News Flash

रंगभूमीचा रेनेसाँ

नव्या भारतीय रंगभूमीचा उदय होण्यात इब्राहीम अल्काझींचा- आणि त्यांच्या शिष्यप्रभावळीचा- वाटा मोठाच आहे..

संग्रहित छायाचित्र

 

नव्या भारतीय रंगभूमीचा उदय होण्यात इब्राहीम अल्काझींचा- आणि त्यांच्या शिष्यप्रभावळीचा- वाटा मोठाच आहे..

‘थिएटर युनिट’, ‘एनएसडी’, ‘आर्ट हेरिटेज’ आणि ‘अल्काझी फाउंडेशन’ या संस्थांचा, तसेच रंगभूमीचाच नव्हे तर अभिरुचीचा इतिहास अल्काझींनी घडवला..

नाटक हे साहित्य, संगीत, नृत्य, चित्रकला, शिल्पकला, वक्तृत्व, अभिनय, सादरीकरण अशा विविध कलांचे उत्तम संमिश्रण असते याची जाण नाटय़ क्षेत्रात हयात घालवलेल्यांपैकीही किती जणांना असते याबद्दल शंका वाटावी अशी स्थिती असताना या सर्व कलांची उत्तम जाण आणि नेमके भान इब्राहीम अल्काझी यांच्याकडे होते. या बहुअंगी प्रतिभेचा समुचित वापर आपल्या रंगकार्यात करणारे इब्राहीम अल्काझी आधुनिक भारतीय रंगभूमीचे भीष्मपितामह ठरले, त्यामागे इतिहासदत्त कारणेही होती. त्यांच्या आधीची रंगभूमी मराठी अभिजनांसाठी संगीत नाटकांची, गुजराती धनिकवणिकांसाठी ‘पारसी थिएटर’मधली, कामगारवर्गीयांसाठी तमाशांतच अडकलेली आणि इंग्रजाळलेल्यांसाठी शेक्सपियरच्या नाटकांतच अधिक रमणारी होती. स्वातंत्र्यपूर्व काळात हे चालूनही गेले. बालगंधर्वाची नाटके आणि राजा रविवर्मा यांची चित्रे एकाच अभिरुचीने पाहणारी पिढी अस्तंगत होत असतानाच बोलपटांचे युग अवतरले आणि नाटकांपुढे आणखी नवे आव्हान उभे राहिले. ते समर्थपणे पेलण्यासाठी ज्या नव्या जाणिवा आवश्यक होत्या, त्या अल्काझींकडे होत्या. म्हणून ते पितामह. त्यांचे कालवश होणे हा एका प्रदीर्घ कालखंडाचाही अस्त.

जन्माने पुणेकर आणि पुणेस्थित अरबी कुटुंबात जन्म घेतलेल्या अल्काझींनी आपली कर्मभूमी म्हणून भारताला निवडावे, यातही नियतीचा काही संकेत असावा. कारण भारताच्या फाळणीनंतर अल्काझी कुटुंबापैकी केवळ इब्राहीम यांनीच भारतात राहण्याचा निर्णय घेतला. नेहरूंच्या स्वप्नातला समृद्ध भारत साकारण्यात निरनिराळ्या क्षेत्रांत ज्या अनेक व्यक्तिमत्त्वांनी योगदान दिले, त्यांत आधुनिक भारतीय रंगभूमीची पायाभरणी करण्यात,  ती सर्वदूर रुजविण्यात अल्काझींचा सिंहाचा वाटा आहे.

लहानपणापासून अनेक विषयांत रुची असल्याने त्यासंबंधीच्या पुस्तकांत रममाण होणाऱ्या अल्काझींच्या आयुष्याला खरी दिशा मिळाली ती मुंबईच्या झेवियर्स कॉलेजात! नट आणि दिग्दर्शक म्हणून त्यांनी रंगभूमीवर ‘प्रयोग’ करायला सुरुवात केली ती येथेच. त्यांचे मित्र सुलतान ऊर्फ ‘बॉबी’ पदमसी यांच्या नाटय़संस्थेतून त्यांनी पुढे आपली ही आवड अधिकाधिक पूर्णतेकडे नेली. ज्या क्षेत्रात आपल्याला काम करावयाचे आहे त्याचे शास्त्रशुद्ध प्रशिक्षण आपण घेतले पाहिजे, या जाणिवेतून त्यांनी वयाच्या २३व्या वर्षी लंडनमधील रॉयल अ‍ॅकॅडमी ऑफ ड्रॅमॅटिक आर्ट्स (‘राडा’)मधून नाटय़ प्रशिक्षण घेतले. त्यांच्या ‘राडा’तील कामगिरीने प्रभावित झालेल्या तिथल्या रंगकर्मीनी त्यांना ब्रिटनमध्येच रंगभूमीवर काम करण्याचा आग्रह केला होता. परंतु तिथे न थांबता ते भारतात परतले. मुंबईत त्यांनी ‘थिएटर युनिट’ ही नाटय़संस्था स्थापन केली. भुलाभाई देसाई इन्स्टिटय़ूटमध्ये या संस्थेचे कार्यालय होते. तिथेच त्यांचा नाटय़ प्रशिक्षणक्रमही चाले. साठच्या दशकात त्या संस्थेची वास्तू अनेक कलांच्या ‘उदयमान’ कर्त्यांनी गजबजलेली होती. साहित्य, संगीत, नृत्य, चित्र, शिल्प अशा विविध क्षेत्रांत मन्वंतर घडवू पाहणाऱ्या कलावंतांचा तिथला राबता अल्काझींसाठी लाभदायी न ठरता तरच नवल. जागतिक साहित्य व रंगभूमीची विलक्षण जाण असलेल्या आणि रंगभूमीवरील दृश्यात्मकतेचे भान असणाऱ्या त्यांना हवे ते वातावरण येथे मिळाले आणि त्यांना अनेक ‘प्रयोग’ करता आले. भुलाभाईच्या हिरवळीवर, तिथल्या झाडांचाही नेपथ्यासाठी वापर करून त्यांनी नाटक सादर केले. एकीकडे शेक्सपिअर, मोलिएर, इब्सेन, चेकॉव्ह आदींच्या नाटय़कृती सादर करून नवे ‘रंगप्रयोग’ करण्याची आपली क्षमता तपासून पाहत असतानाच दुसरीकडे विजया मेहता, सत्यदेव दुबे यांच्यासारखे पुढील पिढीचे रंगकर्मी घडविण्याचे त्यांचे कामही सुरूच होते.

अशात १९५४ मध्ये त्यांना संगीत नाटक अकादमीकडून राष्ट्रीय नाटय़ विद्यालय (नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा- एनएसडी) सुरू करण्यासाठी निमंत्रित करण्यात आले. राष्ट्रीय स्तरावर रंगकार्य करण्याची आणि प्रशिक्षित नाटय़कर्मी घडवण्याची ही संधी ते दवडणे शक्यच नव्हते. आपल्या ज्ञानाचा उपयोग भारतीय रंगभूमी आकारण्यासाठी करण्याचे हे आव्हान त्यांनी स्वीकारले व पंधरा वर्षांच्या आपल्या कारकीर्दीत ही संस्था देशाच्याच नव्हे, तर जगाच्या नकाशावर आणली. या प्रवासात त्यांनी आपल्यातल्या नटाला मागे सारून दिग्दर्शक, प्रशिक्षक,  नेपथ्यकार, प्रकाशयोजक, प्रशासक अशा नाटकाच्या सगळ्या अंगांत स्वत:ला झोकून दिले. आजही राष्ट्रीय नाटय़ विद्यालयाची जी ख्याती व दबदबा आहे, ती अल्काझींची पुण्याई.

विविध पिंडप्रकृतीची इंग्रजी, अन्य भाषिक तसेच भारतीय भाषांतील ५० हून अधिक नाटके त्यांच्या खाती जमा आहेत. ‘अंधा युग’, ‘तुघलक’, ‘आषाढ का एक दिन’ ही त्यांपैकी प्रमुख. त्यांनी कमानी रंगमंचाबरोबरच फिरोजशहा कोटला स्टेडियम, पुराना किला या ठिकाणीही ‘प्रयोग’ सादर करून नाटकाची सर्वव्यापकता दाखवून दिली. एनएसडीत जगभरातील उत्तमोत्तम नाटय़कर्मीची व्याख्याने वा नाटय़प्रयोग घडवून, साहित्य, कला यांविषयीचीही व्याख्याने ठेवून त्यांनी विद्यार्थ्यांना बहुअंगी ज्ञान देण्याचे प्रयत्न केले. यातून उत्तम शिष्य घडले; जे पुढे नाटक, चित्रपट  विश्वात तळपले.    जयदेव व रोहिणी हट्टंगडी, रतन थिय्याम, कमलाकर सोनटक्के, नसीरुद्दीन शाह, ओम पुरी, सुहास जोशी, उत्तरा बावकर, एम. के. रैना, पंकज कपूर.. ही त्यांची प्रभावळ. कडक शिस्तीचे, सर्वोत्तमाचा आग्रह धरणारे अल्काझी काही वेळा परिपूर्णतेच्या ध्यासाचा अतिरेक करत अशीही काहींची धारणा होती. पण ‘नट जन्मावाच लागतो’ हे मिथक मोडून काढणाऱ्या अल्काझींनी घडवले ते बावन्नकशी रंगकर्मी.

पन्नाशीनंतर एनएसडीतून बाहेर पडून त्यांनी त्याच परिसरातील ‘त्रिवेणी कला संगम’मध्ये १९७७ साली पत्नीसह ‘आर्ट हेरिटेज गॅलरी’ काढली. त्यांच्यात दृश्यभानाचे उत्तम अंग होते; जे त्यांना नाटकाच्या रचनेत उपयोजित करता आले. सत्यजित राय जसे स्वत:चे चित्रपट आधी आरेखित करत, तसे अल्काझी त्रिमित प्रतिकृतींतून करत. तरुणपणी त्यांना चित्रकार व्हायचे होते. चित्रकलेची सखोल समजही होती. त्यातूनच उच्च अभिरुचीचे कलासंग्राहक म्हणून त्यांनी नावलौकिक मिळवला. दृश्यकलेचा भारतीय प्रेक्षकवर्ग वाढवण्याचे हे काम एकीकडे, तर परदेशातील अनेक संग्रहालयांत अल्काझींच्या संग्रहातील कलाकृती गेल्यामुळे भारतातील जे उत्तम, ते जगाला दाखविण्याचे कामही त्यांनी केले. ९४ वर्षांचे प्रदीर्घ, समृद्ध, कलासंपन्न आयुष्य त्यांना लाभले. ते हयात असतानाच ‘अल्काझी फाऊंडेशन फॉर द आर्ट्स’ ही पावणेदोन लाख छायाचित्रांचा ठेवा जपणारी संस्था उभी राहिली.  छायाचित्रांचा इतका मोठा संग्रह एकटय़ा अल्काझींचाच. ज्येष्ठ रंगकर्मी अमल अलाना व फैजल या दोन्ही मुलांनी, नातवंडांनी त्यांचा हा कलावारसा पुढे नेला.

अल्काझी फारच इंग्रजी होते, असे बसल्या बसल्या म्हणणाऱ्यांना ओम पुरीसारखा विद्यार्थी केवळ इंग्रजी येत नाही म्हणून एनएसडीबाहेर पडू नये यासाठी अल्काझींनी केलेले प्रयत्न माहीत नसतात, किंवा रतन थिय्यामना अल्काझींनी दिलेले बळ माहीत नसते. बॉबी पदमसींच्या अकाली मृत्यूपूर्वी रवीन्द्रनाथ टागोरांचे ‘चित्रा’ हे नृत्यनाटय़ पदमसींनी हाती घेतले आणि त्यासाठी अल्काझींनी कथकलीचे धडे गिरवले, हे तर कुणालाच माहीत नसावे. ही माहिती असायला हवी, कारण तो आपल्या रंगभूमीच्या- भारतीय रंगभूमीच्या आधुनिक पर्वाचा इतिहास आहे. चित्रकलेतील आधुनिकतावादी बंडखोरांनी प्रतिमांचे जे भंजन केले, तसे अल्काझींनी केले नाही. त्यांचा मार्ग रेनेसाँ वा युरोपीय प्रबोधनकाळासारखा, असलेले  टिकवून  त्याला  नवा अर्थ देण्याचा होता. शेक्सपिअरी रंगभूमीपासून सुरुवात केलेले अल्काझी अनेक पाश्चात्त्य नाटके हिंदीत आणतात आणि पुढे भवाईसारखा अस्सल देशी नाटय़ प्रकारही हाताळून लोकरंगभूमी आणि अभिजनांची रंगभूमी यांतील भेद मिटवतात, हा भारतीय रंगभूमीचा रेनेसाँ होता. अल्काझींना ‘लोकसत्ता’ परिवारातर्फे आदरांजली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 6, 2020 12:04 am

Web Title: editorial on pioneers of modern indian theater ebrahim alkazi abn 97
Next Stories
1 पूर्ततेनंतरची पोकळी!
2 विद्वानांचा विरंगुळा
3 सपाटीकरण कोणाचे?
Just Now!
X