एखादा देश मलेरियामुक्त करणे हे आव्हान मानवी सामर्थ्यांच्याही पलीकडचे वाटावे, असे. पण श्रीलंकेने ते साध्य केले.. प्रचंड लोकसंख्येच्या भारतासारख्या देशात एखाद्या रोगावर नियंत्रण आणणे ही सहजसाध्य गोष्ट नव्हे. डासांचे समूळ उच्चाटन करण्यासाठी आपल्याकडेही प्रयत्न सुरू आहेत, मात्र त्याला चळवळीचे स्वरूप येऊ शकलेले नाही.

डास नावाच्या प्राण्याने या पृथ्वीवर गेल्या काही दशकांत घातलेला अभूतपूर्व गोंधळ अक्षरश: विस्मित करायला लावणारा आहे. एवढासा तो डास आणि त्याने जगाला वेठीला धरावे, ही गोष्ट आसमंतावर राज्य करू पाहणाऱ्या माणसाच्या हाताबाहेर जाणे, हे तर केवढे तरी अपमानकारक. मलेरिया, डेंग्यू, चिकुनगुनिया यांसारख्या असाध्य रोगांचे कारण असणाऱ्या या डासाला समूळ नष्ट करणे, हे तर अतिशय अवघड असे आव्हान. अतिवेगाने होणारी उत्पत्ती आणि प्रजोत्पादनासाठी अतिशय उपकारक ठरेल असे वातावरण, यामुळे डासाला हाकलून लावणे कठीण होऊन बसते. त्यातही भारतीय उपखंडासारख्या संमिश्र हवामानाच्या स्थितीत डासांचे असणे हा क्रमप्राप्त असणारा निसर्गक्रम म्हणायला हवा. अशा डासाला हाकलून देऊन सारा देश मलेरियामुक्त करण्याचे आव्हान श्रीलंकेसारख्या देशाने यशस्वीपणे स्वीकारले. जागतिक आरोग्य संघटनेने या देशाला मलेरियामुक्त असल्याचे जे प्रशस्तिपत्रक दिले आहे, त्यामागे तेथील नागरिक आणि प्रशासकीय यंत्रणेचे अचाट कष्ट कारणी लागले आहेत. एखादा देश मलेरियामुक्त करणे हे आव्हान तर मानवी सामर्थ्यांच्याही पलीकडचे वाटावे, असे. पण श्रीलंकेने ते साध्य केले आणि आरोग्याच्या बाबतीत आपण किती दक्ष आहोत, याची चुणूक दाखवली. मालदीव या देशाने मलेरियामुक्त असल्याचे प्रमाणपत्र यापूर्वीच मिळवले आहे. पण त्या देशापेक्षा श्रीलंकेची परिस्थिती अधिक बिकट वाटावी अशी आहे. समुद्र, डोंगर, जंगल ही भौतिक स्थिती आणि ऊन, पाऊस आणि थंडी यांचे प्रमाण ही वातावरणीय अवस्था डासांसारख्या प्राण्यासाठी उपकारक अशी. भारत, पाकिस्तान, बांगलादेश यांसारख्या देशांत या डासांनी गेल्या अनेक वर्षांत अक्षरश: उच्छाद मांडला आहे. त्याला दूर ठेवण्यासाठी होत असलेले प्रयत्न किती तुटपुंजे आहेत, हे दररोज वृत्तपत्रांतून येणाऱ्या डेंग्यू, चिकुनगुनिया यांसारख्या रोगांच्या रुग्णांमधील वाढीच्या बातम्या सांगतच असतात. श्रीलंकेला निदान मलेरियाच्या बाबतीत तरी संपूर्ण यश मिळाले आहे. २००७ पासून तेथे मलेरियामुळे एकही व्यक्ती मृत पावलेली नाही. त्यापूर्वी म्हणजे इसवी सन २००० मध्ये या देशात मलेरियाचे सुमारे एक लाख रुग्ण होते. देशाला मलेरियामुक्त करण्याची मोहीम हातात घेतली, तेव्हापासून या देशाने अनेक राजकीय स्थित्यंतरे अनुभवली. अनेकदा या देशात अभूतपूर्व परिस्थिती निर्माण झाली. अशाही काळात ही मोहीम मात्र अजिबात थंडावली नाही. अथक परिश्रमामुळे असे घडू शकते, याचे हे उदाहरण खरोखरीच अनुकरणीय असे.

Womens health Which blood type is required for marriage
स्त्री आरोग्य : लग्नाच्या होकारासाठी रक्तगट कोणता हवा?
loksatta explained article, bahujan vikas aghadi, hitendra thakur, politics, Vasai, Palghar
विश्लेषण : पालघर-वसईत हितेंद्र ठाकुरांशी सर्वच पक्षांना जुळवून का घ्यावे लागते? ठाकुरांच्या यशाचे रहस्य काय?
mercury retrograde in aries negative impact on these zodiac sing budh vakri
एप्रिलमध्ये बुध करणार वक्री चाल; ‘या’ राशींच्या लोकांच्या जीवनात येणार संकट? आर्थिक हानीची शक्यता
Inheritance of girls and women Two main types of property ownership
मुली आणि महिलांचा वारसाहक्क

शाळेच्या पाठय़पुस्तकांमध्ये उघडय़ावरील अन्न खाऊ नये, असा संदेश असतो. त्याचे कारण त्यावर माशा बसतात आणि माशा गटारांपासून ते मैलापाण्यापर्यंत कशावरही बसत असतात. त्यांच्या पायांना लागलेले विषाणू मग उघडय़ा अन्नावर संक्रमित होतात आणि त्यामुळे टायफॉइडसारखा रोग होऊ शकतो, असे अगदी स्पष्टपणे लिहिले असले आणि परीक्षेसाठी त्याची घोकंपट्टी केली असली, तरीही प्रत्यक्षात असे अन्न खाणारा भारत हा जगातील सर्वात मोठा देश असेल! मुळात अस्वच्छता आणि गलिच्छपणा हा या देशाच्या नागर संस्कृतीमध्ये पुरून उरलेला. त्यामुळे सार्वजनिक स्वच्छतागृहांपासून ते ओसंडून वाहणाऱ्या कचराकुंडय़ांपर्यंत कोठेही स्वच्छतेचा मागमूस नसतो. रोगांच्या विषाणूंसाठी अशी परिस्थिती नेहमीच आनंदाची. त्यांना अशा स्थितीचा होणारा उपयोग माणसाच्या जिवावर बेततो, याची जाणीव असूनही त्याबाबत मूलभूत सुधारणा होण्याची चिन्हे नसतात. संमिश्र हवामान असणाऱ्या देशांमध्ये धुळीचे प्रमाण अधिक. साचलेल्या पाण्याचे लवकर बाष्पीभवन होण्याची शक्यता कमी आणि विषाणूंना जिवंत राहण्यासाठी सोयीचे असणारे तापमान यामुळे हे विषाणू सहज फैलावतात आणि त्यामुळे हजारोंचा जीव जातो. वरवर पाहता, हे किरकोळ वाटणारे असले, तरीही देशाच्या स्वच्छताविषयक जाणिवाच त्यातून स्पष्ट होतात. मलेरियासारख्या रोगावर हुकमी औषधयोजना संशोधनाअंती सापडू शकली. त्याद्वारे निदान उपचार करणे तरी सुलभ होते. मात्र डेंग्यू आणि चिकुनगुनिया या रोगांवर आजही सुस्पष्ट औषधयोजना उपलब्ध नाही. लक्षणे पाहून त्यानुसार औषधे देत राहणे, एवढेच सध्या तरी शक्य आहे. त्यातून डेंग्यूचा एडिस इजिप्ती हा डास स्वच्छ पाण्यात जन्म घेतो. त्यामुळे अस्वच्छतेबरोबरच स्वच्छतेचाही बोजवारा उडण्याची शक्यता अधिक. पाणी साठून राहता कामा नये, हा मंत्र जपण्यासाठी प्रत्येकाने अखंड जागृत राहणे एवढा एकच उपाय. मानवी रक्त हेच ज्याचे अन्न असे डास आणि ढेकूण हे दोन प्राणी सध्या जगात धुमाकूळ घालत आहेत. ढेकूण जगणे हराम करतो, तर डास जगण्यालाच रामराम करायला लावतो.

भारतात स्वातंत्र्यपूर्व काळात प्लेग नावाच्या साथीच्या रोगाने हजारोंचा जीव घेतला होता. या साथीमध्ये भारतीयांवर अत्याचार केल्याच्या रागावरून रॅण्ड या ब्रिटिश अधिकाऱ्याची हत्याही झाली होती. प्लेगने देशात माजलेल्या हाहाकाराच्या कहाण्या अतिशय हृदयद्रावक होत्या. कालांतराने त्या रोगावर भारताने विजय मिळवला. नारू, पोलिओ, देवी यांसारख्या रोगांवरही आपण मात करू शकलो. पोलिओचे औषध खेडोपाडी पोहोचवणे हे तर सर्वात मोठे आव्हान होते. याचे कारण पोलिओची लस विशिष्ट तापमानातच ठेवावी लागते. डोंगराळ भागात किंवा खेडय़ापाडय़ांत हे तापमान ठेवणारी वातानुकूलन यंत्रणा असणे शक्यच नसते. अशा वेळी थर्माकोलच्या डब्यांमध्ये बर्फात ठेवलेली ही लस विशिष्ट वेळात पोहोचवायची आणि बालकांना द्यायची, हे काम अतिशय अवघड होते. भारतातील स्वयंसेवी संस्था आणि प्रशासन यांनी मिळून हे आव्हान स्वीकारले आणि पोलिओची लस देशाच्या कानाकोपऱ्यांत पोहोचवून त्यावर विजय मिळवण्यात यश मिळवले. देवी या रोगाचे रुग्ण शून्यावर आणल्यानंतरही ‘देवीचा रोगी कळवा, शंभर रुपये मिळवा’ असे फलक लावून भारताने आपले यश अधोरेखितच केले होते. प्रचंड लोकसंख्येच्या भारतासारख्या देशात एखाद्या रोगावर नियंत्रण आणणे ही सहजसाध्य गोष्ट नव्हे. डासांचे समूळ उच्चाटन करण्यासाठी आपल्याकडेही प्रयत्न सुरू आहेत, मात्र त्याला चळवळीचे स्वरूप येऊ शकलेले नाही. नांदेड जिल्ह्य़ातील सुमारे दीडशे गावे डासमुक्त करण्यात यश आले आहे. तेथील जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या प्रयत्नातून या सगळ्या गावांमध्ये हजारो शोषखड्डे घेण्यात आले आणि डासांच्या निर्मितीस पोषक वातावरण राहणारच नाही, याची व्यवस्था करण्यात आली. हा प्रयोग खरे तर राज्यभर तरी व्हायला हवा. परंतु त्यासाठी राजकीय आणि सामाजिक इच्छाशक्ती असणे अतिशय गरजेचे असते.

जीवघेण्या रोगातून मुक्त होण्याचे यश त्यासाठीच अधिक उत्साहवर्धक असते. १९६३ मध्ये श्रीलंकेत मलेरियाचे सतरा रुग्ण आढळले होते. हा आकडा १९६९ पर्यंत पन्नास हजारांपर्यंत गेला आणि त्यानंतरही तो वाढतच राहिला. देशाचे सार्वजनिक आरोग्य धोक्यात आणणाऱ्या या रोगावर सार्वत्रिक पातळीवर रोखणे हेच तर सर्वात अवघड काम होते. परंतु श्रीलंकेने ते पार पाडले आहे. या देशाचे अभिनंदन करताना आपणही त्या पावलावर पाऊल टाकून प्रयत्न करण्याची आवश्यकता प्रतिपादन करायलाच हवी. स्वातंत्र्यानंतर सहा दशकांनंतर स्वच्छतेसाठी राष्ट्रीय पातळीवर मोहीम हाती घ्यावी लागणे हे दुर्दैवी असले, तरीही त्याला मिळणारा अल्प प्रतिसाद तर त्याहूनही अधिक दु:खद आहे. स्वच्छतेची संस्कृती जोपासण्यासाठी प्रत्येकाने पुढे आल्याशिवाय यातले काहीच साध्य होणार नाही.