News Flash

पडझडीचे स्वगत

कठोर आत्मपरीक्षणाला स्थानच नाही

पडझडीचे स्वगत
( संग्रहीत प्रतिकात्मक छायाचित्र )

मराठी पुस्तकव्यवहारात अपयशाला, कठोर आत्मपरीक्षणाला स्थानच नाही का?

‘आपली आत्मवृत्ते म्हणजे यशाच्या प्रवासाचा दस्तावेज असतो. आपण कुठे चुकलो, काय चुकलो यावर आत्मवृत्तांमध्ये फारसे भाष्य नसते.’ हे ख्यातकीर्त नाटककार महेश एलकुंचवार यांचे विधान म्हणजे मराठीतील अलीकडच्या बहुसंख्य आत्मचरित्रांच्या पायाशी लावलेला भूसुरुंग. एलकुंचवार हे नागपूरचे असल्याने त्यांनी असा सुरुंग लावला असे म्हणावे तर तसे नाही. कारण आत्मचरित्रांच्या एकूणच खोली आणि उंचीबद्दलचे हे आकलन काही आजचे नाही आणि त्यांच्या एकटय़ाचेही नाही. बहुसंख्य आत्मचरित्रांचा एकंदर बाज आणि पवित्रा हा ‘ढोल स्वत:चा वाजं जी’ याच स्वरूपाचा असतो. पण मग त्यात वावगे काय आहे? एखाद्या यशस्वी व्यक्तीने त्याचे यश मिरविले तर त्यावर आक्षेप घेण्याचे कारण काय, असे कोणी म्हणू शकेल. परंतु प्रश्न यश मिरवण्याचा नसून, ते मिरवताना जो खोटेपणा केला जातो त्याचा आहे. एकदा ‘मी कसा झालो’ हे सांगायचे ठरविल्यानंतर कोणत्याही लेखकाने त्या होण्याची पांढरीफेक बाजू तेवढीच दाखवायची आणि आयुष्यातील अपयश, वेगवेगळ्या वाटांवरचे निसरडे क्षण हे सारे बाजूला ठेवायचे हे काही खरे नसते. त्याला आत्मचरित्र म्हणता येत नाही. अर्थात एखाद्याला आपल्या आत्मचरित्रातून आपण समाजासमोर काही तरी आदर्श व्यक्तिमत्त्व वगैरे घेऊन जात आहोत असा भ्रम होत असेल, तर त्याला कोण काय करणार? अशा आदर्श महात्म्यांचे आत्मपर आरतीसंग्रह मराठी प्रकाशकांच्या गोदामांतील थप्प्यांत शेकडय़ाने सापडतील. प्रकाशक हुशार असतील, तर त्यांच्याकडे अशा थप्प्या शिल्लक राहात नाहीत. त्या शासकीय ग्रंथालयांत रित्या होतात. मुद्दा आत्मचरित्रांतील खरेपणाचा आहे. आपली जडणघडण, ती होतानाची पडझड, आयुष्यातील धवल आणि कृष्ण क्षणच नव्हे, तर करडेपणाही अशा गोष्टींच्या अ-वाच्यतेची आपल्या मराठी लेखकांची -खरे तर मराठी माणसाची एकुणातच वृत्ती- ही खरी एलकुंचवार यांच्या विधानामागील खंत आहे. पुण्यात सतीश आळेकर यांच्या पुस्तकाच्या प्रकाशन कार्यक्रमात त्यांनी, म्हणजे एलकुंचवार यांनी या वृत्तीची झाडाझडती घेतली. याचा अर्थ आळेकरांचे पुस्तक याच जातकुळीतले होते असा नाही, तसेच एलकुंचवार हे केवळ आळेकर यांच्या पुस्तकाच्या निमित्तानेच बोलत होते असेही नाही. कारण की त्या कार्यक्रमात पुढे जे घडले त्यातून ते स्वत:वरही हीच टीका करीत होते की काय असे वाटावे.

या कार्यक्रमात एलकुंचवार यांच्यावरील एक लघुपट दाखविण्यात आला. त्यात ते स्वत:च्याच तळ्याकाठी मग्न वगैरे होऊन बोलत होते. शेवटी ‘चांगल्या कलाकृतींचा अपयश हा पाया’ असे काहीसे ते म्हणाले. पण हे सांगताना, स्वत:च्या अपयशाबद्दल ते बोललेच नाहीत. एलकुंचवार यांच्या लिखाणाची वृत्ती ही प्राय: आत्मचिंतनपर. त्यात सारे काही येते. सुख, दु:ख, आशा, निराशा, लखलखीत क्षण तसेच पडझडीचे क्षणही. त्यामुळे आत्मचरित्रांकडे ते अशा दृष्टीने बघणार हे ओघाने आलेच. तेव्हा त्यांच्या या दृष्टिकोनातून तयार झालेले मत मान्यच. मुळात आपल्याकडे लेखक-कवी हे आत्मचरित्र लिहिण्याच्या वाटेला फारसे जात नाहीत. जे लिहितात त्यांत अंतर्मुखतेपक्षा बहिर्मुखतेलाच प्राधान्य अधिक दिले जाते. किंवा मग होते ते प्रासंगिक म्हणावे असे फुटकळ लेखन. जन्म, शिक्षण, नोकरी, लिहिते होणे आदी तपशिलांच्या अधेमधे अंतर्मुखतेचे प्रवाह दिसतात. पण ते तेवढय़ापुरतेच. आपल्या अपयशाची नोंद तुलनेत कमी आणि स्खलनशीलतेची नोंद तर जवळपास शून्यच. स्वत:ला स्वत:पुढे नागवे करून पाहण्याचे धारिष्टय़ नसणे वा असले तरी ते लोकांपुढय़ात मांडण्याचे धारिष्टय़ नसणे हे त्यामागील एक मुख्य कारण. शिवाय भोवतालाचा एक अदृश्य दाब. आपण अमके लिहिले तर कुणाला काय वाटेल, तमके लिहिले तर कोण काय म्हणेल वगैरे. आपले वाचक आपल्याला स्वीकारतील का, आपल्या प्रतिमेला धक्का पोहोचेल का, अशी भीतीही त्याच्या जोडीला. आणि आपल्याकडील वाचकही नीती-अनीतीविषयी भलतेच सोवळे. मागे सुनीता देशपांडे यांनी ‘आहे मनोहर तरी’मध्ये शारीरमोहाच्या एका क्षणाचा उल्लेख केला, तर त्यावरून किती जणांच्या कपाळावर आठय़ा चढल्या होत्या. नीती-अनीतीबाबत शारीर आणि वरवरच्या संकल्पनांना आपण घट्ट चिकटून असल्याचे हे ठळक उदाहरण. त्यामुळे हे असे पडझडीचे स्वगत मुखर करण्यास फारसे कुणी तयार होत नाही, आणि समजा झालेच तयार तरी ते प्रसिद्ध करायला कोणता प्रकाशक पुढे येणार?

निदान मराठीत तरी बहुतांश प्रकाशक, संपादक व्यवसायाच्या नावाखाली, सुरक्षित व्यवसायाच्या गोंडस आवरणाखाली ठाशीव मळवाट उराशी कवटाळून बसलेले. त्यामुळे हे असे पडझडीचे स्वगत तर सोडाच, जी मळवाट ते उराशी कवटाळून बसले आहेत, त्यावर कुणी नवा लेखकप्रवासी येतो आहे का, हे निरखण्याचे कुतूहल, आस्था अनेकांमध्ये उरलेली नाही. विनासायास जे समोर येते आहे तेच जरा पाखडून घ्यायचे आणि छापायचे ही त्यांची व्यवसायाची धंदेवाईक रीत. ताजे लिखाण समोर येण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे वर्तमानपत्रे. वर्तमानपत्रांतील स्तंभलेखन हे काळाशी आणि वाचकांशी निदान त्या त्या प्रहरांत तरी ताजा संवाद राखणारे असते. शिवाय तेव्हा तेव्हा त्या लेखकाचे नावही वाचकांच्या नजरेपुढे असते. त्यामुळे स्तंभांना तातडीने पुस्तकरूप देणे ही प्रकाशकांसाठी एक सोयीची बाब. वर्तमानपत्रांतील स्तंभांतून प्रसिद्ध होणारे सारेच लिखाण कमअस्सल असते, असे मुळीच नाही. त्यातही काही मौलिक हाती लागतेच. मात्र, इतर मार्गानी नव्या लेखकांचा शोध न घेता जे आयतेच हाती मिळते त्याचाच वापर करून घ्यायचा, ही वृत्ती बळावलेली दिसते. हल्ली वर्तमानपत्रे नवे लेखक शोधण्याचा, त्यांना योग्य ते स्थान देण्याचा, त्यांच्यावर मेहनत घेण्याचा प्रयत्न करताना मोठय़ा प्रमाणात दिसतात. मात्र पुस्तके प्रकाशित करणाऱ्या संपादकांबाबतचे हे चित्र विपरीत दिसते. लेखकासाठी श्रम करणे नाही, त्यामुळे अर्थातच त्याच्या लेखनावर श्रम करणे नाही, त्याला श्रम करायला सांगणे नाही, असे काही अपवाद वगळता एकंदर प्रकाशकांबाबतचे चित्र. लेखनदर्जा अधिकाधिक विकसित करण्यातील, लेखक घडविण्यातील ही प्रक्रियाच बाद झाली की काय होणार? कोण काय नवे करतो आहे, काय लिहितो आहे, याकडे बारकाईने लक्ष ठेवणे, लेखकांचा शोध घेणे प्रसारमाध्यमांच्या, तांत्रिक विस्ताराच्या काळात तुलनेने खूपच सुलभ झालेले आहे. पण तरीही तशी आस्थापूर्ण वृत्ती प्रकाशक, संपादकांत फार दिसत नाही, हे तर्कबुद्धीच्या पलीकडचे आहे. याला बौद्धिक श्रम करण्याचा कंटाळा म्हणायचे, व्यवसायाची अतिसावध गणिते म्हणायचे की आणखी काही? आहार कसा घ्याल, कोणता व्यायाम कराल, हे सांगणारी पुस्तके मात्र आता मराठीतही खपू लागली आहेत. यश कसे मिळवावे, याचीही पुस्तके खपतात. अनेक प्रकाशक ती छापतात. एकंदरीत यशच यश. वाचक यशस्वीच, किंबहुना इतके की ते वाचतही नाहीत. ज्यांना चांगले लेखक म्हणावे, ते अपयशाबद्दल बोलायला तयार नाहीत. आणि आयते लेखक, तयार मजकूर, हे प्रकाशकांचेही यशच.

बसल्या जागी सारे काही मिळत असेल, कष्ट करायची सवय नसेल किंवा ती मोडली असेल तर शरीरावर, बुद्धीवर मांद्य चढते. त्यामुळे चलनवलन मंदावते. प्रकृती उत्तम राखायची तर या गोष्टी टाळायला हव्यात. वेळीच हालचाल करायला हवी. अन्यथा पडझडीचे अनिवार्य स्वगत म्हणण्याची वेळ या मंडळींवर यायची!

 

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 6, 2017 3:06 am

Web Title: playwright mahesh elkunchwar marathi books marathi articles
Next Stories
1 व्यत्यय हाच विकास
2 कणखर की आडमुठे?
3 अवलक्षण
Just Now!
X