जनाधाराचा आदर करण्याची लोकशाही परंपरा पाळली गेल्याने, विजयाच्या आनंदोत्सवाला समंजसपणाची झालर लागली..

आनंदाला उधाण आले, की ते उत्साहाने साजरे करणे हा माणसाचा स्वभावच असतो. जेव्हा व्यक्तीव्यक्तींमध्ये झिरपणारा आनंद सामूहिक होतो, तेव्हा त्याचा उत्सव होऊन जातो. आनंदाच्या सामूहिक उत्सवाला व्यक्तिगत दु:खाचे किंवा वेदनेचे गालबोट लावायचे नाही, हे सभ्यतेचे संस्कारच असल्याने, समाजात वावरणारी व्यक्ती आपले वैयक्तिकपण बाजूला ठेवते आणि या आनंदाला आपलीही यथासंस्कृती साथ देते. नरेंद्र मोदी, अमित शहा, भारतीय जनता पक्ष आणि त्यांच्या मित्रपक्षांनी लोकसभा निवडणूक नावाच्या लोकशाहीच्या पंचवार्षिक उत्सवात आपल्या देदीप्यमान विजयाच्या नव्या पताका अधिक उंचउंच फडकावल्या, तेव्हा त्याचीच जणू प्रतीक्षा असलेल्या कोटय़वधींनी मनोमन असाच आनंदोत्सव साजरा केला. अशा सामूहिक आनंदाला दोन छटा असतात. पहिल्या छटेनुसार, आपल्याला अपेक्षित असलेली घटना अपेक्षेहूनही अधिक तेजाने अवतरते, तेव्हा त्याचा आनंद अपरिमित असा तर असतोच, पण त्या आनंदक्षणाला गालबोट लावू पाहणाऱ्यांचा अपेक्षाभंग व्हावा आणि तसे झाल्याचे पाहावयास मिळावे ही अपेक्षा पूर्ण होण्याचाही एक वेगळा आनंद असतो. मोदी-शहा यांच्या भाजपप्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीने लोकसभेसाठी मतदान केलेल्या मतदारांपैकी जवळपास निम्म्या जनतेच्या या दोन्ही अपेक्षांची आपल्या चमकदार यशाने पूर्तता केली. अलीकडच्या काळात, आपल्या अपेक्षा आणि त्यांची पूर्ती यांचे गुणोत्तर फारसे जुळत नाही हा अनुभव एकीकडे असतानाही, अपेक्षापूर्तीसाठी ज्यांच्याकडे आशेने पाहावयाचे त्यांनाच समाजाच्या पसंतीचा कौल मिळाला याची प्रचीती येणे हा त्यामुळेच आनंद वाटण्याजोगा क्षण..  मोदींच्या भाजपने निवडणुकीच्या निकालातून या अपेक्षापूर्तीचा क्षण देशातील तमाम जनतेच्या आयुष्यावर अक्षरश: रंगीबेरंगी करून उधळला. त्यामुळे त्या क्षणाचाच उत्सव झाला, आणि मनामनांमध्ये असलेल्या असंख्य स्वप्नांना नवी पालवी फुटल्याच्या भावनेने आणि आश्वस्त भविष्याच्या आशेने तो उत्सव सर्वानी सामूहिकपणे साजरा केला.

असे व्हावे यात आश्चर्य काहीच नाही. कारण आनंद झाला की तो निखळपणे साजरा करावा आणि जे कोणी त्या आनंदाचा उत्सव करतात त्यामध्ये उगीचच मिठाचा खडा घोळवू नये एवढे समजण्याएवढी संस्कृती आपल्या लोकशाहीने समाजात रुजविलेली आहे यात शंका नाही. मोदी-शहांच्या भाजपविजयानंतर साजऱ्या झालेल्या आनंदोत्सवाने या लोकशाही संस्कृतीचे प्रगल्भ दर्शन जगाला घडविले. पराजयाचे दान पदरात पडलेल्या राहुल गांधी, अरविंद केजरीवाल आदींनीही या विजयाचे स्वागत करून लोकशाहीच्या संकेतांचा पुरेपूर आदर केला. या विजयोत्सवामुळे अनेकांच्या अपेक्षांवर विरजण पडलेही असेल. कारण, विविध विचारप्रवाह हा या समाजाचा पाया आहे, आणि या विचारांना विरोध असतानाही त्यांचा सन्मान झाला पाहिजे ही समाजाची संस्कृती आहे. त्यामुळे, ज्यांच्या अपेक्षांना मूर्त रूप मिळाले नाही, त्यांनीदेखील या विजयाचे निखळ स्वागत केले, हेच या उत्सवाचे आगळेपण! असे काही झाले, की सामाजिक पातळीवर उत्सव साजरे करण्यामागचा हेतू सफल झाल्याचे स्पष्ट होते. लोकशाहीचा सर्वात मोठा उत्सव असाच, आनंदाची उधळण करत, सामूहिकरीत्या साजरा झाला.. तसे पाहिले तर उगवणारा प्रत्येक नवा दिवस हा आयुष्यासाठी नवा अर्थ, नवा आनंद घेऊन येतो, तसाच नवा दिवस अनेकांच्या आयुष्यात नव्या समस्यांचीदेखील भर घालत असतो. त्यामुळे, आनंद आणि दु:ख यांची सरमिसळ हे प्रत्येक दिवसाचे रोजचेच रूप असते. तरीही आनंदाचा प्रत्येक क्षण वेचून तो आपणही उपभोगावा आणि शक्य तितका इतरांच्यातही वाटून समस्यांचा कडवटपणा कमी करावा अशीच समाजाची मानसिकता असते. जेव्हा जेव्हा आनंदाचे क्षण ज्यांच्या ज्यांच्या वाटय़ाला येतात, तेव्हा तेव्हा ते इतरांसोबत उपभोगण्यातला आनंदही अधिक असतो, हे सर्वानाच माहीत असल्याने, ज्यांच्या आयुष्यात एखाद्या दिवशी दु:खाचे, समस्यांचे क्षण अधिक असतील, त्यांच्या आयुष्यात आपल्या वाटय़ाच्या आनंदाच्या क्षणांचा काही वाटा उधळावा, अशा भावनेची अनुभूती या विजयोत्सवाच्या निमित्ताने आनंदाची उधळण करणाऱ्यांनी जगाला मिळवून दिली. म्हणूनच, भाजपच्या सलग दुसऱ्या प्रचंड विजयानंतर त्यांच्या राजकीय विरोधकांनीही त्याचे स्वागत केले, आणि पराजयही खुल्या दिलाने पचविला. जनाधाराचा आदर करण्याची या देशाच्या लोकशाहीची परंपरा प्रामाणिकपणाने पाळली गेल्याने, विजयाच्या आनंदोत्सवाला समंजसपणाची झालर लागली.

भाजपच्या या विजयाचे श्रेय नेमके कोणाला याबद्दल निकालाच्या क्षणापर्यंत वेगवेगळे प्रवाद आणि विवादही राजकीय पातळीवर गाजत राहिले.  एवढय़ा अवाढव्य भौगोलिक परिक्षेत्रात आणि प्रत्येक राज्याची राजकीय, सांस्कृतिक, सामूहिक परंपरा भिन्न असल्यामुळे, इतका एकमुखी सामाजिक कौल मिळेल असे चित्र क्वचितच दिसते. समाज एकसंधपणे एखादा निर्णय एकमुखी घेईलच या अनुभवाचा अभावच असतो. पण काही राजकीय नेत्यांना, भाजपच्या – किंवा भाजपची मातृसंस्था असलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या – कार्यपद्धती किंवा व्यवस्थापनशैलीचा दूरवरून अभ्यास करणाऱ्यांनाही या निकालांचा धक्का बसला. तेही साहजिकच होते. शिवाय, समाजमाध्यमांवर महिन्यात जे वातावरण तयार झाले होते, त्यावरून दोन्ही बाजूंच्या अपेक्षा पराकोटीच्या उंचावल्या होत्या.  समाजमाध्यमांवर आभासीपणाचे सावट असते हे वास्तव माहीत असूनही त्याचा वास्तव जीवनावर मोठा प्रभाव आहे, हे नाकारण्यात अर्थ नाही. या आभासीपणाच्या प्रभावामुळे अनेक जण हवेत तरंगू लागले आणि जमिनीवरील वास्तवापासूनचे अंतर वाढत गेल्याने, परिणामांचा धक्का थोडा अधिकच तीव्र झाला. शिवाय, या आभासी विश्वाच्या आधाराने वैचारिक लढायादेखील एवढय़ा तीव्र झाल्या, की या लढाईतील विजय किंवा पराजय वास्तविक आयुष्यालाही झपाटून टाकेल अशी स्थिती उद्भवली. त्यामुळे वास्तवाविषयीच्या अपेक्षा उंचावल्या, आणि त्याहून वेगळे काही घडले तर ते सहन करण्याच्या मानसिक क्षमतेची एक प्रकारे कसोटी सुरू झाली. विजयाच्या उत्साहावर त्याची प्रतिबिंबे उमटली, पण ते क्षणकाळापुरतेच राहिले. अखेर उद्यापासून सुरू होणाऱ्या नव्या दिवसासोबत वाटय़ाला येणारे आनंदाचे आणि दु:ख, वेदना, समस्यांचे क्षण हे एकमेकांसोबत वाटून घेऊनच त्यांचे गुणोत्तर साधावयाचे आहे, या सामाजिक भावनेचा वास्तव पगडा त्याहूनही प्रबळ असल्याने, आभासी दुनियेतील कडवटपणा पुसला जाईल आणि सारे जण हातात हात घालून उद्याला सामोरे जातील, हा विश्वास या आनंदोत्सवानंतर पुन्हा प्रस्थापित झाला आहे. या विश्वासावरच पुढचे काही दिवस देशात आणि परदेशातही आनंदाचे भरते आलेले दिसेल.

अशा निखळ सामूहिक, सामाजिक उत्सवांमध्ये सहभागी होण्याची संधी प्रत्येकास मिळावी आणि त्या उत्सवातून उधळल्या जाणाऱ्या आनंदाचा वाटा प्रत्येकाच्या झोळीत भरभरून पडावा हीच या आनंदोत्सवाच्या निमित्ताने अपेक्षा! तसे झाले, तर प्रत्येक नव्या दिवसासोबत आयुष्यात जमा होणाऱ्या समस्यांचे ओझे पेलण्याची शक्तीदेखील प्रत्येकास मिळेल.