माथेरानची नॅरोगेज रेल्वेगाडी आता इतिहास आणि भविष्य यांच्या कात्रीत सापडली आहे. तिला निवृत्ती नको तर नवसंजीवनी द्यावी..
पर्यटनाचे सोयीस्कर साधन ठरलेली ही गाडी बंदच करून टाकण्याच्या अरसिक व्यवहारवादाला खतपाणी घातले, तर महाराष्ट्र करंटा ठरेलच. पण हा केवळ एका गाडीच्या अस्तित्वाचा मुद्दा नाही. तब्बल १६६ वर्षांची पर्यटनाची परंपरा जपणाऱ्या माथेरानच्या अस्तित्वापुढेच यामुळे प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे..
ऐन गर्दीच्या वेळी मुंबईची एखादी लोकलगाडी रद्द झाली किंवा बिघाडामुळे वाटेवरच थांबली तर पुढचा सगळा प्रवास जीवघेणा होऊन जातो. माथेरानच्या खेळगाडीच्या बाबतीत तसे काहीच नसले, तरी ही गाडी आता बंद होणार या बातमीने मुंबईकरांनाच नव्हे, तर हिरव्या निसर्गाच्या, लाल मातीच्या आणि ताज्या हवेच्या ओढीने माथेरानला जाणाऱ्या प्रत्येकाच्याच मनात एक हुरहुर नक्कीच सुरू झाली आहे. माथेरानच्या या राणीने पर्यटकांच्या जगाला वेड लावले. कारण ती फक्त लहान मुलांच्या खेळण्यातली झुकझुक गाडी नव्हती. मोठय़ांनाही लहानपणाची पुनरानुभूती मिळावी अशी जादू या गाडीच्या अवघ्या २० किलोमीटरचे अंतर दोन-सव्वादोन तासांत प्रवासात होती. म्हणून माथेरानची गाडी ही एक शतकापासूनची कहाणी झाली होती. गेल्या दहा-पंधरा दिवसांत ही गाडी दोन वेळा रुळावरून घसरली आणि ती कायमची बंद करण्याचे जणू निमित्त मिळाले. डोंगरदऱ्यांच्या अवघड वाटेतून पर्यटकांना अवघ्या माथेरानचे निसर्गदर्शन घडविणारी ही गाडी आता वयोमानानुसार थकली आहे हे खरेच; पण तिला निवृत्ती नको तर नवसंजीवनी द्यावी यासाठी पर्यटकांचे साकडे सुरू असताना, तिची देखभाल करणारे मध्य रेल्वेचे प्रशासन मात्र तिच्यावर रुसले आहे. या राणीने पर्यटकांना दिलेल्या आनंदाची किंमत रेल्वेच्या कमाईपेक्षा किती तरी अधिक आहे. म्हणूनच, तिच्यावर पर्यटकांचा जीव जडला आहेच, पण या राणीच्या सेवेतील कर्मचाऱ्यांनाही तिच्या विरहाच्या जाणिवेने अस्वस्थ करून सोडले आहे. माथेरानची ही राणी एक विराणी बनून इतिहासजमा होणार या शंकेचे काहूर गेल्या काही वर्षांपासून दिवसागणिक गडद गडद होतच होते. ज्यावर जिवापाड माया केली, जिच्या शतकभराच्या आयुष्याचा इतिहास मोठय़ा निगुतीने जपला, त्या राणीची तोळामासा होणारी तब्येत पाहून माथेरानच्या रेल्वे कर्मचाऱ्यांनी तर देव पाण्यात घातले होते. दोन वर्षांपूर्वी या राणीच्या तब्येतीसाठी रेल्वे कर्मचाऱ्यांनी सारे सरकारी नियम बाजूला ठेवून नेरळमधील तिच्या विश्रांतिगृहात विधिवत होमहवन केले, पूजा केली. बदलापुरातून त्यासाठी पौरोहित्य करणाऱ्यांना खास निमंत्रित केले. राणी पुन्हा रुळावरून धावली, तेव्हा त्यांचा ऊर आनंदाने भरून आला. यातील अंधश्रद्धेचा भाग सोडला, तरी या राणीने प्रत्येकाला कसा लळा लावला होता, हे तरी जाणून घ्यायलाच हवे.
खरे म्हणजे, १०९ वर्षांचे आयुर्मान पार केल्यानंतर तिला नव्या तंत्राचा साज चढवायला हवा होता. ते दूरच राहिले, पण त्याऐवजी आता ती जुनी झाल्याचे कारण देत आर्थिक नफ्या-तोटय़ाच्या गणितात तिला गुरफटवून कायमची इतिहासजमा करण्याचा घाट घालणे हा पर्यटनवृद्धीच्या प्रयत्नांचा घोर अपमान आहे. देशभरात अनेक ठिकाणी ऐतिहासिक वारसावस्तूंचे पर्यटनमूल्य वाढविण्याचे आणि त्यासाठी त्यांची जपणूक करण्याचे जाणीवपूर्वक प्रयत्न केले जात असताना, केवळ रुळावरून घसरते, बिघडते, रुसते म्हणून माथेरानच्या राणीलाच कायमचे कुलूपबंद करण्याचा घाट मात्र अनाकलनीय असा आहे. ही गाडी बंद करण्याच्या चाहुलीचे अस्वस्थ पडसाद दोन दिवसांपूर्वी संसदेतही उमटले हे एक बरे झाले. कारण या गाडीने माथेरानच्या अनेक कुटुंबांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्नही सोडविला आहे. गेल्या दोन वर्षांत या गाडीने जवळपास साडेआठ लाख प्रवाशांना माथेरानच्या निसर्गसौंदर्याचे दर्शन घडवीत अनोख्या सफरीचा आनंद दिला. लहान-मोठय़ा तांत्रिक चुकांमुळे कधी ती वाटेवरच रुसली, तर कधी रुसून तिने रूळही सोडले. असे काही अन्यत्र घडले, तर प्रवाशांच्या संतापाचे उद्रेक होतात. कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण व्हावा येथपर्यंत परिस्थिती टोकाला जाते. माथेरानच्या राणीबाबत मात्र असे कधीच झाले नाही. कारण, तिच्यावर पर्यटकांची खरीखुरी माया आहे. या गाडीला नव्या तंत्राची जोड देऊन नवी ताकद देण्याची तातडीची गरज आहे, पण मेक इन इंडियाचा उद्घोष करणाऱ्या भारतात, तसे तंत्रज्ञान मात्र रेल्वेला उपलब्ध होऊ शकत नाही, हा एक विनोद आहे. गेल्या पंधरवडय़ात दोन वेळा ही गाडी रुळावरून घसरल्याचे निमित्त झाले, आणि ती कायमची बंद करण्यासाठी सज्जड कारणांचा छुपा शोध सुरू झाला. एका उच्चस्तरीय अभ्यासगटाची स्थापना करण्यात आली आणि आहे त्या स्थितीत ही गाडी यापुढे चालवू नये असा शहाजोग सल्ला देणारा अहवालही या अभ्यासगटाने देऊन टाकला. या गाडीची रचना नव्याने करण्यासाठी आणि त्यानुसार नवा रेल्वेमार्ग निर्माण करण्यासाठी आंतरराष्ट्रीय तज्ज्ञांचे सहकार्य घ्यावे लागेल, असा सल्ला या अभ्यासगटाने दिला, तेव्हाच, अगोदरच तोटय़ाच्या कारणाखाली या गाडीला कायमच दुजाभावाने वागविणारे रेल्वे प्रशासन नव्या खर्चाचा बोजा शिरावर घेण्यास तयार असणार नाही, हेही स्पष्ट झाले होते. या अहवालानंतर लगेचच या गाडीचे लोढणे पर्यटन विकास महामंडळाच्या गळ्यात मारण्याचे प्रयत्न सुरू झाले, त्यातून ते उघडही झाले.
म्हणूनच, ही गाडी आता इतिहास आणि भविष्य यांच्या कात्रीत सापडली आहे. तिचे भवितव्य अधांतरी झाले आहे. पण हा केवळ एका गाडीच्या अस्तित्वाचा मुद्दा नाही. तब्बल १६६ वर्षांची पर्यटनाची परंपरा जपणाऱ्या माथेरानच्या अस्तित्वापुढेच यामुळे प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. कारण माथेरानची अर्थव्यवस्थाच या गाडीमुळे रुळावर राहिली आहे. पर्यटन हा येथल्या अर्थव्यवस्थेचा एकमेव आधार आहे. गेल्या दहा-पंधरा दिवसांत रुळावरून घसरल्यानंतर माथेरानची राणी बंद ठेवण्याची चर्चा सुरू होताच, पर्यटनाच्या ऐन हंगामात, काही क्षण निसर्गाच्या सहवासात राहण्याच्या हौसेपायी माथेरान भेटीचे नियोजन करणाऱ्या अनेक पर्यटकांनी तेथील निवासाची आरक्षणे रद्द करून टाकली. ही भविष्यातील आर्थिक फटक्याची केवळ चुणूक आहे. फक्त पर्यटकच नव्हेत, तर माथेरानच्या आणि माथेरानच्या कुशीत राहणाऱ्या शेकडो कुटुंबांचा बाहेरच्या जगाशी असलेल्या संपर्काचे महत्त्वाचे साधनच अनिश्चितेच्या विळख्यात गुरफटले आहे. मुंबई-पुण्याच्या पर्यटकांचे आगळे नाते जडलेल्या या निसर्गस्थळाला नव्या सुविधा देऊन तेथील पर्यटनाला चालना देण्याची गरज असताना, पर्यटनाच्या एकमेव सोयीस्कर साधनालाच बासनात गुंडाळण्याच्या अरसिक व्यवहारवादाला खतपाणी घातले, तर महाराष्ट्र करंटा ठरेल.
महामुंबईचा पसारा अवाढव्य झाला आहे. मोकळ्या श्वासासाठी एखादा निवांत, हिरवा कोपरा प्रत्येकालाच हवा आहे. पण अलीकडे उलटेच होऊ पाहात आहे. प्रत्येक हिरवा कोपराच हिरावला जातो आहे. मुंबईचा पसारा मुंबईबाहेरही पसरतो आहे. थेट माथेरानच्या पायथ्याशी सिमेंटी जंगलांची दाटी वाढू लागली आहे. उद्या या जंगलांना घेरणाऱ्या अतिक्रमणांमुळे माथेरानचा निसर्गही गुदमरून जाईल आणि व्यापारीकरणाच्या हावरटपणापुढे त्यालाही हात टेकावे लागतील. अशी परिस्थिती निर्माण होऊ नये यासाठी सामान्य माणसांनीच जागे राहण्याची खरी गरज आहे. कारण अतिक्रमणांचा बकासुर सर्व शक्तींना आपल्या विळख्यात सामावून घेऊन पुढे सरकतो आहे. माथेरानची राणी बंद झाली, तर तो आणखी पुढे सरकेल आणि उद्या माथेरानच्या हिरवाईत नव्या सिमेंटी प्रकल्पांचा शोध सुरू होईल. ते रोखावयाचे असेल, तर निसर्गाशी नाते जिवंत ठेवले पाहिजे. माथेरानची राणी हा या नात्याचा दुवा आहे. तो जपला नाही, तर या राणीबरोबरच माथेरानही कधी इतिहासाच्या पानात जाऊन गडप होईल, ते कळणारदेखील नाही आणि केवळ इतिहासाच्या आठवणीत रमून सिमेंटी जंगलांच्या सौंदर्याची वर्णने वाचतच जगावे लागेल. ती एका राणीची विराणी ठरेल..