दूरस्थपणे दिल्या जाणाऱ्या ऑनलाइन शिक्षणासाठी शिक्षकांना धडे दिले जातही असतील, पण घरोघरी अडकलेल्या मुलांनी या नव्या पद्धतीत कसं शिकायचं?

करोनासंकटाच्या समस्येला संधी मानून, ऑनलाइन शिक्षणाच्या क्षेत्रातील काही कंपन्या व्यवसायवृद्धीसाठी सज्ज आहेत. पण मुलांना अनुभवाशिवाय कसे शिकता येणार आणि शाळेत आपसूक होणारे  ‘अनौपचारिक समाजशिक्षण’ कसे मिळणार, याचे उत्तर कुणाकडे नाही..

नव्या कोऱ्या पुस्तकांचा सुगंध फुप्फुसं भरून घ्यायचा आणि त्या पुस्तकांना वेष्टनात घालण्यासाठी धडपड सुरू करायची. नव्या वह्य़ांवर प्रत्येक विषयाची लेबलं चिकटवायची, नवी खरेदीही करायची.. केवढी म्हणून तयारी शाळेची! दरवर्षीच्या जून महिन्यात घरोघरी पाहायला मिळणारं हे चित्र यंदा पार धुरकट झालं. करोनाकाळात वाढत चाललेली काळजी आणि त्यामुळे शाळेत जाण्याच्या आतुर भावनेवर विरजणच पडलं. आता घरातच मोबाइलवर किंवा संगणकावर शिकायचं ठरल्यामुळे कधी एकदा मोठ्ठा होतो आणि हाती मोबाइल पडतो असं वाटणाऱ्या लहानग्यांच्या हाती हे लहानसं यंत्र शाळेला पर्याय म्हणून आलं आणि मोबाइलशी खेळू की त्यावर अभ्यास करू, अशी त्यांची अवस्था झाली. कधी तरी शाळा सुरू होतील आणि मित्रांबरोबर दंगामस्ती करायला, डब्यांतल्या खाऊची वाटावाटी करायला, खोडय़ा काढायला आणि ‘टीचर’कडून शिकायला मिळेल, या आशेवर बालवाडीपासून ते दहावीपर्यंतच्या सगळ्या यत्तांमधली मुलं-मुली या मोबाइल नामक यंत्रसदृश शिक्षकाशी जुळवून घेत आहेत. करोनाच्या दहशतीत शाळा नामक व्यवस्थेवरचं हे भलंमोठं प्रश्नचिन्ह मुलांच्या बरोबरीनं- खरं तर काकणभर अधिकच- पालकांनाही भीती घालू लागलं आहे.

शाळेतल्या बाकावर किमान चार-सहा तास बसणाऱ्या या मुलांना घरात मोबाइल किंवा संगणकासमोर काही काळ बसवून ठेवण्याचं अग्निदिव्य करणाऱ्या पालकांना सध्या एका अनामिक भयगंडानं पछाडलं असणार. कधी तरी सगळं जग रुळावर येईल, तेव्हा आपण नोकरीधंद्यानिमित्त बाहेर पडू पण घरातल्या मुलांची शाळा बंदच पडली आणि तंत्रज्ञानाच्या आभासी विश्वातल्या ‘ई-लर्निग’द्वारेच शिक्षण घेण्याची सक्ती झाली तर..? मुलांना फक्त पडद्यावरच दिसणारे शिक्षक आणि मोबाइलच्या पटलावर डोळे किलकिले करून गृहपाठ गिरवणारी मुलं हेच शिक्षणाचं भविष्यचित्र असेल, यावर या बहुतेक पालकांचं एकमत झालेलं असावं. एरवी मूल शाळेत जाऊन सुखरूप परत येतं की नाही, या काळजीनं पालकांचा जीव टांगणीला लागतो. घरी आल्याआल्या एखाद्या ‘प्रोजेक्ट’ची घोषणा झाली की मातापित्यांना हातातली सगळी कामं सोडून त्याच्या मागे धावावं लागतं. आपल्या मुलांना शाळेत शिकवलेलं समजतं की नाही, हे कळण्यासाठी होणाऱ्या पालकांच्या बैठका, शिक्षकांच्या आदेशवजा सूचना असं सगळं सगळं केवळ मुलाला उत्तम दर्जाचं शिक्षण मिळावं, एवढय़ाच अपेक्षेनं सुरू असतं. आताच्या करोनाकाळात घरोघरी सुरू असलेली अभ्यासाची संगणकीय कुस्ती कायमचीच होणार असेल, तर मूल घरकोंबडं होण्याची भीती. मित्र-मैत्रिणी यांच्या रूपानं मिळणारा मैत्रीचा अनुभव, त्यांच्याशी होणाऱ्या लुटुपुटुच्या भांडणांमधून येणारं तडजोडीचं भान, प्रेम आणि आदर या भावनांशी होणारी ओळख, खेळ, कलाकौशल्यं, नाटक, चित्रकला, संगीत या जीवनातल्या महत्त्वाच्या घटकांशी परिचय होत असतानाच स्वत:ला त्यातलं काय मनापासून आवडतंय याची होणारी जाणीव, मित्रांबरोबरच्या स्पर्धेतून भविष्यातल्या गुंतागुंतीच्या आणि ताणतणावाच्या जगाशी होणारी तोंडओळख.. हे सारं आता संगणकावर कसं काय शिकायला मिळणार? याची भीती खरं तर अधिक वाटायला हवी.

शाळा कधी सुरू होतील, याची शाश्वती नसल्यानं घरच्या घरी शिक्षण घेण्याच्या या पद्धतीमुळे शिक्षक आणि विद्यार्थी यांना एका नव्या प्रणालीला सामोरं जावं लागत आहे. तंत्राधारित दूरस्थ शिक्षणात कसं शिकवायचं, याचे धडे शिक्षक गिरवू लागले आहेत. पण विद्यार्थ्यांनी कसं शिकायचं, हे कोण शिकवणार? हा आता कळीचा प्रश्न बनलाय. या निमित्तानं एका मोठय़ा आर्थिक उलाढालीच्या उद्योगाची पहाट होऊ लागली आहे. गेल्याच दशकात मिनी केजी, केजी यांसारख्या अधिकृत नसलेल्या यत्तांच्या शिक्षणात उद्योग क्षेत्रातल्या बडय़ांनी शिरकाव केला होता. काही शे कोटी रुपयांची उलाढाल त्यातून होऊ लागली. तारांकित शिक्षणाच्या या नव्या व्यवस्थेला उत्तम प्रतिसादही मिळू लागला. पहिलीपासूनच्या शिक्षण व्यवस्थेतही अशी उलाढाल घडवण्याचे प्रयत्न सुरू असताना करोना संकट उद्भवलं आणि एक नवी समस्या आ वासून उभी राहिली. या समस्येत संधी शोधणाऱ्या कंपन्या आहेतच. मुलांच्या डोळ्यात पाहून विषय कळतोय की नाही, हे समजणारे शिक्षक एकीकडे आणि संगणकावर एकच धडा पुन:पुन्हा शिकण्याची सोय, जगातलं सारं ज्ञान बोटांच्या पंजात सामावल्याचं सशक्त समाधान, आभासी पण दुतर्फी संवादाची सोय, जगातल्या अद्ययावत माहितीचं सहज उपलब्ध होणारं भांडार.. घराचा उंबराही न ओलांडता मिळणाऱ्या या सोयी आकर्षक तर खऱ्याच. हे असंच कायम सुरू ठेवायचं ठरवलं, तर शाळा नामक व्यवस्थेचं काय होईल? इमारतीची गरजच नसेल आणि एवढय़ा मोठय़ा प्रमाणात शिक्षकही लागणार नसतील, तर त्यांचं भविष्य कसं असेल? याची काळजी कुणी तरी करायलाच हवी.

ती झाली नाही, तर आणखी एका संकटाला सामोरं जाण्याची वेळ येऊ शकेल. आजही अनेक व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी विद्यार्थी एखाद्याच शिकवणी वर्गात दिवसभर बसण्यापेक्षा देशातील उत्तम शिक्षकांच्या समूहाकडून संगणकावर शिकणं पसंत करतात. पण हेही काही सगळ्याच अभ्यासक्रमांसाठी उपयोगी ठरणारं नाही. वैद्यकीय वा अभियांत्रिकी अभ्यासक्रमांत प्रयोगशाळेचं महत्त्व असतं. प्रत्यक्ष पाहणं- स्वत: अनुभवातून समजून घेणं हे प्रत्येकासाठीच आवश्यक. शाळेतल्या प्रयोगशाळेत होणाऱ्या प्रयोगांबाबतही असंच. ते छोटय़ा पडद्यावर पाहून समजणं शक्य असेलही, परंतु त्यातून विषय मुळापासून समजेलच असं नाही.

गेल्या काही वर्षांत घरच्या घरी शिक्षण (होम स्कूलिंग) ही नवी शिक्षण पद्धत लोकप्रिय होऊ लागली आहे. एकच मूल असलेल्या पालकांसाठी ही व्यवस्था अधिक आकर्षक. शाळेत जाऊन शिकण्यापेक्षा शिक्षकांनीच घरी येऊन शिकवायचं आणि मग थेट परीक्षेलाच जायचं, असं याचं स्वरूप. तिथंही मुलामुलींच्या वाढत्या वयातील जीवनकौशल्यांच्या विकासाचा प्रश्न उरतोच. परिसराचं ज्ञान केवळ भौगोलिक असत नाही. ते अनुभवजन्यही असतं. माहितीचं विश्लेषण करत करत प्रत्यक्ष ज्ञानाच्या पायरीपर्यंत पोहोचण्याची कला आत्मसात करणं, जगण्यातली गुंतागुंत समजावून घेतानाच भविष्यातील तीव्र स्पर्धेच्या जगातील अनपेक्षित अशा भयंकर संकटांना तोंड देण्याची क्षमताही अंगी निर्माण करणं, हे कोणत्याही शिक्षण व्यवस्थेचं मूळ उद्दिष्ट असायला हवं. आजचा करोनाकाळ ही त्याची एक झलक. पण शिक्षणातून मिळणाऱ्या या कौशल्यांच्या आधारे अशा न भूतो न भविष्यति संकटांशी दोन हात करण्याची हातोटी नव्याने येऊ घातलेल्या शिक्षण व्यवस्थेत निर्माण करण्याचं आव्हान आता उभं ठाकलं आहे.

मोबाइलवर ‘गेम’ खेळणं आणि अभ्यास करणं यातील तफावत समजावून सांगत असतानाच, या तंत्रज्ञानाचा अधिक विधायक उपयोग कसा करून घ्यावा, हे संपूर्ण जगातील शिक्षण व्यवस्थेपुढलं आजचं आव्हान आहे. त्याला भिडेपर्यंत घरातली ‘ऑनलाइन शाळा’ ही सोय तात्पुरतीच मानायला हवी.