गुलाबी चेंडूची कसोटी भारतात इतक्या लगेच आयोजित करण्याचा नवनियुक्त बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली यांचा निर्णय बुचकळ्यात टाकणारा ठरतो..

केरी पॅकर या धनाढय़ उद्योगपतीने १९७०च्या दशकात क्रिकेटचे रूपडे बदलले आणि एकदिवसीय क्रिकेटमध्ये नवे युग आल्याची चर्चा सुरू झाली. पण पॅकर क्रांतीचा प्रभाव निदान सुरुवातीला तरी ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड या देशांपलीकडे जाऊ शकला नाही. एकदिवसीय क्रिकेटचा चाहता गण त्यामुळे किती वाढला हे निश्चितपणे सांगता येत नाही. पण २५ जून १९८३नंतर तो काही लाखांनी वाढला असावा हे मात्र नक्की सांगता येते. त्या दिवशी कपिलदेवच्या नेतृत्वाखाली भारताने पहिल्यांदा विश्वचषक जिंकला. त्या दिवसानंतर भारताचा क्रिकेटकडे आणि क्रिकेटजगताचा भारताकडे पाहण्याचा दृष्टिकोन खऱ्या अर्थाने बदलला. ती क्रिकेटमधील पहिली क्रांती होती. टी-२० क्रिकेटची सुरुवात झाली इंग्लंडमध्ये. तिला सुरुवातीची लोकप्रियता लाभली ऑस्ट्रेलियात. पहिला आंतरराष्ट्रीय टी-२० सामनाही खेळवला गेला ऑस्ट्रेलियात. पण जगभर टी-२० क्रिकेटची त्सुनामी उसळली आयपीएल सुरू झाल्यानंतर. सबब, निव्वळ क्रिकेटजगतात ‘काहीतरी’ सुरू होऊन भागत नाही. ते ‘काहीतरी’ भारतात सुरू होऊन रुजावे लागते. मगच असा एखादा प्रयोग यशस्वी झाला असे म्हणता येते. कोलकात्यात ईडन गार्डन्सवर शुक्रवारी सुरू झालेल्या गुलाबी चेंडू व दिवसरात्र कसोटी सामन्याच्या बाबतीतही हेच म्हणता येईल. भारताने दिवसरात्र कसोटी क्रिकेट स्वीकारले, तर या क्रांतीला दिशा आणि आकार मिळेल. मात्र भारतात हा प्रयोग स्वीकारला गेला नाही, तर त्यातून कसोटी क्रिकेटही अस्ताला जाईल का? या प्रश्नाचे उत्तर शोधण्यापूर्वी गुलाबी चेंडू क्रिकेटचे नेमके स्वरूप समजून घेणे क्रमप्राप्त ठरेल.

एकदिवसीय क्रिकेट लोकप्रिय होऊ लागले, तसा कसोटी क्रिकेटला येणारा प्रेक्षकवर्ग आटू लागला होता. नवीन सहस्रकात तर एकदिवसीय सामने दिवसरात्र वेळेतच खेळवले जाऊ लागले. या सामन्यांना प्रेक्षकवर्ग अजूनही लाभतो. दहा वर्षांपूर्वी टी-२० क्रिकेट फोफावू लागल्यानंतर कसोटी क्रिकेटकडे येणारा प्रेक्षकवर्ग आणखी ओसरला. संध्याकाळचे झटपट सामने लोकप्रिय होण्याचे प्रमुख कारण म्हणजे, कार्यालयीन वेळेनंतर या सामन्यांचा आनंद प्रत्यक्ष मैदानात जाऊन किंवा घरी बसून घेता येतो. कसोटी क्रिकेट जगवायचे असेल तर दिवसरात्र सामन्यांना पर्याय नाही अशी भूमिका विशेषत: इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियातील क्रिकेट धुरीणांनी घेतली. येथे एक बाब लक्षात घेतली पाहिजे, की इंग्लंड, ऑस्ट्रेलिया आणि भारत या तिन्ही संघांचे एकमेकांविरुद्धचे कसोटी सामने कुठेही खेळवले गेले, तरी तिकीटबारीवर यशस्वी ठरत होते. प्रश्न होता इतर संघांच्या कसोटी सामन्यांचा. त्याच काळात आयपीएल विकसित झाली आणि तिच्या पावलावर पाऊल टाकून अनेक टी-२० लीग फोफावल्या. अशा लीगमध्ये खेळून जितका पैसा जोडता येऊ लागला, त्याच्या निम्म्यानेही पैसा दहा वर्षे कसोटी क्रिकेट खेळून मिळणार नव्हता. साहजिकच वरील तीन देश वगळता सर्व देशांतील अनेक क्रिकेटपटू कसोटी क्रिकेटची कौशल्ये गिरवण्यापेक्षा या नादाला लागले! परिणामी कसोटी क्रिकेटचा दर्जा अधिकच ढासळू लागला. इतके होत असताना कसोटी क्रिकेटमध्ये खराब कामगिरी करणाऱ्या संघांनी या प्रकारातून माघार का नाही घेतली? ते शक्य नव्हते. कारण प्रचंड श्रीमंत भारतीय क्रिकेट मंडळ आणि बऱ्यापैकी श्रीमंत अशा इंग्लिश व ऑस्ट्रेलियन मंडळांच्या नियमित रतिबांमुळे सुदृढ बनलेल्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचा (आयसीसी) ‘विकासनिधी’ मिळण्यासाठी कसोटी दर्जा अनिवार्य असतो. तो निधी हा अनेक छोटय़ा मंडळांचा एकमेव उत्पन्न स्रोत! पुन्हा क्रिकेटचे विश्वही इवलेसे, त्यामुळे कसोटी दर्जा सुधारत नसल्यास ‘कसोटी दर्जा’ काढून घेतला जाईल, असे ठणकावण्याचीही चोरी. नाही म्हणायला सध्या केवळ झिम्बाब्वेचीच कसोटी वर्तुळातून हकालपट्टी झालेली आहे, पण ती वेगळ्या कारणासाठी. तेव्हा कसोटी क्रिकेटकडे प्रेक्षक वळवायचे असतील, तर दिवसरात्र क्रिकेट हाच जालीम उपाय असल्याचा निष्कर्ष काढला गेला. तो कितपत योग्य आहे, याचे विश्लेषण केल्यास फार समाधानकारक उत्तरे मिळत नाहीत.

आजवरचे सर्व ११ दिवसरात्र सामने निकाली ठरलेले आहेत हे मान्यच. ऑस्ट्रेलियात हा प्रकार सर्वाधिक लोकप्रिय झाला असून यशस्वीही ठरला आहे. परंतु खुद्द इंग्लंड, वेस्ट इंडिज, पाकिस्तान ‘घरच्या मैदानांवर’ म्हणून खेळतो (!) ती संयुक्त अमिरातींची मैदाने

या ठिकाणी प्रतिसाद संमिश्र होता. गेल्या वर्षीच ऑस्ट्रेलियात अ‍ॅडलेड मैदानावर (या मैदानावर आता सर्व कसोटी सामने दिवसरात्र होतात) असा सामना खेळण्याची गळ भारतीय संघाला तेथील क्रिकेट मंडळाने घातली होती. भारताने नकार दिला, त्याची कारणे अनेक. भारताने आजवर गुलाबी चेंडूला जवळ न करण्यामागे आणखीही कारणे होती. या चेंडूची दृश्यमानता संधिप्रकाशात किंवा सूर्यप्रकाश सरून विद्युतझोत लागण्याच्या काळात कमी होते. शिवाय गुलाबी चेंडू लवकर खराब होऊ नये, त्याचा उजळ रंग टिकून राहावा यासाठी त्यावर विशिष्ट लेप लावला जातो. या लेपामुळे चेंडू नेहमीच्या गडद लाल कसोटी चेंडूपेक्षा अधिक काळ ठणठणीत राहतो. परिणामी फिरकी आणि रिव्हर्स स्विंग ही दोन कौशल्ये अंगभूत असणाऱ्या आपल्या गोलंदाजांना हा चेंडू पुरेसा साह्य़भूत ठरणार नाही, अशी शंका आपल्या क्रिकेट धुरीणांना अजूनही वाटते. या पार्श्वभूमीवर नवनियुक्त बीसीसीआय अध्यक्ष आणि माजी कर्णधार सौरव गांगुलीचा गुलाबी चेंडूची कसोटी भारतात इतक्या लगेच आयोजित करण्याचा निर्णय बुचकळ्यात टाकणारा ठरतो. किमान एखाद्या तुल्यबळ प्रतिस्पध्र्यासाठी आपण वाट पाहायला हवी होती. बांगलादेशचा विद्यमान संघ कसोटी क्रिकेटमध्ये फारच दुबळा आहे. तरीही बंगाली भ्रातृभावाला स्मरून कोलकात्यातील सामन्यासाठी स्थानिक आणि बांगलादेशातील क्रिकेटप्रेमींनी अपेक्षित गर्दी केली, तरी सामना चार दिवसही चालण्याची चिन्हे नाहीत. दुपारी एक वाजता सामना सुरू होऊन आठ वाजेपर्यंत संपणार असेल, तर कितीशा नोकरदार मंडळींना तो आस्वादता येईल ही शंका रास्त ठरते. कोलकात्यासारख्या शहरात इतर कोणत्याही भारतीय महानगराप्रमाणे ईप्सित स्थळी पोहोचण्यासच जवळपास तितका वेळ लागतो. आणखी एक महत्त्वाची बाब म्हणजे, आजवरचे बहुतेक सर्व दिवसरात्र सामने उन्हाळ्यात खेळवले गेले. संयुक्त अमिरातींमध्ये हिवाळा नाममात्र असतो. उलट भारतातील हा सामना खऱ्या अर्थाने हिवाळ्यातील पहिला दिवसरात्र सामना. या हंगामात मैदानावर सायंकाळनंतर दव पडते. त्यातून चेंडूवर पकड घेणे अतिशय अवघड ठरते. अशा अडचणींवर नजर टाकल्यास गुलाबी चेंडूच्या क्रिकेटचा सोस आपण का करायचा हा प्रश्न उपस्थित होतो. गांगुलीच्या मते कसोटी क्रिकेटचे भविष्य दिवसरात्र सामन्यांवर अवलंबून आहे. माजी कर्णधार राहुल द्रविड आणि विद्यमान कर्णधार विराट कोहली यांनी ही बाब खोडून काढलेली आहे. भारतातील कसोटी क्रिकेट टिकवण्यासाठी तूर्त तरी या प्रकाराची गरज नाही. कोहलीच्या पुढाकारामुळे, सचिन-राहुल-कुंबळे यांच्या एका पिढीमुळे भारतात कसोटी क्रिकेट सुस्थितीत आहे. इथे आयपीएल खेळणारे युवक कसोटी संघात प्रवेश मिळवण्यासाठी रांगा लावून असतात! त्याऐवजी राज्याराज्यांतील मंडळांनी कसोटी क्रिकेटचा – जे शास्त्रीय संगीताप्रमाणे अस्सल आणि अभिजात आहे- दर्जा सुधारण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. दिवसरात्र क्रिकेटमुळे तो सुधारला आहे याचे कोणतेही पुरावे सापडत नाहीत. तरीही निव्वळ प्रेक्षक मैदानांकडे वळावेत यासाठी अधूनमधून या मंडळांना दिवसरात्र क्रिकेटचा ‘इव्हेंट’ भरवायचा असेल, तर भरवोत बापडे!