तो वाटेल ते करायला तयार आहे. म्हणजे देशप्रेम हा काही त्याच्या मिरवण्याचा अजिबात भाग नाही. म्हणून तो नैतिकता मिरवत नाही. खरे तर ती मिरवण्याचा प्रश्नच येत नाही. कारण त्यांचा हेर अध:पतित आहे. ‘‘तुम्ही काय समजता हेरांना? ते माझ्यासारखेच क्षुद्र, दारुडे आणि फुशारक्या मारणारे असतात,’’ असे त्यांचा एक नायक म्हणतो. कार यांच्या सर्व कादंबऱ्या या हेरांचे माणूसपण दाखवतात. त्यामुळे खरे तर ब्रिटिश गुप्तहेर यंत्रणांना कार यांच्याविषयी राग होता. पण तरी त्यांची प्रत्येक कादंबरी या गुप्तहेर यंत्रणांसाठी ‘अत्यावश्यक वाचन’ होती. हेरांची राष्ट्रीय बदफैली वृत्ती दाखवणारी ‘कार्ला त्रिवेणी’ ल कारप्रेमींना यानिमित्ताने स्मरेल. दोन महासत्तांच्या संघर्षांत माणसांचे माणूसपण कसे सरसकट पायदळी तुडवले जाते आणि मानवी भावभावनांना कसे य:कश्चितही महत्त्व दिले जात नाही, हे कार यांच्या प्रत्येक कादंबरीतून समोर येणारे सत्य.

म्हणून २००३ साली अमेरिकेने काहीही कारण नसताना सद्दाम हुसेनविरोधात इराकवर लादलेले युद्ध हा त्यांच्या प्रचंड संतापाचा विषय होता. ‘अमेरिका वेडी झाली आहे’ (अमेरिका हॅज गॉन मॅड) असा त्या देशाची कडक निर्भर्त्सना करणारा लेख त्यांनी त्या वेळी थेट ‘टाइम’ साप्ताहिकात लिहिला. (आणि ‘टाइम’ने तो छापला आणि तरी त्या साप्ताहिकास कोणी राष्ट्रविरोधी ठरवले नाही) ओसामाने काढलेली लाज लोकांनी विसरावी म्हणून अमेरिकेने सद्दामला बळी दिले; लक्ष विचलित करण्याच्या कौशल्याचे हे जागतिक यश हे कार यांचे निष्कर्ष. जागतिक राजकारणाचा, विशेषत: अमेरिका आणि पश्चिम आशिया संबंधांचा, अभ्यास करणाऱ्या अनेकांच्या स्मरणात तो लेख आजही असेल. लेखक या नात्याने अमेरिका आणि मातृभूमी इंग्लंड या देशांबाबतची आपली घृणा कार यांनी कधीही लपवली नाही. पण तरीही मार्गारेट थॅचर असोत वा अमेरिकेचे अध्यक्ष थोरले जॉर्ज बुश असोत. जॉन ल कार या दोघांसह अनेकांचे अत्यंत आवडते लेखक होते.

पण लेखक म्हणून कार यांचा मोठेपणा असा की त्यांनी या दोन्ही देशांनी देऊ केलेले सर्व सरकारी पुरस्कार आयुष्यभर टाळले. एकदाही त्यांना त्याचा मोह झाला नाही. ‘‘सर डेव्हिड कॉर्नवेल असे तुम्हाला कदापिही ऐकावयास येणार नाही,’’ असे जाहीरपणे म्हणत ते मायदेशाच्या ‘सर’कीस त्याची जागा दाखवून देत. दुसरे असे की डेव्हिड कॉर्नवेल यांनी आपल्यातील जॉन ल कार यांना कायम दूर ठेवले. आपल्या जीएंना ज्याप्रमाणे लेखक म्हणून ओळखले जाण्याची भीती होती त्याप्रमाणे कॉर्नवेल यांना ल कार या परिचयाचा तिटकारा होता. आपल्यातील लेखक ही जणू कोणी अन्य व्यक्ती आहे असे ते वागत. सार्वजनिक ठिकाणी त्यांनी कधीही आपली ओळख जॉन ल कार अशी सांगितली नाही. लेखकांच्या स्वघोषित महानतेची ते टिंगल करीत. ‘‘लेखकास स्व सोडले तर बाकी जगातले काहीही कळत नाही. त्यामुळे त्याने आपल्या तोंडाचा कमीत कमी वापर केलेला बरा’’ असे ल कार यांचे म्हणणे.

ते किती योग्य आहे हे नव्याने सांगण्याची गरज नाही. काही एक निश्चित वैचारिकतेने स्वत:च्या कलाकृतींकडे कमालीच्या अलिप्तपणे पाहू शकणाऱ्या आणि त्यांना ‘तो मी नव्हेच’ असे म्हणू शकणाऱ्या या उत्तम लेखकास ‘लोकसत्ता’ परिवारातर्फे आदरांजली.