नड्डा कोणत्या परिस्थितीत भाजपच्या अध्यक्षपदाची धुरा खांद्यावर घेत आहेत यापेक्षा शहा कोणत्या परिस्थितीत अध्यक्षपद सोडत आहेत, हे समजून घेणे महत्त्वाचे..

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

प्रमुख नेते जेव्हा सत्तापदांवर असतात तेव्हा अध्यक्ष हवा- पण पक्षचलित सरकारचे नेतृत्व करणाऱ्याच्या हातास हात लावून मम म्हणण्यापुरताच, म्हणून अपेक्षा निर्मिती करू शकणारे पक्षाध्यक्ष नेमले जात नाहीत.. यास इंदिरा गांधीकालीन काँग्रेसप्रमाणे आताचा भाजपही अपवाद नाही..

जना कृष्णमूर्ती, कुशाभाऊ ठाकरे वा बंगारु लक्ष्मण अशा बिनचेहऱ्यांच्या अध्यक्षांनंतर भाजपने सक्षम पक्षप्रमुख पाहिला तो अमित शाह यांच्यात. वर उल्लेखिलेल्या तिनांपैकी लक्ष्मण भलत्याच कारणांसाठी प्रसिद्ध पावले आणि नंतर पक्षाने विजनवासात लोटल्यानंतर निजधामास अंतरले. या तिघांपेक्षा वेगळ्या पद्धतीने पक्ष हाकण्याचा प्रयत्न केला तो नितीन गडकरी यांनी. पण भाजपतील बलवान उत्तर भारतीय नेतेगणांनी त्यांना काही उसंत मिळू दिली नाही. त्या पदावरून त्यांना जावे लागले. ती सल गडकरी यांच्या मनात अद्यापही आहे. अध्यक्षपदाच्या कार्यकाळात गडकरी यांनी ज्यांना राजकीय पुनरुज्जीवनासाठी सर्वथा मदत केली त्या अमित शहा यांच्याकडे पक्षाची सूत्रे आली आणि भाजपचे खऱ्या अर्थाने ‘राजकीय पक्षा’त रूपांतर झाले. याचे श्रेय जितके शहा यांना जाते त्यापेक्षा अधिक ते नरेंद्र मोदी यांच्या पदरात जाते. सलग तीन वेळा गुजरातचे मुख्यमंत्री पद भूषवल्यानंतर मोदी यांनी स्वत:स पंतप्रधान पदासाठी उत्तमपणे बेतून तयार केले. या काळात शहा हे त्यांचे यशस्वी आणि हक्काचे ‘हनुमान’ होते. तेव्हा मोदी यांची पंतप्रधानपदी निवड झाल्यावर पक्षाध्यक्षपद अमित शहा यांच्याकडे येणे ही औपचारिकता होती. आता सलग दुसऱ्यांदा पंतप्रधानपदी निवड झाल्यावर शहा यांची पदोन्नती होऊन ते मोदी यांचे ‘लक्ष्मण’ बनले. साहजिकच पक्षासाठी नव्या ‘हनुमाना’ची गरज होती. त्या पदी सोमवारी जगत प्रकाश नड्डा यांची निवड अधिकृतपणे घोषित झाली.

वास्तविक काँग्रेस असो वा भाजप. या दोन्ही पक्षांत सत्ता असताना पक्षाध्यक्ष हा नामधारी असतो आणि सत्ता नसताना संभाव्य पंतप्रधानपद अध्यक्षपद भूषवतो. त्याचमुळे अटल बिहारी बाजपेयी पंतप्रधानपदी असताना अध्यक्षपदी कृष्णमूर्ती आहेत की कुशाभाऊ ठाकरे हा केवळ तांत्रिक तपशील ठरतो. इंदिरा गांधी पंतप्रधान असताना त्याचमुळे देवकांत बरुआ हे नामधारी अध्यक्ष असतात. अध्यक्षपदावरील व्यक्ती पंतप्रधानापेक्षा अधिक प्रभावी झाली की पक्षाची अवस्था नाकापेक्षा मोती जड अशी होते याचे उत्तम उदाहरण म्हणजे मनमोहन सिंग- सोनिया गांधी. संयुक्त पुरोगामी आघाडीच्या सरकारात सिंग पंतप्रधान होते तरी पक्षाधिकार आणि काही प्रमाणात सरकाराधिकार हे सोनिया गांधी यांच्याकडे होते. त्या तुलनेत मोदी-शहा या दुकलीचे मूल्यमापन करायला हवे.

ते करू गेल्यास ठसठशीतपणे समोरे येते ते मोदी-शहा यांचे अद्वैत. हे दोघे भाजपच्या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. भाजपच्या इतिहासात असे एकजिनसीपण पक्षाने कधीही आतापर्यंत अनुभवले नव्हते. या दोघांचे वैशिष्टय़ म्हणजे पक्षाशी संबंधित कोणत्याही मुद्दय़ाचे निदान आणि त्यावरचा उपाय यांत आश्चर्य वाटावे अशी या दोघांची एकात्मता. त्यामुळे ही जोडी अभेद्य आणि अमाप अधिकारी ठरली. कोणत्याही पक्षात- मग तो शिस्तप्रिय वगरे भाजप असला तरी-दोन उच्चपदस्थांतील फटी शोधणे, आढळल्या तर बोटे घालून त्या रुंद करणे आणि नाही आढळल्या तर त्या तयार करणे हा उद्योग पक्षांचे कारभारी करीत असतात. भाजपतही तसे प्रयत्न झाले. पण कोणालाही त्यात यश आले नाही. या दोघांच्या कारभारात मतभेदाची एकसुद्धा अस्पष्ट रेषा उमटली नाही. त्यामुळे या दोघांची एकी हा भाजपत दराऱ्याचा, आणि प्रसंगी भीतीचाही, मुद्दा राहिला. तेव्हा शहा यांची पदोन्नती होत असताना भाजपचा पुढचा अध्यक्षही असाच या.. आणि फक्त याच.. दोघांच्या संमतीने निवडला जाणार हे उघड होते. तसेच झाले. नड्डा हे अध्यक्ष झाले. ही तुलना आणि साम्य येथेच संपते. यापुढे नड्डा यांच्यासमोरील आव्हानांचा विचार करायला हवा.

तो करताना नड्डा कोणत्या परिस्थितीत अध्यक्षपदाची धुरा खांद्यावर घेत आहेत यापेक्षा शहा कोणत्या परिस्थितीत अध्यक्षपद सोडत आहेत, हे समजून घेणे महत्त्वाचे. शहा यांच्याकडे अध्यक्षपद आले त्या वेळी मोदी यांच्याबाबतची नवलाई संपलेली नव्हती आणि त्यांच्याविषयी काही एक आशा होती. सद्य:स्थितीत नवलाई पूर्ण संपलेली आहे आणि आशेचे रूपांतर निराशेत होण्यास सुरुवात झाली आहे. गेल्या वर्षी चार राज्यांतील निवडणुका, अलीकडेच हरयाणा, महाराष्ट्र आणि झारखंड या राज्यांनी दाखवलेला इंगा या वास्तवाचा निदर्शक. या सगळ्या काळात गुजरात राज्य मोदी यांनी ऐनवेळी जिवाचे रान करून कसेबसे वाचवले. अन्यथा ते राज्यही हातून जाते. या पराभव मालिकेनंतर सध्या सुरू आहे दिल्ली निवडणुकीचा प्रचार. तेथे मतदान काही आठवडय़ांवर आले आहे. त्यामुळे अध्यक्ष म्हणून नड्डा यांना आता तेथे करून दाखवण्यासारखे काही नाही. याआधी महाराष्ट्रातील निवडणुकांच्या काळात नड्डा हे पक्षाचे कार्यकारी अध्यक्ष होते. पण म्हणून या निवडणुकीत त्यांना काही भूमिका होती असे नाही. ती जबाबदारी अध्यक्षांचे विश्वासू भूपेंद्र यादव यांच्याकडे होती.

यानंतर होतील बिहार विधानसभेच्या निवडणुका. त्या जनता दलाचे नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखाली लढवल्या जातील असे खुद्द अमित शहा यांनीच जाहीर केले आहे. खेरीज सुशील कुमार मोदी यांच्या रूपाने भाजपस त्या राज्यात नेतृत्वाचा चेहरा आहे. तेव्हा शहा/ मोदी यांच्या इच्छेनुसार प्रचारादी मोहिमा राबवणे इतकेच काय ते काम नड्डा यांना राहील. पुढे असतील पश्चिम बंगाल विधानसभेच्या निवडणुका. त्या राज्यावर खुद्द शहा/ मोदी लक्ष ठेवून आहेत आणि त्यांच्या वतीने कैलाश विजयवर्गीय हवी ती हडेलहप्पी करण्यास सज्ज आहेत. याचा अर्थ इतकाच की नड्डा यांना आपले कौशल्य दाखवण्याची पूर्ण संधी मिळेल ती थेट उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकांत. गेल्या निवडणुकांनंतर योगी आदित्यनाथ यांनी ज्या प्रकारे पक्षनेतृत्वास वेठीस धरले होते ते पाहता या वेळी ते नड्डा यांना काही वेगळे करू देतील असे मानणे हा फारच भाबडा आशावाद झाला.

हे नड्डा यांच्याविषयी नन्नाचा पाढा लावावा यासाठी नाही. त्याची गरजही नाही. पण तरी हे वास्तव समजून घ्यायचे ते या नव्या अध्यक्षासमोर काय वाढून ठेवले आहे, हे कळावे म्हणून. एकेकाळी चिरेबंदी भासणाऱ्या या पक्षाचा बुरूज अद्याप ताठ उभा आहे. पण त्याचे चिरे निखळण्यास सुरुवात झाली आहे हे नक्की. अशा वेळी ना वक्तृत्वकला ना सिद्ध प्रशासकीय कौशल्य अशा नड्डा यांच्याकडे पक्षाध्यक्षपद आले आहे. मोदी सरकारच्या पहिल्या खेपेत ते मंत्री होते. या सरकारातील नामांकितांना आपल्या कारभाराचा उजेड पाडायची संधी नसताना त्या वेळी नड्डा आपला काही ठसा उमटवू शकले नाहीत, या म्हणण्यास अर्थ नाही. भूतकाळातील कामगिरी ही भविष्याचे आकलन होण्यासाठी सूचक मानावयाची असेल तर त्यामुळे नड्डा यांच्याकडून उगा फार अपेक्षा करता येणार नाहीत.

कारण काँग्रेस असो वा भाजप; असे अपेक्षा निर्मिती करू शकणारे अध्यक्षपदी नेमले जात नाहीत, हाच इतिहास आहे. अध्यक्ष हवा. पण तो पक्षचलित सरकारचे नेतृत्व करणाऱ्याच्या हातास हात लावून मम म्हणण्यापुरताच. नड्डा यांनाही तेच करावे लागेल आणि ते तेच करतील. आगामी राजकीय नाटय़ात भाजपच्या संहितेचे लेखन, दिग्दर्शन, नेपथ्य, प्रकाशयोजना, संगीत आणि मुख्य भूमिका ‘त्या’ दोघांकडेच असेल. अध्यक्ष म्हणून नड्डा नाममात्र असतील. त्या वाटचालीस त्यांना शुभेच्छा.

मराठीतील सर्व अग्रलेख बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Editorial page bjp congress bjp jp nadda elected bjp president akp
First published on: 21-01-2020 at 00:01 IST