03 June 2020

News Flash

‘बालविवाहा’चे दुष्परिणाम..

भाजप आणि शिवसेना- या दोघांनी कितीही आदळआपट केली, तरी त्यांना एकत्र येण्यावाचून पर्याय नाही.

(संग्रहित छायाचित्र)

आपला मान राखला जावा अशी इच्छा असणाऱ्याने इतरांचाही मान ठेवावा लागतो आणि ताठ मानेने जगायचे तर आपला हात कोणत्याही दगडाखाली नाही याचा आत्मविश्वास असावा लागतो, हे जितके खरे तितकेच हेही खरे की, अपमान करणारे राजकारण करण्यात काही शहाणपण नाही..

चारचौघांत कचाकचा भांडताना एकमेकांचा जाहीर उद्धार झाल्यानंतर गळ्यात गळे घालून नसलेल्या प्रेमाचे प्रदर्शन करणाऱ्या आणि इतका वेळ भांडणाची मजा घेतली म्हणून इतरांवरच डाफरणाऱ्या हास्यास्पद जोडप्यासारखी भाजप-शिवसेना युतीची अवस्था आहे. सुखाने नांदण्याइतका समजूतदारपणा नाही आणि काडीमोडाची धमक नाही. संसार झेपत नाही आणि ते सांगताही येत नाही, असा हा प्रकार. खरे तर हे असे होऊ शकते हे मान्य. पण आपण एकत्र नांदतो म्हणजे जणू महाराष्ट्रावरच उपकार करतो असा या दोघांचा जो आव असतो, तो मात्र तिडीक आणणारा आहे. एरवी कोणत्याही दोघांच्या भांडणात तिसऱ्याने नाक खुपसायचे कारण नाही. पण येथे प्रश्न राज्याचा असल्याने या दोघांत जे काही सुरू आहे त्याचा समाचार घेणे आवश्यक ठरते.

तो घेताना या दोहोंतील विश्वासार्हता रसातळास गेल्याचे सत्य मान्य करावे लागेल आणि तशी ती जाण्यात सध्या मोठा भाऊ म्हणून मिरवणाऱ्या भाजपचा वाटा मोठा आहे, हेदेखील मान्य करावे लागेल. याचे कारण भाजपकडून आपल्या सहयोगी पक्षांस दिली जाणारी वागणूक. ती आदराची नाही. बिहारात नितीशकुमार यांच्यासारख्या नव्या जोडीदारासमोर नांगी टाकणाऱ्या वा एके काळी चंद्राबाबू नायडू यांच्या तेलुगू देसमच्या नाकदुऱ्या काढणाऱ्या भाजपने सातत्याने शिवसेना या आपल्या जुन्या भागीदारास नेहमीच हडतहुडुत केले. यामागे आज ना उद्या आपण स्वबळावर येऊ शकतो, सबब या जोडीदाराची गरज नाही हे कारण. भाजपचे आपल्या सहयोगी पक्षांशी वागणे हे संशयातीत नाही, हा इतिहास आहे. भाजपची साथ ही अजगराच्या मिठीसारखी असते. सुरुवातीस या मिठीची जाणीव होत नाही. होते तेव्हा ही मिठी बरगडय़ा मोडण्याइतकी ताकदवान झालेली असते. तेव्हा तीमधून बाहेर पडण्याचा प्रयत्न हा अजगरापेक्षा ज्याला मिठी मारली त्यासाठीच जीवघेणा ठरतो.

शिवसेनेस आता याची जाणीव होत असणार. पण त्यास शिवसेना स्वत:च जबाबदार धरावी लागेल. मराठीच्या मुद्दय़ावर बदफैलीपणा केल्यानंतर त्या पक्षाने स्वत:स हिंदुत्वाच्या रथात कोंबले. त्या रथाचे सारथ्य भाजपकडे असल्याने तेथे सहप्रवासी होण्याखेरीज सेनेस पर्याय नव्हता. आणि अजूनही नाही. स्थानभ्रष्ट होणे हे ज्याप्रमाणे इभ्रतीची माती करणारे असते, त्याप्रमाणे असे मुद्देभ्रष्ट होणे हे राजकीय पक्षांसाठी विनाशकारी असते. तेव्हा भाजपकडून सेनेस दिल्या जाणाऱ्या दुय्यम वागणुकीस खुद्द सेना नेते जबाबदार आहेत यात शंका नाही. आज भाजपकडून कोणी तरी हलकीसलकी व्यक्ती चच्रेसाठी ‘मातोश्री’वर पाठवली जाते म्हणून नाराजी व्यक्त करणाऱ्या सेना नेत्यांस स्वत:च्या वर्तनाची जाणीव करून द्यायला हवी. प्रमोद महाजन, गोपीनाथ मुंडे आदी नेत्यांना आपण एके काळी कशी वागणूक दिली, हे एकदा सेना नेत्यांनी आठवून पाहावे. आपला मान राखला जावा अशी इच्छा असणाऱ्याने इतरांचाही मान ठेवावा लागतो, हे साधे तत्त्व सेना नेते विसरले. दुसरे असे की, ताठ मानेने जगायचे असेल तर आपला हात कोणत्याही दगडाखाली नाही, याचा आत्मविश्वास असावा लागतो. परंतु येथे सेनेचा हातच काय, पण संपूर्ण देहच मुंबई महापालिकेच्या भल्याथोरल्या ‘खड्डय़ात’ रुतलेला. हे सत्य शिवसेनेस पचवावे लागेल. असे सत्य जेव्हा पचवावे लागते, त्या वेळेस अपमानही गिळावा लागतो. त्यामुळे भाजपकडून मान मिळत नाही, याची तक्रार करण्यात अर्थ नाही.

त्याच वेळी हेही खरे की, असे अपमान करणारे राजकारण करण्यात काही शहाणपण नाही. राजकारण ही माणसे जोडण्याची कला आहे. स्वत:च्या मिजासीवर राज्य एखादे वेळेस वा दुसऱ्यांदाही मिळेल. पण ते केवळ स्वत:च्याच जिवावर राखता येईलच असे नाही. ‘आपणास कोणाची गरज नाही,’ असा फुकाचा अभिमान बाळगणारे वैयक्तिक आयुष्यातही अखेर एकटे पडतात आणि त्या वेळेस कोणी ढुंकूनही पाहावयास येत नाही. राजकारणासही हे लागू पडते. ‘राखावी बहुतांची अंतरे’ हे यशस्वी समाजकारणाचे सूत्र. खोटय़ा आत्मगौरवासाठी त्यास तिलांजली देण्याचे कारण नाही. भाजपकडून सध्या ती दिली जाते, हे सत्य. जम्मू-काश्मिरातील मेहबूबा मुफ्ती यांचा पीडीपी ते आंध्रातील तेलुगू देसम, तमिळनाडूतील अण्णा द्रमुक व्हाया महाराष्ट्रातील शिवसेना हा भाजपचा प्रवास हा सहयोगी पक्षांच्या अपमानाचा इतिहास आहे. सद्य:स्थितीत महाराष्ट्रात तर याची अजिबात गरज नाही. आणि नव्हती. हे भान सुटल्याने या निवडणुकीत भाजपने अनेक सेना उमेदवारांच्या पराभवासाठी जंग जंग पछाडले. सेनेची जिरवण्याच्या उद्देशाने कोकणात गोव्याच्या मुख्यमंत्र्यांना पाठवून, नामांकित राणे पितापुत्रांना घेऊन वा अलिबाग/उरण परिसरांत बंडखोरांना रसद देऊन भाजपने सेनेची कोंडी करण्याचे अनेक प्रयत्न केले. बरे या सगळ्यात भाजप तत्त्ववादी राहिला असता तरी त्याचे स्वागत करता आले असते. त्याबाबत सेनेप्रमाणेच भाजपची स्थिती. निवडणुकांच्या तोंडावर घाऊक पक्षांतरितांना भाजप आपले म्हणत गेला. शिवसेना ते राष्ट्रवादी आणि भाजप (तूर्त) असा प्रवास करणाऱ्या राहुल नार्वेकर यांच्याप्रमाणे अनेक ‘उडत्या तबकडय़ां’ना भाजपने उमेदवारी दिली; त्यामागे कोणता उदात्त तत्त्वविचार असणार? तेव्हा उगा नैतिक टेंभा मिरवावा अशी भाजपची स्थिती नाही. बऱ्याचदा मद्यपींपेक्षा निर्व्यसनींची कथित नैतिकता अधिक डोके उठवते. भाजपचे हे असे झाले आहे आणि त्यात तो निर्व्यसनीही राहिलेला नाही. म्हणजे अधिक धोकादायक.

ही डोकेदुखी खपवून घेतली गेली असती. पण कधी? त्या पक्षाची कामगिरी उत्तम झाली असती तर. पण त्या आघाडीवरही भाजपची बोंबच. त्या पक्षाची अवस्था किती वाईट असावी? तर पंतप्रधान नरेंद्र मोदी, पक्षाध्यक्ष अमित शहा, इतकेच काय पण उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यासारख्यांना भाजपने ज्या मतदारसंघांत ठरवून प्रचारार्थ उतरवले, त्यातील अनेक मतदारसंघांत भाजप उमेदवारांचा दणाणून पराभव झाला. दिमतीला अनेक सरकारी यंत्रणा आणि समोर पेंगुळलेली काँग्रेस असूनही भाजप मतदारांचे डोळे दिपवू शकला नाही. प्रतिस्पध्र्याबाबत ही अशी परिस्थिती आणि वर सहकारी शिवसेनेचे नाक कापण्याची अनावश्यक आणि अनावर खुमखुमी. त्यामुळे भाजपने उलट स्वत:चेच नुकसान करून घेतले. हे असे आत्मघातकी राजकारण करून भाजपने मिळवले काय? जे काही मिळाले, त्यास भव्य यश म्हणावे असा भाजपचा आग्रह असला तरी हे यश (?) बकरीच्या शेपटासारखे आहे. त्यामुळे ना धड अब्रू झाकली जाते, ना माश्या उडवता येतात.

तेव्हा अशा वेळी खरे तर सुसरबाई तुझी पाठ किती मऊ, असे म्हणत भाजपने जे काही द्यायचे ते सेनेस देऊन घरातले भांडण बाहेर येऊ न देण्याची दक्षता घ्यायला हवी. त्यासाठी आपल्यातील ‘अहं’ला दूर करावे लागेल. भाजपने ते करावे. या दोघांनी कितीही आदळआपट केली तरी त्यांना एकत्र येण्यावाचून पर्याय नाही. शिवसेनेस पाठिंबा देऊन त्या पक्षाचे आयुर्मान वाढवण्याचा धोकादायक उद्योग काँग्रेस वा राष्ट्रवादी करतील ही शक्यता फारच कमी. उलट या पाठिंब्याचे गाजर दाखवत दोन्ही पक्षांतील मतभेद जास्तीत जास्त चव्हाटय़ावर कसे येतील, हे पाहण्यातच काँग्रेस/राष्ट्रवादीचे हित आहे. हे तरी सेना-भाजपने लक्षात घ्यावे आणि हे सार्वजनिक थेर थांबवावे.

अर्थात, तसे करताना या दोन्ही पक्षांना दीर्घकालीन विचार करून आपली धोरणे आखावी लागतील. या दोघांत तीन दशकांची युती आहे वगैरे युक्तिवाद ठीक. पण ही इतकी जुनी युती बालविवाहासारखी आहे. अशा विवाहात अडकणाऱ्या जोडप्याचा संसार आत्मभान येईपर्यंत सुखाचाच असतो. मोठे झाल्यावर स्वत्वाची जाणीव झाली, की आपल्यातील विजोडपण त्यांना कळते. तसे या दोघांचे झाले आहे. आता पर्याय दोनच. ‘लहान’ वयात लग्न लावून देणाऱ्यांच्या स्मृती जागवत एकत्र नांदणे. किंवा काडीमोड. तेव्हा झाले तितके पुरे. आता यांनी संसारास लागावे, हे उत्तम.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 4, 2019 12:10 am

Web Title: editorial on shiv sena bjp alliance assembly election 2019 abn 97
Next Stories
1 फ्रँचायझी क्रिकेटचे फलित?
2 अग्रलेख ; पाळतशाही
3 मारक मक्तेदारी
Just Now!
X