रिझव्‍‌र्ह बँकेचे सारथ्य करणाऱ्याने दया न दाखवता व्याजदर वाढीचा बाण सोडायचाच असतो; हा ‘लेहमन ब्रदर्स’च्या दहाव्या मृत्युदिनाचा धडा..

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आजपासून बरोबर दहा वर्षांपूर्वी, १५ सप्टेंबर २००८ या दिवशी, लेहमन ब्रदर्स या जगातील अत्यंत बलाढय़ बँकेने दिवाळखोरी जाहीर केली. त्याआधी साधारण दीड वर्ष, २००७ सालातील फेब्रुवारी महिन्यात, हाँगकाँग अ‍ॅण्ड शांघाय बँक, म्हणजे एचएसबीसी, या बँकेने आपल्या अमेरिकी व्यवहारांत प्रचंड तोटा जाहीर केला. त्यानंतर पुढच्याच महिन्यात अमेरिकीतील फ्रेडी मॅक वित्तसंस्थेने सबप्राइम नावाने ओळखली जाणारी कर्जखाती स्वीकारणे बंद केले. सहा महिन्यांनी ऑगस्ट महिन्यात बीएनपी परिबा बँकेनेही आपल्या अमेरिकी व्यापावर नियंत्रण आणले. सप्टेंबर महिन्यात इंग्लंडमधील नॉर्दर्न रॉक वित्तसंस्थेच्या खातेदारांत पळापळ सुरू झाली आणि त्यांनी आपापल्या खात्यांतून पसे काढण्यास सुरुवात केली. २००८ सालची सुरुवात झाली तीच बँक ऑफ अमेरिकाने तेथील कंट्रीवाइड फायनान्शियल ताब्यात घेण्याने; तर तिकडे इंग्लंडमध्ये तेथील सरकारने नॉर्दर्न रॉक आपल्या आश्रयाखाली घेतली. हे धक्के वित्त क्षेत्र सहन करते न करते तोच बेअर स्टर्न या अमेरिकी बँकेने आचके देण्यास सुरुवात केली. जग श्वास रोखून हे सगळे पाहत होते. वित्तविश्वावरचे काळे ढग अधिकाधिक गडद होत होते. अर्थविश्वाची अवस्था ‘खालून आग, वर आग, आग बाजूंनी..’ अशी होत होती आणि त्यानंतरच्या हाहाकारात देशोदेशींचे कुडतोजी गुजर प्रतापराव होऊन जाणार होते. त्या हलकल्लोळाची परिणती अखेर १५ सप्टेंबर २००८ या दिवशी झाली. लेहमन ब्रदर्सने श्वास सोडला. जग नव्या अर्थगत्रेत सापडले. त्याआधी अवघे दहा दिवस दुव्वुरी सुब्बाराव हे भारतीय रिझव्‍‌र्ह बँकेचे गव्हर्नर म्हणून रुजू झाले होते. त्या अर्थसंकटाची पडझड भारतातही होणार अशी भीती होतीच. ती टळली. जगात झाले ते का झाले आणि भारतात जे झाले नाही ते का नाही या प्रश्नांची उत्तरे शोधणे लेहमन ब्रदर्स बँक निधनाच्या आजच्या दहाव्या श्राद्धदिनी निजधामास गेलेल्या बँकांना श्रद्धांजली वाहताना आवश्यक ठरते.

या संकटाचा मुळारंभ २००३ सालच्या इराक युद्धात दडलेला आहे. त्याआधी २००१ साली वर्ल्ड ट्रेड  सेंटरचे मनोरे दहशतवादी हल्ल्यात पाडले आणि त्यात अमेरिका जायबंदी झाली. अध्यक्ष जॉर्ज डब्ल्यू बुश हे सुडाने पछाडले. त्यानंतर जे जे इस्लामी ते ते दहशतवादी असे बुश यांच्या मनाने घेतले आणि कोणाला तरी धडा शिकवायची ईर्षां त्यांना सद्दाम हुसेनविरोधातील युद्धापर्यंत घेऊन गेली. नंतर घडले लीबियाकांड. या काळात अमेरिकी अर्थव्यवस्थेला मोठे झटके बसले. तरीही आपले उत्तम सुरू आहे हे दाखवण्यासाठी अमेरिकेने अतोनात पसा बाजारात ओतला. अमेरिकी फेडचे प्रमुख अ‍ॅलन ग्रीन्सस्पॅन यांनी कर्जे इतकी स्वस्त केली की बँकांनी अधिक व्यवसायाच्या हव्यासापोटी ती गरज नसलेल्यांनाही दिली. पसा पाण्यासारखा वाहू लागला. कारण तो अतिस्वस्त झाला. तो पुरवणाऱ्या बँकांनी मग ग्राहकांना दिलेल्या कर्जाचे विविध गुंतवणूक साधनांत रूपांतर केले आणि ती साधनेही विकली. डेरिव्हेटिव्ह्ज म्हणून ओळखली जाणारी साधने ती हीच. ज्यांनी त्यांत गुंतवणूक केली त्यांनी ती विकून आपला व्यवसाय वाढवला. या सगळ्यामुळे कर्जाधारित व्यवसायचक्र चांगलेच विस्तारले. जत्रेतल्या जायंट व्हीलसारखे. ते फिरते तोपर्यंत छान असते. पण मध्ये थांबले तर वर अडकून बसलेल्यांचे प्राण कंठाशी येतात. बँकांच्या कर्जचक्राचे हे असे झाले. अशा चक्रांत एकाने कर्ज परतफेड थांबवली की वरचा सर्व गाडा अडतो. तसाच तो २००७ सालापासून अडू लागला आणि २००८ सालच्या सप्टेंबर महिन्यात पुरताच बंद पडला. ही जत्रा जगाच्या अर्थव्यवस्थेचे केंद्र असलेल्या अमेरिकेतील. या जागतिक जत्रेतील चक्रच बंद पडल्यामुळे साऱ्या जगालाच फटका बसला.

या चक्राच्या बंद पडण्याचा फार दुरूनच ज्यांना अंदाज आला अशांतले एक म्हणजे आपल्याला न पेलवलेले रिझव्‍‌र्ह बँकेचे माजी गव्हर्नर रघुराम राजन. बँकांच्या स्वस्त पतपुरवठय़ाचा बुडबुडा तयार होत असून तो फुटण्याच्या मार्गावर आहे असे स्वच्छ भाकीत राजन यांनी अमेरिकेत असताना केले होते. आणि ते तसेच घडले. त्या वेळी भारतीय रिझव्‍‌र्ह बँकेचे गव्हर्नर होते वाय व्ही रेड्डी. अत्यंत खमके आणि वाहत्या लाटेत वाहून न जाणारे रेड्डी बाजारपेठेच्या तालावर अजिबात न नाचणारे. अमेरिकी चंगळवादाचा मोह भारतातील बँकांनाही पडू लागला होता. आपल्याकडच्या एका बडय़ा खासगी बँकेने अशी डेरिव्हेटिव्ह्ज उत्पादने भारतातही आणण्याचा प्रयत्न केला. रेड्डी यांनी तो हाणून पाडला. खमके गव्हर्नर कोणालाच नको असतात. कोणत्याही पक्षाचे सरकार असो. त्यांना होयबाच आवडतात. रेड्डी अजिबातच तसे नव्हते. ही अशी थिल्लर डेरिव्हेटिव्ह्जसारखी वित्तउत्पादने भारतात कोणत्याही परिस्थितीत येणार नाहीत याची त्यांनी आवश्यक ती खबरदारी घेतली. परिणामी अमेरिकी भूमीत तयार झालेल्या या जागतिक वित्तसंकटाची फक्त सावलीच आपल्याकडे पडली. प्रत्यक्ष संकट मात्र भारतीय भूमीत शिरले नाही. त्यानंतर रिझव्‍‌र्ह बँकेची धुरा सुब्बाराव यांच्या हाती आली. ते या पदावर स्वार झाले आणि अमेरिकेत लेहमन ब्रदर्स लयाला गेली. पण पूर्वसुरी रेड्डी यांनी घालून दिलेला मार्ग राव यांनी सोडला नाही. त्याच मार्गावर पुढे रिझव्‍‌र्ह बँकेचे नेतृत्व करण्याची संधी रघुराम राजन यांना मिळाली. ज्या संकटाचा राजन यांनी आधी केवळ अंदाजच वर्तवला होता, ते टाळण्याची संधी त्यांना रिझव्‍‌र्ह बँकेत मिळाली. स्वच्छ भारतासाठी आधी बँका स्वच्छ व्हायला हव्यात हे त्यांचे म्हणणे. म्हणून त्यांनी बँकांच्या खतावण्यांची घाऊक साफसफाई हाती घेतली. त्या साफसफाईचीच धूळ सध्या अनेकांच्या नाकातोंडात जाताना दिसते.

जे झाले ते आपल्याला काय शिकवते?

महत्त्वाचा धडा म्हणजे पसा अतिस्वस्त होऊन चालत नाही. तसा तो व्हावा असे सत्ताधाऱ्यांना वाटत असते. कारण त्यामुळे अच्छे दिनाचा आभास निर्माण करणे सोपे जाते. रिझव्‍‌र्ह बँकेने व्याजदर कमी ठेवावेत अशी हाकाटी सर्वपक्षीय सत्ताधारी देतात ती याचमुळे. कर्जे स्वस्त झाली की ती अधिकाधिक घेतली जातात, तशी ती घ्यावीत यासाठी बँकांकडून आमिषे दाखवली जातात आणि त्यांना बळी पडून ज्यांना गरज नाही असेही या कर्जाच्या आधारे आपले इमले उभारू लागतात. नंतर कोणत्याही कारणाने एखाद्याकडून जरी कर्जपुरवठा थांबला की वरचे सगळेच्या सगळे पत्त्याच्या बंगल्यासारखे कोसळतात. अमेरिकेत हेच घडले. युद्धखोर अध्यक्ष जॉर्ज बुश यांना त्या वेळी अच्छे दिनाची गरज होती. त्यांच्या सोयीसाठी पतपुरवठा स्वस्त झाला आणि पुढचे हे सगळे महाभारत घडले. हे महाभारत अमेरिकी भूमीवरचे असल्याने त्यातील अर्थिहसेची झळ साऱ्या जगाला सहन करावी लागली. परंतु प्रत्येक देशात आपापल्या आकारानुसार अशी महाभारते घडतच असतात.

अशा महाभारतांत कर्णाच्या भूमिकेत असते त्या त्या देशांचे सरकार. गरिबांच्या कल्याणाची भाषा ही या सरकारांची कवचकुंडले. पण जेव्हा त्यांच्या रथाचे चक्र अर्थव्यवस्थेच्या गत्रेत रुतून बसते तेव्हा आपल्यावर नेम धरणाऱ्या रिझव्‍‌र्ह बँकेच्या सारथ्यांना हे सरकारी कर्ण ‘रथचक्र उद्धरू दे..’ अशी आर्त साद घालतात. अशा प्रसंगी या महाभारताच्या दर्शकांना आपल्या रथाचे चाक बाहेर काढण्यासाठी झटणाऱ्या सरकारी कर्णाविषयी सहानुभूती निर्माण होण्याची शक्यता असते. पण रिझव्‍‌र्ह बँकेचे सारथ्य करणाऱ्याच्या मनात दया येऊन चालत नाही. त्याने व्याजदर वाढीचा बाण सोडायचाच असतो. ‘पतचक्र उद्धरू दे..’ अशी याचना करणाऱ्या सरकारकडे दुर्लक्षच करायचे असते. आजच्या बँकांच्या सामुदायिक श्राद्धदिनाचा हा सांगावा आहे.

मराठीतील सर्व अग्रलेख बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Lehman brothers reserve bank of india
First published on: 15-09-2018 at 03:16 IST