12 December 2018

News Flash

(आया)राम कारे म्हणा ना!

आपल्या नारायणरावांमुळेही मराठी भाजपवासीयांना त्याच आनंदाची अनुभूती मिळेल.

नरेश अग्रवाल आणि नारायण राणे हे एके काळचे दोघे विरोधक भाजपच्या वळचणीस आल्याने आनंदीआनंद गडेच!

सत्ताधारी भाजप आणि परिवारासाठी हा मोठा आनंदाचा क्षण असेल. पक्षाचा वारू चौखूर उधळत असताना, त्याला कोणी आवर घालू शकेल असा दूर दूर क्षितिजापर्यंत दिसत नसताना भाजपचा अश्वमेध विनासायास विश्वपरिक्रमा करेल यांत तिळमात्रही शंका नाही. या मंगलमयी स्वप्नमय वातावरणात एके काळी जे जे दैत्य कल्पिले ते ते दाती तृण घेऊन शरण येत असताना अनुभवणे म्हणजेच रामराज्य सत्यात येत असल्याचे लक्षण. या रामराज्याचे पायरव कानी येतील अशा दोन घटना नुकत्याच घडल्या. उत्तर प्रदेशात – म्हणजे साक्षात् रामजन्मभूमीत नरेश अग्रवाल आणि महाराष्ट्रात –  म्हणजे जेथे रामभूमी प्रत्यक्षात येण्यासाठी असिंधुसिंधु हिंदू तितुका मेळवावा अशी हाक दिली गेली त्या राज्यात नारायण राणे हे दोन नरवीर अखेर या ना त्या प्रकारे भाजपच्या कळपात दाखल झाले. किती ऐतिहासिक घटना! प्रत्येक सुजाण हिंदुहृदयात  या दोन नरपुंगवांच्या भाजपप्रवेशाने आनंदलहरी निर्माण झाल्या असणार यात तिळमात्रही शंका नाही. तेव्हा अशा आनंदीआनंद गडे वातावरणात या आनंदनिर्मात्यांची दखल न घेणे म्हणजे धर्मच बुडवणे होय. तसे काही पातक आपल्या हातून घडो नये अशी इच्छा असल्याने या घटनेचे आख्यान आपणही गोड मानून घ्यावे.

‘‘हा नरेश अग्रवाल पाकिस्तानचा हस्तक आहे’’, ‘‘या अग्रवालास शत्रुराष्ट्रांकडून रसद मिळते’’, ‘‘या अग्रवालाचे संसद सदस्यत्वच रद्द केले जावे’’ अशा एकाहून एक सरस मागण्या ज्यांनी केल्या ते भाजपच्या समाज माध्यम विभागाचे प्रमुख श्री. रा. रा. अमित मालवीय किंवा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रवक्ते प्रा. राकेश सिन्हा अशा महानुभवांच्या नाकावर टिच्चून नरेश अग्रवाल यास भाजपमध्ये प्रवेश देण्यात आला. हे अग्रवाल ही बहुत मोठी असामी. बारा पक्षांचे पाणी प्यालेली. समाजवादी काँग्रेस, मग नुसतीच काँग्रेस, नंतर बहेनजींचा बहुजन समाज पक्ष, तेथून पुन्हा मुलायम समाजवादी आणि आता आर्य सनातन वैदिक हिंदू धर्म की जय.. अशी आरोळी ठोकत भाजपमध्ये प्रवेश. इतके मोठे कर्तृत्व या अग्रवालांच्या खाती आहे. तेव्हा अशा व्यक्तीस आपले म्हणण्यात मालवीय, सिन्हा आणि संबंधितांना निश्चितच आनंद वाटेल. विदेशी मद्याच्या नावांशी थेट  विविध हिंदू देवदेवतांची नावे जोडणारा सवंग दोहा राज्यसभेत ऐकविणे, हेदेखील याच नरेशाचे कर्तृत्व. तेदेखील फार जुने असे इतिहासातील नव्हे. गतसालाचे. हे वक्तव्य कामकाजातून काढण्यापूर्वी अर्थमंत्री अरुण जेटली यांच्यासारख्या सहिष्णूंसही या अग्रवालावर रागे भरण्याची वेळ आली होती. तेव्हा हिंदू देवतांना मद्याशी तोलणाऱ्या अग्रवालाच्या मांडीस मांडी लावून बसण्यात योगी आदित्यनाथ वा अन्य समस्त हिंदू धर्माभिमान्यांना किती आनंदाच्या उकळ्या फुटतील याची कल्पनाच केलेली बरी. याच अग्रवालाने हिंदुहृदयसम्राट साक्षात नरेंद्र मोदी यांच्यावर काश्मीर मुद्दय़ावर कच खात असल्याचा आरोप केला होता. त्या वेळी समस्त भाजपवासी संतापाने लालेलाल झाले होते. आता या भाजपवासीयांना या नरेशाचे स्वागत करणे हे इतिहासाने उगवलेला सूड कसे वाटेल? ज्या कुलभूषण जाधवांस यवनी पाकिस्तान्यांपासून वाचवण्यासाठी सत्ताधारी जंग जंग पछाडत असताना हा जाधव म्हणजे दहशतवादी असे म्हणण्याचे औद्धत्य दाखवले ते याच अग्रवालाने. तसेच मोदी यांची जात काढणारा अग्रवालही हाच इसम. आता तो आपल्यातील एक झालेला पाहणे भाजपवासीयांसाठी निश्चितच सुखावणारे असेल.

आपल्या नारायणरावांमुळेही मराठी भाजपवासीयांना त्याच आनंदाची अनुभूती मिळेल. ‘‘मोदी हे फक्त गुजरात्यांचे नेते आहेत’’, ‘‘मुंबईतील गुजरात्यांनी मोदींच्या गुजरातेत चालते व्हावे’’, ‘‘भाजप हा भ्रष्टाचाऱ्यांना पाठीशी घालणारा’’, ‘‘मोदी यांच्या सभेत टाळ्या पिटणारे हे भाडोत्री असतात’’, ‘‘काँग्रेसच्या पंतप्रधानांनी देशासाठी रक्त सांडले, भाजपच्या मोदी यांचे योगदान काय’’..  असे एकापेक्षा एक ज्वलज्जहाल वाग्बाण सोडून भाजपस घायाळ करणारे या महाराष्ट्राचे सिंधुदुर्गवीर नारायणराव आता भाजपच्या तिकिटावर राज्यसभेत विराजमान होणार या विचाराने भाजपीय नक्कीच सद्गदित झाले असणार, याबाबत आम्हांस मुळीच शंका नाही. काव्यगत न्याय म्हणतात तो बहुधा हाच असावा. अर्थात हा न्याय कोणाच्या बाबतीत झाला वा होणार, हा प्रश्न उरतोच. म्हणजे आपल्यात घेऊन भाजपने नारायणरावांचा न्याय केला की भाजपमध्ये घ्यायला लावून नारायणरावांनी त्या पक्षाची गोची केली? एक बरीक खरे. मध्यंतरी राणे आणि त्यांच्या चिरंजीवांनी भाजप हा गुंडांचा पक्ष असा आरोप केला होता. तो त्यांनी स्वत:च खरा करून दाखवला असेही या संदर्भात म्हणता येईल. बाकी विजय राणे यांचा की भाजपचा याची चर्चा करण्यास असा अर्थ नाही. कारण यांतील कोणीही आपला पराजय असे काही म्हणणार नाही. तथापि राणे आणि भाजप यांच्यातील या नव्या आदानप्रदानात एक व्यक्ती मात्र हमखास विजयोत्सव साजरा करील. अवघ्या काही दिवसांवर आलेल्या गुढीपाडव्यास या व्यक्तीची गुढी अंगुळभर जरा उंचच असेल.

देवेंद्र फडणवीस ही ती व्यक्ती. पाहुण्याच्या वहाणेने विंचू मारणे अशी म्हण कोकणात आहे. फडणवीस यांनी तिचा नागपुरी आविष्कार दाखवून दिला. त्यांनी राणे यांच्याच वहाणेने पक्षश्रेष्ठींना कुरवाळले. मुदलात राजकीयदृष्टय़ा अनाथ अशा राणे संप्रदायास आपुले म्हणावे ही खेळी पक्षश्रेष्ठींची (पूर्वी काँग्रेसमध्ये पक्षश्रेष्ठी म्हणजे दोन व्यक्ती असत. आता भाजपमध्येही दोनच व्यक्ती आहेत हे चाणाक्षांस सांगण्याची गरज नसावी.) तथापि सह्य़देशात कडा करून राज्य करणाऱ्या फडणवीस यांना काही ही पक्षश्रेष्ठींची चाल तितकीशी मान्य नव्हती. आपल्या मंत्रिमंडळात घेण्याचा मुद्दा टोलवत ठेवून फडणवीस यांनी हे दाखवून दिलेच. तथापि आपला हट्ट सोडला तर ते पक्षश्रेष्ठी कसले? ते काही राणे प्रेमप्रभावातून बाहेर येण्याची चिन्हे दिसेनात. तेव्हा धूर्त फडणवीसांनी रेशीम बागेतील गुरुजनांच्या पाठिंब्याने ही नारायणरावांची ब्याद अलगदपणे राज्यसभेत पाठवून दिली. एरवीही ज्यांना दिल्यासारखे करून उपाशी ठेवावयाचे असते त्यांची रवानगी राज्यसभेत करण्याची सर्वपक्षीय परंपराच आहे. फडणवीस त्या परंपरेला जागले. आता दिल्लीत खुद्द मोदी यांच्या मंत्रिमंडळात गृह वा अंतर्गत सुरक्षा खात्याचे मंत्रिपद जरी नारायणरावांना दिले तरी त्याबाबत फडणवीसांना खंत असणार नाही.

हा असा पथदर्शी कार्यक्रम देणे हेच तर खरे भाजपचे वैशिष्टय़. नरेशरावांनी ते बोलूनदेखील दाखवले. भाजपच्या कार्याचा तडाखा पाहून आपण या पक्षात येण्याचा निर्णय घेतला असे हे अग्रवाल म्हणाले. हे डोळे दिपण्यासाठी समाजवादी पक्षाने उमेदवारी नाकारल्याच्या क्षणाची वाट का पाहावी लागली, असा प्रश्न उपस्थित करणे असभ्यपणाचे ठरेल. म्हणून आम्ही त्याकडे दुर्लक्ष करतो. त्यापेक्षा अग्रवाल यांच्या संस्कृतिरक्षक वक्तव्याचे कौतुक करणे अधिक महत्त्वाचे. हे संस्कृतिप्रेम व्यक्त करताना त्यांची चित्रपटांत नाचगाणे करणाऱ्यांविषयी नफरत दिसून आली. ती पाहून अनेकांना त्यांचा अभिमानच वाटेल. आता सुषमा स्वराज यांनी त्यास आक्षेप घेतला तो केवळ गैरसमजातून. हा असा गैरसमज न करवून घेतल्यानेच भाजपतील स्मृती इराणी, रुपा गांगुली, किरण खेर आदींनी मौन पाळले ते लक्षात घ्यायला हवे. कारण सत्ता हवी असेल तर तत्त्व, भावना आदी मुद्दय़ांना राम म्हणावेच लागते. त्यात आयाराम हाच काय तो बदल.

First Published on March 14, 2018 2:13 am

Web Title: naresh agrawal narayan rane bjp indian politics