अ. भा. मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांच्या एकमताने झालेल्या निवडीकडे अनेक अंगांनी पाहायला हवे..

अ. भा. मराठी साहित्य महामंडळाविषयी बरे बोलण्याची संधी मिळणे तसे दुर्मीळ. या महामंडळाच्या वतीने अ. भा. मराठी साहित्य संमेलन भरवले जाते. या संमेलनासाठी योग्य व्यक्ती निवडली जाण्याचे हे सलग दुसरे वर्ष. गेल्या वर्षीच्या साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद अरुणा ढेरे यांनी भूषविले आणि यंदा तो मान फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांना मिळेल. त्यासाठी महामंडळ अभिनंदनास पात्र ठरते. अध्यक्षपदाच्या निवडीआधी ठरवून केल्या जाणाऱ्या चर्चाच्या चक्रात फादर दिब्रिटो यांचे नाव कोठेही नव्हते. सध्याच्या वातावरणात ते असण्याची काही शक्यताही नव्हती. तसेच फादर स्वत: संमेलनाचे अध्यक्षपद भूषवायचे यासाठी शड्डू ठोकून मैदानात उतरल्याचेही दिसले नव्हते. तरीही फादर यांच्या नावाची घोषणा झाली याचा आनंद आहे. सरकारचा कोणताही निर्णय काही तरी अंत:स्थ हेतू असल्याखेरीज घेतला जात नाही. सांगावयास कारणे भले कोणतीही असतील, पण निर्णयामागचा उद्देश वेगळा असतो. साहित्य महामंडळाचे तसे आहे. पण तरीही या निवडीचे स्वागत. फादर दिब्रिटो यांचे नाव पुण्याच्या महाराष्ट्र साहित्य परिषदेने सुचविले आणि अन्य चार घटक संस्थांनी त्यास अनुमोदन दिले. म्हणून त्यांची निवड एकमताने झाली. अलीकडच्या काळात संमेलनाचे अध्यक्षपद हा ‘सन्मान’ क्वचितच वाटला. गेल्या वर्षीप्रमाणे यंदाचेही वर्ष त्यास अपवाद ठरेल. महामंडळ यापुढेही या शहाण्या मार्गानेच प्रवास करेल ही आशा.

फादर दिब्रिटो यांच्या निवडीकडे अनेक अंगांनी पाहता येईल. साहित्याकडे असे पाहायला हवे. याचे कारण जगणे हे साहित्यापेक्षा मोठे असते आणि साहित्यात मांडली गेलेली मूल्ये त्या साहित्यिकाच्या जगण्यातही दिसत असतील, तर अशा व्यक्तीचे साहित्य आणि जगणे यास एक झळाळी प्राप्त होते. फादर दिब्रिटो यांच्याबाबत असे मानता येईल. त्यांचे साहित्य जगण्यापासून वेगळे केल्यास काहींना ते तितके महत्त्वाचे वाटणारही नाही. त्यामुळे त्यांच्या साहित्याविषयी मतभेद असू शकतात. शिवाय ते नुसते साहित्यिक नाहीत. अधिकृत असे धर्मगुरूही आहेत. त्यामुळे त्यांचे साहित्यिक विश्लेषण गुंतागुंतीचे होऊ  शकते. तसे ते काही काळ झालेदेखील. मे. पुं. रेगे यांच्यासारख्या तटस्थ आणि समाजप्रबोधक विचारवंताने फादर दिब्रिटो यांच्या धर्म आणि साहित्य यांचा यथायोग्य समाचार घेतला होता. १९९९ साली ‘नवभारत’ मासिकाच्या ऑगस्ट महिन्यातील अंकात या मासिकाचे संपादक रेगे यांनी फादर दिब्रिटो यांच्याविषयी अत्यंत विस्तृत विवेचन केले, ते अनेकांच्या स्मरणात असेल. त्यानंतरही दिब्रिटो यांच्यातील धर्मगुरू बाजूस केला तरी त्यांचे जगणे आणि त्यांचे साहित्य यांत काहीएक समान धागा आढळतो.

मराठी सारस्वताच्या दृष्टिकोनातून ही बाब नावीन्यपूर्ण ठरते. याचे कारण मराठी साहित्यिक भूमिका घेण्यासाठी ओळखले जात नाहीत. आणीबाणीच्या काळात पुलं, दुर्गाबाई वगैरे जे काही झाले तो अपवाद. एरवी आपण बरे आणि आपले बरेवाईट साहित्य बरे असेच त्यांचे जगणे. जमेल तितके व्यवस्थेशी जुळवून घ्यायचे हाच यातील अनेकांचा साहित्यधर्म. तो अंगात इतका मुरलेला, की झाडेझुडपे, निसर्ग आदींबाबत साहित्यात उसासे टाकणारे आपले लेखक त्या निसर्गाच्या ऱ्हासाबाबत मात्र चकार शब्दही काढत नाहीत. पावसावर कविता करणाऱ्यांसमोर पाण्याच्या अनुपलब्धतेचा मुद्दा आला, की त्यांच्या घशास कोरड पडते. याचा अर्थ प्रत्येक लेखकाने क्रांतीसाठी रस्त्यावर उतरायला हवे असा नाही. पण आपण ज्या मूल्यांचा पुरस्कार करतो वा आपल्या साहित्यात त्याविषयी काहीएक लिहितो त्याचा दुरान्वयाने का असेना, पण प्रत्यक्ष जगण्याशी संबंध हवा की नको, हा प्रश्न आहे.

फादर दिब्रिटो या मुद्दय़ावर ‘उजवे’ ठरतात. आपण ज्या परिसरात राहतो, जो परिसर आपले पालनपोषण करतो त्याच्या रक्षणाची जबाबदारी आपलीच आहे, असे फादर दिब्रिटो मानतात. त्याप्रमाणे त्यांचे जगणे आहे. वसई आणि परिसरात त्यांना मान आहे तो काही केवळ त्यांच्या अंगावरील धर्मगुरूच्या झग्यामुळे नव्हे. नुसते धर्मगुरू असणे या देशात आता अप्रूपाचे राहिलेले नाही. उलट धर्मगुरू म्हणवून घेणारे अधर्मी कृत्ये करणाऱ्या व्यवस्थेची तळी उचलताना दिसतात. तसे होते तेव्हा केवळ व्यवस्थाच भ्रष्ट होते असे नाही. तर त्या भ्रष्टाचाराचे शिंतोडे धर्माच्या अंगरख्यावरही पडतात. केवळ धर्मगुरू असणे हा दिब्रिटो यांच्याविषयीच्या आदराचा आधार नाही. हे आपले धर्मगुरूपद दिब्रिटो यांनी वसई आणि परिसराचा पर्यावरणीय ऱ्हास करणाऱ्यांना रोखण्यासाठी वापरले, हे ते कारण. त्यासाठी फादर दिब्रिटो यांनी वसईतील सर्वपक्षीय सत्ताधाऱ्यांविरोधात दोन हात करण्यास कमी केले नाही. हे धाडसाचे होते. याचे कारण त्या परिसरातील धनदांडग्यांना सर्वकालीन अभय आहे. सत्ता कोणत्याही पक्षाची असो, हे त्या पालखीचे भोई असतात. पण त्याची तमा फादर दिब्रिटो यांनी बाळगली नाही. सरकारकडून आपणास कोणत्याही प्रकारच्या संरक्षणाची वा धोरणात्मक पाठिंब्याची साथ मिळणार नाही हे माहीत असतानाही फादर दिब्रिटो यांनी लढा उभारला. त्याला सामान्य नागरिकांचा प्रतिसाद मिळाला नसता तरच नवल. आज त्या परिसरात त्यांच्याविषयी सार्वत्रिक आदर आहे तो त्यांच्या या क्रियाशीलतेमुळे. रास्त प्रश्नास हात घातल्यास सरकारी मठीतील मंबाजी आणि स्थानिक ‘धना’जी यांची पर्वा न बाळगता फादर दिब्रिटो आपल्या मागे ठाम उभे राहतील याची खात्री तेथील सामान्य माणसास आहे. त्याचा तो आदर फादर दिब्रिटो यांच्याविषयी सतत व्यक्त होतो. साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी लवकरच विराजमान होणाऱ्या लेखकाविषयी असे बोलणे अस्थानी ठरेल; पण तरीही नमूद करावी अशी बाब म्हणजे, फादर दिब्रिटो यांच्याविषयी आदर व्यक्त करणाऱ्या स्थानिकांतील काहींनी कदाचित त्यांच्या साहित्याचा आनंद घेतलाही नसेल. त्यांना फादर दिब्रिटो यांच्याविषयी आदर आहे तो माणूस म्हणून.

म्हणून फादर दिब्रिटो हे क्रियाशील साहित्यिक ठरतात. त्यांच्या आयुष्यात क्रिया आधी येते आणि साहित्य नंतर. याचा अर्थ मन रिझविणे हा त्यांच्या साहित्याचा उद्देश नाही. काल ‘लोकसत्ता’स दिलेल्या मुलाखतीत त्यांनी स्वत:च म्हटल्याप्रमाणे पर्यावरण आणि माणूस यांना जोडण्याचा प्रयत्न त्यांच्या साहित्याने केला. पर्यावरण म्हणजे केवळ आसपासची झाडेझुडपे, नद्यानाले इतकेच नाही. पर्यावरण राजकीयही असते आणि सामाजिकदेखील. आता साहित्य संमेलनाच्या मांडवातून ते या व्यापक पर्यावरणाशी वाचकांना जोडण्याचा प्रयत्न करतील, ही आशा. विशेषत: गेल्या वर्षी साहित्य संमेलनाच्या उद्घाटनानिमित्ताने जे झाले आणि ‘त्या’ पर्यावरणाशी आपला जणू काही संबंधच नाही अशी जी भूमिका बहुसंख्य साहित्यिकांनी घेतली, त्या पाश्र्वभूमीवर या पर्यावरणरक्षक साहित्यिकाची निवड अध्यक्षपदासाठी केली जाणे सूचक ठरते.

बाकी ख्रिस्ती धर्म आणि मराठी साहित्य यांच्यातील बंध काही नवा नाही. मराठीची ‘कवतिके’ सांगणाऱ्या फादर स्टीफन्सपासून ते ख्रिश्चन धर्म स्वीकारणाऱ्या रमा डोंगरे ऊर्फ पंडिता रमाबाई आणि ना. वा. ऊर्फ रेव्हरंड टिळक असे काही नामांकित दाखले सहज देता येतील. त्यामुळे फादर दिब्रिटो यांची निवड मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी झाली, यात कोणाच्या भुवया उंचावण्याचे कारण नाही. जगण्याच्या ‘धर्मा’स जागणारा साहित्यिक या नात्याने ते अधिक मोठे ठरतात. अशा या ‘धार्मिक’ साहित्यिकाच्या अध्यक्षपदी निवडीचे स्वागत.