18 February 2019

News Flash

दिवाळखोरांचे दातृत्व

सत्ताधारी पक्षाचे राजकारण करावयाची सवय झालेल्यांना अधूनमधून अशी हुक्की येते.

Gurudas Kamat : गेल्या काही काळापासून गुरूदास कामत सातत्याने पक्षनेतृत्त्वाच्या कार्यपद्धतीवर नाराज होते.

 

आपल्याला जे काही मिळणे आवश्यक होते ते पुरेसे मिळालेले नाही, यासाठीचा त्रागा बऱ्याचदा गुरुदास कामत यांच्यासारख्यांच्या राजीनाम्यांतून दिसून येतो..

मुंबईत कामत हे पक्षश्रेष्ठींविरोधात बोलू की नको अशा कात्रीत सापडले असताना तिकडे रायपुरात छत्तीसगडचे पहिले मुख्यमंत्री, ज्येष्ठ काँग्रेसनेते अजित जोगी यांनी मात्र पक्षश्रेष्ठींना आव्हान देत स्वतंत्र पक्ष काढण्याची घोषणा केली. गेल्या काही वर्षांत गांधी कुटुंबीयांची निवडणुका जिंकून देण्याची क्षमता कमी होऊ लागली, हे बाहेरचा रस्ता शोधण्यामागचे महत्त्वाचे कारण.. 

गुरुदास कामत हे काही कोणत्या सामाजिक कार्यासाठी ओळखले जात नाहीत. त्यामुळे राजीनामा दिला तरी आपण आपले समाजकार्य अव्याहत सुरूच ठेवू असे कामत म्हणतात तेव्हा सर्वसामान्यांना हे कोणते समाजकार्य, असा प्रश्न पडल्यास वावगे नाही. कामत यांनी सोमवारी काँग्रेसच्या सदस्यत्वाचा त्याग करीत आपण राजकारण संन्यासच घेत असल्याचे जाहीर केले. सत्ताधारी पक्षाचे राजकारण करावयाची सवय झालेल्यांना अधूनमधून अशी हुक्की येते. पण त्याचे मूळ या व्यक्तींची सदसद्विवेकबुद्धी जागी होण्यात नाही. प्रचलित राजकारण्यांना असा सदसद्विवेकबुद्धी नामक अवयव नसतो, याची जाणीव चाणाक्ष नागरिकांना झालेली आहेच. तेव्हा या आणि अशांच्या राजीनाम्यामागे हे असले काही नसते. आपल्याला जे काही मिळणे आवश्यक होते ते पुरेसे मिळालेले नाही यासाठीचा त्रागा बऱ्याचदा कामत यांच्यासारख्यांच्या राजीनाम्यांतून दिसून येतो. वास्तविक कामत यांनी ज्या पक्षाच्या वळचणीखाली राहून कथित समाजकार्य केले त्या पक्षाकडेच आता आपल्या साजिंद्यांना देण्यासारखे काही नाही. काँग्रेसचे नेतृत्व म्हणजे तूर्त तरी ओसाड गावची पाटीलकी. परंतु ओसाड गावची झाली तरी ती पाटीलकी असते. त्यामुळे ती करावयाची सवय झालेल्यांना तो मोह आवरत नाही. या न आवरत्या मोहाची दखल घेत त्यांना कोणी काही देऊ केले नाही तर अशांच्या मोहभंगाची परिणती राजीनामा नाटय़ात होते. गुरुदास कामत यांचे हेच झाले आहे.

कामत नाराज आहेत आणि ते का नाराज आहेत हे त्यांना त्यांच्या पक्षात विचारणारे कोणी नाही, म्हणून. अशा वेळी कोणत्याही मनुष्याच्या मनात उद्विग्नतेची भावना दाटून येते. ज्या पक्षात आपण इतके दिवस आहोत त्या पक्षाने आपल्या नाराजीबद्दल विचारूदेखील नये म्हणजे काय? तेव्हा या अशा उद्विग्नतेची परिणती त्यांच्या मनात राजीनामा भावना दाटण्यात झाली. या उद्विग्नतेमागे मूळ आहे ते पक्षनेतृत्वाचे त्यांच्याकडे होत असलेले दुर्लक्ष. या पक्षाचे आगामी सर्वेसर्वा साक्षात राहुल गांधी अलीकडे मुंबईत आलेले असताना त्यांच्या चार पावलांच्या पदयात्रेतदेखील कामत सहभागी झाले नव्हते. केवढे हे धैर्य. परंतु त्यांच्या या धैर्याची कोणतीही चाड पक्षनेतृत्वास नाही. वास्तविक गांधी कुटुंबातले विद्यमान आणि आगामी असे कोणीही कोणत्याही प्रदेशात येणार असले तर त्यांच्या कृपाकटाक्षासाठी काँग्रेसवाले दिवसरात्र तहानभूक हरपून उभे असतात. परंतु कामत यांनी ही परंपरा झुगारून साक्षात राहुलबाबांकडे दुर्लक्ष केले. कामत यांना वाटत होते याबद्दल कोणी तरी आपणास विचारेल, की बाबारे का रागावलास. पण तसे काही झाले नाही. कामत यांच्या रागास कोणीही हिंग लावून विचारले नाही. तेव्हा कामत म्हणाले राजीनाम्याची भाषा करून पाहू या. ती केल्यानंतरही पक्षश्रेष्ठींपैकी कोणी त्यांना पुसावयास आले नाही. कामत यांना याची सवय नाही. एके काळी राजीव गांधी यांच्या खास दरबारातले म्हणून कामत ओळखले जात. कै. राजीव गांधी यांच्या काळात चाळिशी पार केलेल्या युवक काँग्रेसचे तरणेबांड नेतृत्व म्हणून कामत यांचा दरारा होता. ते कोणासही भेटत नसत, कोणाकडे जात नसत आणि कोणाची त्यांच्याकडे यायची टाप नसे. मुंबईच्या हुतात्मा चौक परिसरातील आपल्या कार्यालयातून कामत सर्व सूत्रे हलवीत. त्या वेळी त्यांच्या मागे काँग्रेसचे विद्यमान उपाध्यक्ष राहुल यांचे तीर्थरूप कै. राजीव गांधी होते. त्यामुळे त्यांचा त्या वेळचा दरारा काही औरच होता. परंतु राजीव गांधी गेले आणि कामत यांचीही रया जाण्यास सुरुवात झाली. मनमोहन सिंग यांच्या मंत्रिमंडळात नाही म्हणायला कामत होते खरे. पण राज्यमंत्रीच. कॅबिनेट दर्जा मिळावा म्हणून त्यांनी जंग जंग पछाडले. पण राजीव गांधी यांच्या पत्नी सोनिया या काही बधल्या नाहीत. त्यामुळे त्याही वेळी कामत यांना तोंड दाबून राज्यमंत्रिपदाचे बुक्के सहन करावे लागले. त्याही वेळी अखेर न राहवून त्यांनी राजीनाम्याचा निर्णय घेतला. तो अमलातही आणला. ताजा राजीनामा देताना पक्षाध्यक्ष सोनिया गांधी आणि उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्याबाबत आपल्याला नितांत आदर आहे, असे कामत म्हणतात. ही खास काँग्रेसी शैली. ज्याचा निषेध म्हणून पदत्याग करायचा त्यावरच आपली किती श्रद्धा आहे, हे सांगायचे. व्यवस्थेत राहून व्यवस्थेविरोधात ज्याला नाराजी व्यक्त करावयाची असते तो ही अशी दुहेरी भाषा बोलतो.

पण अजित जोगी यांच्यासारखे जे असतात ते याबाबत तरी अधिक प्रामाणिक असतात आणि व्यवस्थेला आव्हान देत उघड भूमिका घेतात. मुंबईत कामत हे पक्षश्रेष्ठींविरोधात बोलू की नको अशा कात्रीत सापडले असताना तिकडे रायपुरात छत्तीसगडचे पहिले मुख्यमंत्री, ज्येष्ठ काँग्रेसनेते अजित जोगी यांनी मात्र पक्षश्रेष्ठींना आव्हान देत स्वतंत्र पक्ष काढण्याची घोषणा केली. कामत यांच्याप्रमाणे जोगीदेखील पक्षश्रेष्ठींवर नाराज आहेत. त्यातही विशेषत: राहुल गांधी यांच्यावर जोगी यांचा राग आहे. गेली १३ वर्षे आपल्याला पक्षात कोणतीही जबाबदारी देण्यात आलेली नाही, आपण अगदी सामान्य कार्यकर्ते म्हणूनच वागवले गेलो, असे जोगी यांचे म्हणणे आहे. वास्तविक एरवीही कोणत्याही काँग्रेस नेत्यास आपण पक्षाचे सामान्य कार्यकर्ते आहोत, असे म्हणायला आवडते. परंतु सामान्य कार्यकर्ता म्हणून वागणूक दिली की मात्र त्यांचा मानभंग होतो, हे एक विशेषच. जोगी यांचे अन्य मत मात्र विचारात घेण्यासारखे आहे. दिल्लीस्थित काँग्रेस नेत्यांना राज्यांत कोणत्याही नेत्याचा प्रभाव वाढलेला चालत नाही असे म्हणत जोगी यांनी ममता बॅनर्जी ते आसामचे ताजे हिम्मत बिस्व सर्मा यांचा दाखला दिला. पण हे आजचेच नाही. याआधीही शरद पवार यांच्यापासून ते इंदिरा इज इंडिया असे म्हणण्याची लाचारी दाखवणारे देवकांत बरुआ अशा अनेकांवर काँग्रेसचा त्याग करावयाची वेळ आली. या सर्वामागे कारण एकच. ते म्हणजे प्रादेशिक पातळीवरील नेत्यांचा मध्यवर्ती नेतृत्वाकडून केला जाणारा दुस्वास. जोगी यांच्या आधी अवघे काही महिने आसामात हिम्मत सर्मा यांनीदेखील काँग्रेस त्यागून निवडणुकीच्या तोंडावर भाजपची साथ पत्करली. त्यांच्या पक्षत्यागामागेही राहुल यांनी केलेली अवहेलना हेच कारण होते.

परंतु काँग्रेस नेत्यांच्या या मानभावीपणामागे हेच एक वास्तव नाही. राहुल गांधी यांनी जर निवडणुका जिंकून दिल्या असत्या तर त्यांच्याकडून मिळणाऱ्या वागणुकीबाबत या नेत्यांनी चकार शब्द काढला नसता. काँग्रेसजनांना इतके दिवस गांधी घराण्याचे प्रेम होते ते गांधी घराणे गोरेगोमटे वा सहृदय आहे म्हणून नाही. तर गांधी नाव निवडणुका जिंकून देत होते म्हणून. पण गेल्या काही वर्षांत गांधी कुटुंबीयांची निवडणुका जिंकून देण्याची क्षमता कमी होऊ लागली असून परिणामी समस्त काँग्रेसजनांसमोर भवितव्याचा प्रश्न आ वासून उभा ठाकू लागला आहे. विविध प्रांतातील काँग्रेसजन बाहेरचा रस्ता शोधू लागले आहेत ते यामुळे आणि त्यांना आपल्या न केलेल्या समाजसेवेची जाणीव होऊ लागली आहे तीही याचमुळे. पण त्यास गांभीर्याने घेण्याचे कारण नाही. समाजसेवा, प्रादेशिक अस्मिता वगैरेंच्या जाणिवा काँग्रेसजनांना आता होऊ लागल्या आहेत ते पक्षाच्या दिवाळखोरीमुळे. परंतु दिवाळखोरांच्या दातृत्वास काहीही अर्थ नसतो.

First Published on June 8, 2016 4:35 am

Web Title: senior congress leader gurudas kamat resigns from party retires from politics