हाती राज्यघटनेची प्रत वा गांधी-आंबेडकर यांची छायाचित्रे घेऊन इस्लामी जनतेचा सामाजिक हुंकार बाहेर पडत असताना, इस्लामी देशांतील तरुणही इस्लामीकरणापासून दूर जात आहेत..

‘अरब बॅरोमीटर’ या गटाने इराण, इजिप्त व आखाती देशांत २००९ पासून सातत्याने केलेल्या पाहण्यांत हे बदल आढळले; त्यास न्यू यॉर्क टाइम्सचे नियमित भाष्यकार मुस्तफा अक्योल हेही दुजोरा देतात. तरुणांच्या आकांक्षा हे या बदलामागचे कारण!

‘‘दंगली कोण करते ते आंदोलकांच्या पेहरावावरूनच लक्षात येते,’’ अशा अर्थाचे विधान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ऐन झारखंड निवडणुकीच्या प्रचारात केले खरे. पण पेहराव आणि विचारधारा यांच्यात असा निर्णायक संबंध जोडता येतो का हा यातील एक महत्त्वाचा प्रश्न. कारण पेहराव हा काही दंगाधोपा करणाऱ्यांना हुडकून काढण्याचा मार्ग असू शकत नाही. हे अर्थातच पंतप्रधान मोदी यांनाही ठाऊक असणार. पण तरीही त्यांनी हे विधान केले त्यामागे कारण आहे. ते म्हणजे त्यातून संबंधित दंगलखोरांचा धर्म ध्वनित व्हावा आणि त्यायोगे अपेक्षित असलेले धार्मिक धृवीकरण आपोआप व्हावे. पण तसे काही झाले नाही. उलट झारखंड निवडणुकीत भाजपलाच मतदारांनी धूळ चारली. पण मुद्दा या निवडणुकीचा नाही. तर नागरिकत्व कायदा आणि नागरिक सूची या मुद्दय़ावर देशभर सुरू असलेली निदर्शने आणि मुसलमानांचा त्यातील सहभाग, हा आहे. या निमित्ताने मुसलमानांतील बदलाची दखल घ्यायला हवी. ती तूर्त तरी फक्त दृश्य स्वरूपातच आहे, असे यावर काही म्हणू शकतात. ते खरेदेखील असेल. पण तरीही तो बदल निश्चित दखलपात्र आहे आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरही याबाबत बोलले जाऊ लागले आहे.

यातील अत्यंत महत्त्वाची बाब म्हणजे देशभर जी काही डझनभर वा अधिक निदर्शने झाली त्यातील एकाही निदर्शनात सहभागी मुसलमानांनी आपला कोणताही धार्मिक ध्वज फडकवल्याचे दिसले नाही. याआधी ‘सॅटनिक व्हस्रेस’ किंवा त्यानंतर जेव्हा जेव्हा इस्लामधर्मीयांची निदर्शने झाली तेव्हा त्यांच्यातर्फे प्रत्येक वेळी धर्मध्वजा फडकाविली गेली. ते हिरवे वा सोनेरी कडांचे काळे झेंडे घेतलेले सहभागी यांतून निदर्शनांचे धार्मिकत्व पुरेशा आग्रहीपणे मांडले जात असे आणि त्याचमुळे अन्य धार्मिकांचा त्यास तितका पाठिंबा नसे. सध्याच्या निदर्शनांत मात्र यात लक्षणीय बदल दिसतो. त्यात सहभागी होणारे इस्लामधर्मीय आपले धर्मीय अस्तित्व पेहरावांतून दखवतात, हे खरे. म्हणजे त्या तोकडय़ा परणी, वर कुडता आणि चेहऱ्यावर इस्लामी शैलीची दाढी. पण ते तेवढेच. यापेक्षा अधिक काही धर्मखुणा त्यांच्याकडून मिरवल्या जाताना दिसत नाहीत. पण या आंदोलकांच्या हाती दिसते ती भारतीय राज्यघटना आणि महात्मा गांधी वा बाबासाहेब आंबेडकर यांच्या तसबिरी. दिल्ली, बेंगळूरु, कोलकाता, मुंबई, हैदराबाद आदी ठिकाणच्या निदर्शनांत हेच दिसून आले. याचा थेट परिणाम असावा किंवा काय, पण या निदर्शनांत मुसलमानांइतक्याच मोठय़ा संख्येने हिंदू आणि अन्य धर्मीयदेखील हिरिरीने सहभागी होताना दिसतात. हा बदल -काहींच्या मते भले तो वरवरचा असेल- अत्यंत महत्त्वाचा. आत काही एक किमान बदलास सुरुवात झाल्याखेरीज तो बाहेर दिसत नाही, हे मान्य केल्यास या बदलाचे अप्रूप लक्षात यावे.

आंतरराष्ट्रीय पातळीवर ‘न्यू यॉर्क टाइम्स’ हे मातब्बर दैनिकही नेमकेपणे याच बदलाकडे अंगुलिनिर्देश करते. त्या दैनिकात अलीकडेच एका लेखात मुस्तफा अक्योल या विद्वानाने हा मुद्दा उपस्थित केला असून ‘इस्लामधर्मीयांत प्रथमच निधर्मी पहाट’ उगवत असल्याचे नमूद केले आहे. मूळचे तुर्कस्तानी अक्योल हे न्यू यॉर्क टाइम्सचे नियमित भाष्यकार असून ‘द इस्लामिक जीझस’ या पुस्तकाचे लेखक म्हणूनही ओळखले जातात. ख्रिस्तीधर्मीयांत ज्याप्रमाणे सुधारणेचे वारे काही शतकांपूर्वी मोठय़ा प्रमाणावर वाहिले त्याप्रमाणे इस्लामबाबतही होणार का हा प्रश्न अनेकांना पडतो आणि त्याचे उत्तर सार्वत्रिकपणे ‘हे कदापिही शक्य नाही,’ असेच दिले जाते. पण प्रत्यक्षात इस्लामी देशांत असा फरक होऊ लागला असून इराण आदी देशांतूनही तो दिसून येतो, असे या अक्योल यांचे निरीक्षण. ते त्यांनी सोदाहरण मांडले असून त्यामुळे ते निश्चितच विचार करावा असे ठरते. याआधी या धर्मीयांनी सार्वत्रिकपणे ‘इस्लामीकरण’ अनुभवले. यात त्या धर्माचे राजकीय आणि सांस्कृतिक पलूदेखील धर्माच्या आवरणाखाली झाकले गेले. परिणामी इस्लामभोवती एक कट्टरतेची अदृश्य प्रभावळ तयार झाली आणि हा धर्म काही सर्वधर्मसमभाव आदी मूल्ये स्वीकारणार नाही, असा समज तयार झाला. तो काही प्रमाणात खराही होता. पण आता मात्र त्यात लक्षणीय बदल होत असून त्यामागे इस्लामधर्मीय तरुणांचा मोठय़ा प्रमाणावर वाटा आहे, हे लेखकाचे मत विचारार्ह ठरते.

या बदलाची नोंद अमेरिकेतील स्टॅनफोर्ड विद्यापीठातस्थित ‘अरब बॅरोमीटर’ नावाने ओळखला जाणारा समाजसंशोधक अभ्यासक गट सातत्याने करतो. या गटाने इस्लामी जगाच्या राहणीमानातील बदल आणि त्यामागील कारणमीमांसा विस्तृतपणे केली आहे. त्यानुसार गेल्या पाच वर्षांत सहा प्रमुख अरबी देशांत ‘इस्लामवादी’ राजकीय पक्षांवरील जनतेचा विश्वास मोठय़ा प्रमाणावर आटला असून या देशांत मशिदीतील उपस्थितीतही चांगलीच घट दिसून येते. त्याचप्रमाणे धार्मिक नेत्यांना मिळणारा पाठिंबाही आकसत चालल्याचे निरीक्षण हा अहवाल नोंदवतो. त्यास आकडेवारीचाही आधार आहे. या संघटनेने २०१३ साली घेतलेल्या जनमत पाहणीत धर्माचरण न करणाऱ्यांचे प्रमाण आठ टक्के इतके आढळले. आज तेच १३ टक्क्यांवर गेले आहे.

यामागचे कारण काय? तर इस्लामी राजकारणी आणि त्यांच्या राजकारणामुळे उगवत असलेली नवी पहाट. मुस्लीम ब्रदरहुड या पक्षाने सत्ताधारी म्हणून इजिप्त देशात नोंदवलेल्या अत्यंत असमाधानकारक कामगिरीने यास सुरुवात झाली. मुस्लीम ब्रदरहुड ही इस्लामी कट्टरपंथीयांची आद्य संघटना. तिच्या स्थापनेत पन्नासच्या दशकात हसन अल बन्ना या धर्मविचारीचा मोठा वाटा होता. या बन्ना याने तत्कालीन अमेरिकी अध्यक्ष ड्वाईट आयसेनहॉवर यांचा थेट व्हाइट हाऊसमध्ये पाहुणचार झोडल्याचा इतिहास आहे. नंतरच्या काळात या संघटनेने कट्टर धर्मवादाची कास धरली. इजिप्तमधील राजकीय बदलात २०१२ साली या संघटनेकडे सत्ता आली आणि मुहम्मद मोर्सी यांच्याकडे नेतृत्व आले. पण ते अगदीच प्रभावशून्य निघाले. तेव्हापासूनच इजिप्तमधील तरुण नागरिकांचा धर्माच्या राजकीयीकरणावरील विश्वास उडू लागल्याचे या संघटनेच्या वतीने केलेल्या पाहणीत आढळले. नंतरच्या काळात आयसिस संघटनेने घातलेला हैदोस, इराक, लेबनॉनमधील फुटिरतावादी चळवळींचे याहून मोठे हिंसक अपयश या सगळ्यांचा परिणाम इस्लामीकरणापासून जनसामान्य दूर जाण्यात दिसतो. हीच परिस्थिती काही प्रमाणात अरब जगताबाहेरही दिसून येते. उदाहरणार्थ इराण आणि तुर्कस्तान. इराणात गेल्या चार दशकांहून अधिक काळ धर्मवाद्यांची सत्ता आहे. पण आपल्या नागरिकांचे अधिक इस्लामीकरण करण्याच्या नादात या देशाचे विकासाकडे पूर्ण दुर्लक्ष झाले आहे. त्यामुळे बहुसंख्य इराणींची प्रगतीची, विकासाची भूक मेली आणि त्याच्या पुढच्या पिढीत ती अधिक जोमाने फोफावली. याचा परिणाम असा की तरुण इराणींना लोकशाहीवादी, सहिष्णू आणि धर्मापासून दूर अशा समाजात राहावेसे वाटू लागले आहे. तुर्कीतील नागरिकांची धारणाही अशीच दिसते. याचा अर्थ या देशांतील नागरिक निरीश्वरवादी झाले असा निश्चितच नाही. त्यांना त्यांचा परमेश्वर हवा आहे. पण ते धर्म आणि धर्ममरतड यांच्याविषयी नाराज आहेत. हे निरीक्षण सूचक आणि महत्त्वाचे ठरते.

भारतात हाती घटनेची प्रत आणि गांधी-आंबेडकर यांची छायाचित्रे घेऊन इस्लामी जनतेचा सामाजिक हुंकार बाहेर पडत असताना हा बदल जर सत्य असेल तर अन्यांनाही आपापली गृहीतके नव्याने तपासून व्हावी लागतील. वेगळ्या अर्थाने ‘इस्लाम खतरेमें है’ असा त्याचा अर्थ असू शकेल.