इस्लामी दहशतवादामुळे युरोपीय देश स्वत:च्या सामंजस्य क्षमतेवरच शंका यावी अशा स्थितीत जाऊ लागणे हे धोकादायक आहे.
युरोपीय देशांची अर्थगती मंदावली आणि सीरियातील संघर्ष, आयसिस हे या रिकाम्या हातांना आणि त्याहून रिकाम्या मनांना खुणावू लागले. यामुळेच, युरोपातील अनेक देशांत हे धार्मिक दहशतवादाचे काटेरी निवडुंग फोफावले. हा दहशतवादाचा अजगर असाच हातपाय पसरत राहिला तर आपणही इतरांसारखे संकुचितच राहायला हवे ही भावना सामान्य युरोपियनांच्या मनांत घर करू लागेल.
ब्रसेल्सच्या विमानतळावर बॉम्बस्फोट झाला ही आश्चर्य वाटावे अशी बातमी नाही. आश्चर्य याचे वाटावयास हवे की इतके दिवस हा देश इस्लामी दहशतवादापासून मुक्त राहिलाच कसा. सरकारातील सुंदोपसुंदी, सल प्रशासन, वाढती बेरोजगारी आणि या सगळ्याच्या जोडीला मुस्लीम समाजाची झालेली भौगोलिक कोंडी यामुळे बेल्जियम हा देश इस्लामी दहशतवादाचे आगामी केंद्र बनू शकतो, असे इशारे अनेकदा दिले गेले होते. न्यूयॉर्कर वा द अटलांटिक यांसारख्या उच्च दर्जाच्या साप्ताहिकांनी बेल्जियम देशातील इस्लामी धर्मीयांवरील अप्रतिम वार्ताकनांत अनेकदा या दहशतवादाच्या पाऊलखुणांचा स्पष्ट उल्लेख केला. ज्या अर्थी पत्रकारांच्या डोळ्यावर यावा इतका इस्लामी दहशतवाद या देशात मुरलेला आहे त्या अर्थी गुप्तचर यंत्रणा आणि सुरक्षा यंत्रणांनाही त्याची खबर असणे अपेक्षित आहे. तशी ती होतीदेखील. तरीही बेल्जियमचे पोलीस आणि अन्य सुरक्षा व्यवस्था गाफील राहिल्या आणि हे मंगळवारचे हत्याकांड घडले. वास्तविक पॅरिसच्या शार्ली एब्दो हल्ल्याचा मुख्य सूत्रधार सालाह अब्देस्लाम हा या हत्याकांडाच्या आधी आणि नंतरही ब्रुसेल्समध्ये दडून होता. या पॅरिस हत्याकांडानंतर चार महिन्यांनी त्याचा ठावठिकाणा लागला आणि गेल्या आठवडय़ात तो एकदाचा पकडला गेला. त्याच वेळी त्याच्या अटकेच्या निषेधार्थ बेल्जियमला दहशतवादी हल्ल्यास तोंड द्यावे लागेल, असे अंदाज वर्तविले जात होते. तरीही तेथील सरकारने आवश्यक तितके चातुर्य दाखवले नाही. तेव्हा यानिमित्ताने इतक्या लहानशा देशात इस्लामी मूलतत्त्ववाद्यांची पाळेमुळे किती घट्ट रुजलेली आहेत, याचा आढावा घेणे आवश्यक ठरते.
बेल्जियम हा फ्रान्सला खेटून असलेला देश. युरोपीय पार्लमेंटच्या मुख्यालयामुळे तो अधिक महत्त्वाचा ठरतो. लोकसंख्या जेमतेम १.१ कोटी. याचा अर्थ मुंबई शहरापेक्षाही कमी. परंतु या १.१ कोटी नागरिकांतील सहा टक्के नागरिक हे इस्लाम धर्मीय आहेत. मोरोक्को आणि अन्य अफ्रिकी देश हे त्यांचे मूळ. जगायला म्हणून हे नागरिक विविध दरिद्री देशांतून बाहेर पडले आणि युरोपातील श्रमजीवींची कमतरता भरून काढत विविध देशांच्या आश्रयास गेले. शिक्षण आदी मार्गानी ज्यांनी प्रगती साध्य केली ते इस्लाम धर्मीय युरोपीय मुक्त संस्कृतीत सहज मिसळून गेले. परंतु प्रश्न होता- आणि आहेही- शिक्षण, प्रगतीच्या संधी यांपासून वंचित राहिलेल्या प्रचंड मोठय़ा समुदायाचा. युरोपातील अनेक शहरांत दाटीवाटीत हे मुसलमान एकमेकांना धरून राहतात. बेल्जियम यास अपवाद नाही. ज्या शहरात हा हल्ला झाला त्या ब्रसेल्स शहरातील मोलेंबिक परिसर हा भणंग मुसलमानांच्या वस्तीसाठी ओळखला जातो. या परिसरात जाण्यास पोलीसदेखील नाखूश असतात. अमेरिकेतील लुईझियानाचे गव्हर्नर बॉबी जिंदाल यांनी या अशा परिसरांचे वर्णन बिगरमुसलमानांसाठी नो गो झोन, असे केले आहे. मोलेंबिक हा तसा नो गो झोन. लाखभर मुसलमानांच्या या वस्तीत २२ मशिदी आहेत. हा सर्वच परिसर बेल्जियम सरकारवर रागावलेला आहे. कारण प्रगतीचा अभाव. बेल्जियममधे शासकीय पातळीवर दोन भाषा महत्त्वाच्या आहेत. फ्रेंच आणि फ्लेमिश. या दोन्ही भाषांचे व्यावहारिक ज्ञान असल्याखेरीज त्या देशात ना नोकरी मिळते ना काही व्यवसाय करता येतो. बेल्जियमच्या आश्रयाला येणारे बहुसंख्य मुसलमान हे फार फार तर फ्रेंच भाषेशी परिचित असतात. या एकभाषिक अपंगत्वामुळे त्यांची कुचंबणा होते आणि अखेर या मोलेंबिकच्या आश्रयास येण्यावाचून त्यांना पर्याय राहत नाही. ही अशी रिकामटेकडी आणि अस्वस्थ मने ही संभाव्य दहशतवाद्यांची जन्मस्थाने असतात. बेल्जियममध्ये हेच घडत आहे. त्या देशाच्या एकंदर लोकसंख्येपकी मुसलमान सहाच टक्के असले तरी युरोपातून सीरियात आयसिसच्या वतीने बशर अल असाद यांच्याशी लढावयास गेलेल्यांतील तब्बल २५ टक्के हे बेल्जियमचे मुसलमान आहेत. यावरून बेल्जियम या देशात इस्लामी दहशतवाद किती रुजला आहे, याचा अंदाज येऊ शकेल. सीरियात लढताना आतापर्यंत किमान ५१६ बेल्जियन मुसलमान मारले वा पकडले गेले आहेत.
फौद बेल्कासेम हा कडवा बेल्जियन मूलतत्त्ववादी या सगळ्यांचा नेता. या ३३ वर्षीय इस्लामी धर्मगुरूने त्या देशातील धर्मबांधवांत चांगलेच घर केले असून त्याची लोकप्रियता ही धडकी भरवणारी आहे. शरिया फॉर इस्लाम (२ँं१्रं4्र२’ंे) अशी संघटनाच त्याने स्थापन केली असून तिच्या नावावरूनच उद्दिष्ट स्पष्ट व्हावे. २००१ सालच्या ९/११ नंतर अमेरिकेविरोधात बेल्जियममध्ये चिथावणीखोर भाषणे केल्याचा, अमेरिकी ध्वज जाळण्याचा त्याच्यावर आरोप आहे. कडवा धर्मविचारी असल्याने साहजिकच पुरोगामी मुक्तविचार त्यास मान्य नाही. त्यातूनच समिलगी असल्याच्या संशयावरून त्याच्या संघटनेने काही बेल्जियन इस्लामींवर हल्ले केले. फौद हा मोरोक्कन इस्लामी स्थलांतरिताचा मुलगा. इंग्लंडमधील कडवे इस्लामी धर्मगुरू अंजेम चौधरी यांचा तो चेला. आपल्या आगलाव्या भाषणे आणि कृत्यांसाठी हे अंजेम चौधरी ओळखले जातात. शरियाचा प्रसार हे त्यांचे उद्दिष्ट. त्यासाठी वाटेल ते करावयाची त्यांची तयारी. त्याचमुळे त्यांच्यावर बंदी घालण्याची वेळ ब्रिटिश सरकारला आली. त्यांच्यापासून प्रेरणा घेत फौद याने बेल्जियममध्ये आपल्या कारवाया सुरू केल्या आणि आज त्याच्याकडे कडव्या धर्मवेडय़ांची मोठी फौज तयार आहे. शेजारील फ्रान्सप्रमाणे बेल्जियममधेही स्थलांतरित मुसलमान हे या फौद आणि तत्समांच्या संघटनेकडे आकृष्ट होताना दिसतात. त्यात फ्रान्सच्या तुलनेत बेल्जियममध्ये शस्त्रे मिळवणेही सोपे. त्यामुळेही या दहशतवाद्यांचे फावते. या देशांची अर्थव्यवस्था जोपर्यंत जोमात होती तोपर्यंत या स्थलांतरितांच्या हाताला काम होते. ही अर्थगती मंदावली आणि सीरियातील संघर्ष, आयसिस हे या रिकाम्या हातांना आणि त्याहून रिकाम्या मनांना खुणावू लागले. यामुळेच, भूतलावरील नंदनवनासारख्या युरोपातील अनेक देशांत हे धार्मिक दहशतवादाचे काटेरी निवडुंग फोफावले.
परिणामी आता युरोपीय संस्कृतीसमोर हे सर्वात मोठे आव्हान उभे ठाकले आहे. इस्लाम, जुडाइझम, ख्रिस्ती, बौद्ध आणि िहदू अशा अनेक धर्माना आनंदाने सामावून घेणाऱ्या युरोपीय देशांत त्यामुळे स्वत:च्या सामंजस्य क्षमतेवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून ते अधिक धोकादायक आहे. याचे कारण हा दहशतवादाचा अजगर असाच हातपाय पसरत राहिला तर आपणही इतरांसारखे संकुचितच राहायला हवे ही भावना सामान्य युरोपियनांच्या मनांत घर करू लागेल. टर्कीसारखा मिश्र संस्कृती देश, मानवी संस्कृतीचा उगम असणारा ग्रीस, बलाढय़ औद्योगिक संस्कृतीचे इंजिन असलेला जर्मनी आणि एके काळची महासत्ता असलेले ग्रेट ब्रिटन, इटली, स्पेन असे सर्वच युरोपीय देश या इस्लाम समस्येने ग्रासलेले दिसतात. या समस्येस निर्घृणपणे तोंड देता येईल अशी अमेरिकेसारखी कार्यसंस्कृती युरोपीय देशांत नाही. त्यामुळे अमेरिकेइतकी अचाट आíथक, लष्करी ताकददेखील युरोपीय देशांत नाही. अशा वेळी आपल्या उदात्त संस्कृतीचा वारसा किती काळ मिरवायचा असा प्रश्न युरोपियनांना पडू लागला आहे. इस्लाम धर्मीयांतील समंजसांनी पुढे येऊन या स्वधर्मीय वावदुकांना रोखले नाही तर यापुढे एकच परिणाम संभवतो. तो म्हणजे, प्रत्येक देशात इस्लाम धर्मीयांविरोधात संशयाची भावना तयार होणे. सौदी अरेबियासारख्या प्रबळ सुन्नी देशाने आयसिसच्या राक्षसाचा बीमोड करण्यात मदत केली नाही तर सर्वच इस्लाम धर्मीयांविरोधात सर्वत्रच संशयाने पाहिले जाईल. हे असेच व्हावे ही आयसिससारख्यांची इच्छा असली तरी ते तसे न होऊ देण्याने इस्लामची इभ्रत शाबूत राहील. सुसंस्कृत मानवी संस्कृतीसाठी त्याची गरज आहे.