News Flash

पुण्यकर्माची संधी

ठेचा खाल्ल्यानंतर आलेल्या शहाणपणाचे एक दखलपात्र द्योतक.

राहुल गांधी (संग्रहित छायाचित्र)

निधर्मीवादाची बेगडी झूल टाकून देण्याची गरज काँग्रेसचे उगवते अध्यक्ष राहुल गांधी यांना वाटली हे ठेचा खाल्ल्यानंतर आलेल्या शहाणपणाचे एक दखलपात्र द्योतक.

या देशातील बहुसंख्य मतदारांनी २०१४च्या निवडणुकीत हिंदुत्वास कौल दिला याचे महत्त्वाचे कारण त्या वेळी या नागरिकांचे धर्मप्रेम उफाळून आले असे अजिबात नाही. भारतीय मतदारांनी मोठय़ा प्रमाणावर भाजपच्या बाजूने कौल लावला याचे कारण ते काँग्रेसच्या अतिरेकी, ढोंगी निधर्मीवादास कंटाळले होते. काँग्रेसच्या बहुसंख्याकविरोधी राजकारणाचा परिणाम म्हणून बहुसंख्य भाजपच्या मागे उभे राहाते झाले. अल्पसंख्याकांच्या सततच्या लांगूलचालनामुळे जनमताचा लंबक काँग्रेसपासून दूर गेला. परिणामी भाजपची सत्ता आली. परंतु त्याचा चुकीचा अर्थ भाजप लावताना दिसत असून अल्पसंख्याकांच्या लांगूलचालनास प्रत्युत्तर म्हणून बहुसंख्याकांचे लांगूलचालन असा त्या पक्षाचा समज झाल्याचे दिसते. काँग्रेसने एक टोक गाठले. भाजप देशास दुसऱ्या टोकास नेऊ पाहतो. राहुल गांधी यांच्या काँग्रेस अध्यक्षीय आरोहणाचे मूल्यमापन करावयाचे ते या पार्श्वभूमी.

सलग १९ वर्षे काँग्रेसच्या अध्यक्षपदी राहिल्यानंतर सोनिया गांधी यांनी आपली काँग्रेसाध्यक्षपदाची वस्त्रे चिरंजीव राहुल यांच्या अंगावर अखेर चढवली. या वेळी सर्व संबंधितांनी केलेली भाषणे लक्षात घेण्यासारखी आहेत. खुद्द सोनिया गांधी यांनी कोणत्या परिस्थितीत आपल्याला पक्षाध्यक्षपदी यावे लागले हे विशद करताना काँग्रेससमोरील विद्यमान आव्हानांचा रास्त उल्लेख केला. सोनिया यांनी १९ वर्षांपूर्वी पक्षाध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारली त्या वेळी लोकसभेत काँग्रेसचे कमीच – परंतु ११४ सदस्य होते. राहुल गांधी पक्षाध्यक्षपदाच्या खुर्चीत विराजमान होताना त्या पक्षाच्या खासदारांची संख्या ४४ इतकी घसरलेली आहे. हा काँग्रेसचा नीचांक. सोनिया गांधी यांनी अध्यक्षपद स्वीकारले त्या वेळी त्या पूर्ण अननुभवी होत्या. पण अध्यक्षपदी येताना राहुल गांधी यांच्या गाठीशी साधारण दीड दशकांच्या राजकारणाचा अनुभव आहे. सोनिया गांधी यांनी अध्यक्षपद हाती घेतल्यानंतर अवघ्या सहा वर्षांतच काँग्रेसला केंद्रात सत्ता मिळाली आणि ती पुढे १० वर्षे टिकली. परंतु या काळात या पक्षाचा एक एक चिरा राज्याराज्यांतून ढासळू लागला. मनमोहन सिंग सरकारच्या अनुत्साही आणि निष्क्रिय भासणाऱ्या कारभारानंतर २०१४ साली काँग्रेसचा केंद्रातील दशकभराचा सत्ताकाल संपुष्टात तर आलाच. परंतु तो येताना काँग्रेस आणि जनता यांतील संबंध कमालीचे विजोड होत गेले. मुसलमान आणि अन्य अल्पसंख्याकांची केवळ तोंडी लावण्यापुरतीच केलेली शब्दसेवा, ती करताना जणू आपण बहुसंख्य आहोत म्हणजे पापच असे हिंदू समाजास वाटावे असे होत गेलेले काँग्रेसचे वर्तन आणि इतक्या वर्षांच्या सत्ताकारणामुळे आलेल्या बेमुर्वतखोरीत गुंडपुंडांना घेऊन केलेले राजकारण या तीन प्रमुख कारणांमुळे काँग्रेसविरोधात जनमत क्षुब्ध होत गेले. सत्तासमीकरणात खाली जात चाललेल्या काँग्रेसने भाजपची तागडी आपोआप वर उचलली जाऊ लागली आणि जनमताचा लक्षणीय पाठिंबा भाजपस मिळाला. यातून काँग्रेसची सत्ता तर गेलीच. पण ती जाताना मधल्या काळात काँग्रेसने तब्बल १० राज्ये गमावली (आणि फक्त दोनच मिळवली) आणि त्या पक्षाचे दोन माजी मुख्यमंत्री, पाच केंद्रीय मंत्री, चार माजी प्रदेशाध्यक्ष तसेच अनेक राज्यस्तरीय मंत्री अंगावरील तिरंगी उपरणे टाकून भगवी अंगवस्त्रे लेवून हिंदुत्वाचा जयघोष करते झाले. राहुल गांधी यांच्या उदयाचे संदर्भ या पार्श्वभूमी तपासल्यास त्याचे महत्त्व लक्षात यावे.

ते लक्षात घेतल्यास मग राहुल गांधी यांच्या मंदिरातील पूजाअर्चाचे मर्म समजून येईल. मधल्या काळात काँग्रेसची अवनती झाली ती या देशातील हिंदू बहुसंख्याकांनी काँग्रेसकडे पाठ फिरवल्यामुळे. वास्तविक या पक्षाचा इतिहास हा अलीकडे सादर केला जातो तसा कडवा हिंदुत्वविरोधी नाही. एके काळी या पक्षात कुमारमंगलम आदी डावे आणि चक्रवर्ती राजगोपालाचारी आदी मवाळ हिंदू गुण्यागोविंदाने नांदत. हे काँग्रेसचे मोठेपण होते. या देशातील सर्व विचारधारांना बरोबर घेतल्याखेरीज आपणास पुढे जाता येणार नाही, याची समजूतदार जाणीव त्या पक्षाच्या धुरीणांना होती. परंतु पुढे ऐंशीच्या दशकात मंडल राजकारणाच्या उदयानंतर त्यास प्रत्युत्तर म्हणून हिंदुत्वाचे कमंडल राजकारण पुढे आले. तोपर्यंत राजकारणास समाजकारणाचा चेहरा होता. नंतर तो धर्माचा झाला. यात उभय बाजूंनी विवेकाचा बळी दिल्याने हे असे टोकाचे काही करणे हेच जनसमर्थनाच्या साध्याचे साधन आहे असे दाखवले जाऊ  लागले. म्हणजे भाजप तेवढा हिंदूंपुरता आणि मुसलमान, ख्रिश्चन हे फक्त काँग्रेसचे अशी काहीशी वाटणी झाली. ‘‘सर्वाना समान न्याय आणि लांगूलचालन कोणाचेच नाही,’’ असे भाजप जरी म्हणत असला तरी प्रत्यक्षात तो किती कराल हिंदुत्ववादी आहे हे दररोजच्या घटनांनी अलीकडे दिसून येते. ही इतिहासाची उलटी पुनरावृत्ती. आम्ही अल्पसंख्याकवादी नाही हे काँग्रेसचे सांगणे त्या वेळी जितके लटके होते तितकेच आम्ही केवळ बहुसंख्याकवादी नाही हे भाजपचे आताचे म्हणणे पोकळ आहे. अशा वेळी आपली निधर्मीवादाची बेगडी झूल टाकून देण्याची गरज काँग्रेसचे उगवते अध्यक्ष राहुल गांधी यांना वाटली हे ठेचा खाल्ल्यानंतर आलेल्या शहाणपणाचे द्योतक. त्यास आताच स्वागतार्ह ठरवणे हे घाईचे ठरेल. तूर्त ते दखलपात्र तरी निश्चितच ठरते.

याचे कारण या देशास कोणतेही टोकाचे राजकारण मानवत नाही, हा इतिहास आहे. जेव्हा जेव्हा राजकारण हे कडेलोटाकडे गेले तेव्हा तेव्हा असे काही बदल झाले की त्यामुळे हरवलेले संतुलन पुन्हा साधले गेले. टोकाच्या निधर्मीवादाने काँग्रेस रसातळाला गेली. टोकाच्या हिंदुत्वाने भाजप त्या दिशेस निघाला आहे असे म्हणणे सांप्रती धाष्टर्य़ाचे ठरेल. परंतु त्या पक्षाचा प्रवास योग्य मार्गाने नाही असे मात्र निश्चितच म्हणता येईल. त्याचप्रमाणे या देशातील राजकारणाचे आणखी एक वैशिष्टय़ राहिलेले आहे. ते म्हणजे भारतीय जनमानसिकतेत नेतृत्वाचा अहं सहन केला जात नाही. नेता कितीही लोकप्रिय असो. त्याने नम्र असणेच भारतीयांना भावते. भारतीय जनप्रियतेत सर्वोच्च स्थानी पोहोचलेल्या पंचाधारी महात्मा गांधी यांना जशी याची जाणीव होती तशीच राजसवस्त्रांकित पंडित नेहरू यांनादेखील हे भान होते. त्यामुळे लोकप्रियतेचा वारा या नेत्यांच्या कानात गेला नाही. नंतरच्या काळात आणीबाणी ही त्यास अपवाद ठरली. पण ती लादणाऱ्या इंदिरा गांधी यांना जनतेने त्यांचे स्थान दाखवून दिले. परंतु लगेचच मोरारजी देसाई आणि कंपनीदेखील नैतिकतेच्या दंभाने माजू लागली आहे असे दिसताच त्यांनाही अवघ्या काही महिन्यांत जनतेने पायदळी तुडवले. तेव्हा अशा वातावरणात कोणा नेतृत्वाची, कथित लोकप्रियतेची मिजास फारच वाढू लागली आहे असे दिसत असताना राहुल गांधी हे संयत आणि शालीन नेतृत्व देऊ शकत असतील तर जनतेची प्रतिक्रिया काय असेल हे सांगावयाची गरज नाही. म्हणून आम्ही सौहार्दाचे राजकारण करू ही राहुल गांधी यांची भूमिका निश्चितच आश्वासक ठरते.

तसेच, इतिहासाच्या वर्तुळाचा एक वेढा पूर्ण करावयाची राहुल गांधी यांना मिळत असलेली संधीदेखील महत्त्वाची. या देशात हिंदुत्वाचा रेटा वाढला त्यामागे एकमेव कारण आहे. ते म्हणजे वादग्रस्त बाबरी मशिदीचे दरवाजे उघडण्याचा राहुल गांधी यांचे वडील राजीव गांधी यांचा निर्णय. शहाबानो प्रकरणात नको ते केल्याची लाज वाटल्याने राजीव गांधी यांना हा निर्णय घ्यावा लागला. त्यानंतर देशाचे राजकारणच बदलले. त्यात राजीव गांधी यांची काँग्रेस धुळीस मिळाली. त्यानंतर सुरू झालेल्या या धर्मवादी राजकारणाची दिशा राहुल गांधी बदलू शकले तर वडिलांची चूक दुरुस्त करण्याचे पुण्यकर्म त्यांच्या हातून घडेल.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 18, 2017 2:49 am

Web Title: rahul gandhi new president of congress party
Next Stories
1 कानकोंडेपणाची कानगोष्ट
2 सभ्यतेचा विजय
3 नवे निश्चलनीकरण?
Just Now!
X